तुकारामगाथा
1 समचरणदृष्टि
विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा
॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों
देसी ॥2॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म
नाशवंत ॥3॥
2 सुंदर तें ध्यान
उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥ तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप
॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥
3 सदा माझे डोळे जडो
तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ
॥ध्रु.॥ विठो माउलिये हाचि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥
4 राजस सुकुमार
मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख
शोभलें । सुखाचें ओतलें सकळही ॥2॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा
धीर नाहीं॥4॥
5 कर कटावरी
तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां
॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥
6 गरुडाचें वारिकें
कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि
सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥4॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥5॥
( विराण्या
- अभंग 25)
7 वाळो जन मज ह्मणोत
शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥2॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों
तुका हरिरता ॥3॥
8 आधिल्या भ्रतारें
काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकलियें ॥1॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥2॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥3॥
9 हाचि नेम आतां न
फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥1॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥2॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥3॥
10 नाहीं काम माझें
काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥1॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥2॥ न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥3॥
11 विसरले कुळ आपुला
आचार । पती भावे दीर घर सोय ॥1॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥2॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं
बहिरी जालें ॥3॥
12 न देखें न बोलें
नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका म्हणे खरी
केली मात ॥3॥
13 दुजा ऐंसा कोण बळी
आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥1॥ बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी
॥2॥ तुका म्हणे आह्मी जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥
14 क्षणभरी आह्मी
सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥1॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥2॥ तुका म्हणे येणें
जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥3॥
15 आह्मां आह्मी आतां
वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥1॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें
सर्व भोगी ॥2॥ तुका म्हणे अंगसंग
एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥3॥
16 सर्व सुख आह्मी
भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥1॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥2॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥3॥
17 एका जिवें आतां
जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥1॥ नारायणा आह्मां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥2॥ तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥3॥
18 हासों रुसों आतां
वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥1॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आह्मी नारायण एकाएकीं ॥2॥ तुका म्हणे आह्मी जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥3॥
19 मजसवें आतां येऊं
नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥1॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाइट ओखटें तें ॥2॥ तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥3॥
20 शिकविलें तुम्ही तें
राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥1॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥2॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥3॥
21 सांगतों तें
तुह्मीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥1॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥2॥ तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥3॥
22 आजिवरी तुम्हा आम्हा नेणपण
। कौतुकें खेळणें संग होता ॥1॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तेंचि करीं सुखें ॥2॥ तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥3॥
23 सासुरियां वीट आला
भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥1॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥2॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई
लाजों आतां ॥3॥
24 मरणाही आधीं
राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥1॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥2॥ तुका म्हणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हां आम्हां ॥3॥
25 परपुरुषाचें सुख
भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥1॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥2॥ तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥3॥
26 अइकाल परी ऐसें
नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥1॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥2॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥3॥
27 आहांच वाहांच आंत
वरी दोन्ही । न लगा गडणी आह्मां तैशा ॥1॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥2॥ तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥3॥
28 बहुतांच्या आह्मी न
मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥1॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥2॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥3॥
29 त्याचें सुख नाहीं
आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥1॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें
॥2॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥3॥
30 न राहे रसना बोलतां
आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥1॥ मानेल त्या तुम्ही आइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥2॥ तुका म्हणे तुह्मीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥3॥
31 न बोलतां तुम्हां कळों
न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥1॥ आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥2॥ तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥3॥
32 नये जरी तुज मधुर
उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥1॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण
॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति
भावबळें ॥2॥ तुका म्हणे मना
सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥3॥
33 सावध जालों सावध
जालों । हरिच्या आलों जागरणा ॥1॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप
। होतें पाप आड तें ॥2॥ तुका म्हणे त्या
ठाया । ओल छाया कृपेची ॥3॥
34 आपुलिया हिता जो
असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥1॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे
देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥2॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥3॥
35 अंतरींची घेतो गोडी
। पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव
सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥
36 सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर
॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तुप पथ्या ॥4॥ दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती॥5॥ नीज न यें घाली फुलें । जवळी न साहती मुलें ॥6॥ अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी ॥7॥ हाड गळोनी आले मांस । माझें दुख: तुम्हा नेणवे कैसे ॥8॥ तुका म्हणे जिता गाढव मेला । मेलियावरी नरका गेला ॥9॥
37 पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव
होऊं देऊं ॥1॥
जेथें तेथें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेद मतें
भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥2॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥
38 . वंदू चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं
॥1॥ अमुप हे गाठी बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा
॥ध्रु.॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥2॥ जन्म मरणाच्या खुंटतील खेपा । होईल सोपा सिद्ध पंथ ॥3॥ गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं घेत माग आम्ही
॥4॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया
॥5॥
39 जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी
झाडा ॥1॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या
दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावे । हें तों देवें बरें शिकविलें ॥2॥ दुस-यातें आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असें ॥3॥ येथें कोणी काही न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची
॥4॥ लाचावला तुका मारीतसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥5॥
40 देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी तें
॥1॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट
ब्रह्मरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरते वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥2॥ एच्छादानी येथें वळला समर्थ । अवघे चि आर्त पुरवितो ॥3॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं
घ्यावें ऐसें ॥4॥ तुका
म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगाते निरुपम ॥5॥
41 अवगुणांचे हाती । आहे अवघी फजीती ॥1॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष
तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥2॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥3॥
42 हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना । कोठें पाहासील
तुटी । आयुष्य वेचें फुकासाठी । ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंती । तुका
म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ।
43 धर्माची तूं मूर्ती । पाप-पुण्य तुझे हाती । मज सोडवी
दातारा । कर्मापासोनी दुस्तरा ॥ध्रु.॥ करीसी अंगिकार । तरी काय माझा भार ।
जीवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ।
44 ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ।।1।। कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाणी
।।ध्रु।। कामधेनूचिया क्षीरा पार नाही । इच्छेचिये वाही वरुषावे ।।2।। बैसलिये ठायीं लगलें भरतें । त्रिपुटी वरतें भेदी ऐसें
।।3।। हरि नाही आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगी विसावला
।।4।। तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता क़ोण राहत
राहों ।।5।।
45 दुजें खंडे तरी । उरला
तो अवघा हरि ।। आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ।।1।। इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ।। पारधीच्या
खुणा । जाणतेंचि साधावे ।।ध्रु।। देह आधी काय खरा । देहसंबंधपसारा ।। बुजगावणें
चोरा । रक्षणसें भासतें ।।2।।
तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ।। आहेसि तूं आगा । अंगी दोळे उघडी ।।3।।
46 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।1।। अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा
।।ध्रु।। कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।2।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ।।3।।
47 आम्ही जरी आस । जालों टाकोनी उदास ।।1।। आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ।।ध्रु।। भलते
ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ।।2।। तुमचं तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ।।3।। गेले मानामान । सुखदु:खाचें खंडन ।।4।। तुका म्हणे चिती । नाहीं वागवीत खंती ।।5।।
48 निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ।।1।। मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी
।।ध्रु।। देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ।।2।। अवघें पावे नारायणी । जनार्दनीं तुक्याचें ।।3।।
49 जन विजन जालें आम्हां । विठ्ठल नामा प्रमाणें ।।1।। पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।।ध्रु।। वन
पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ।।2।। आठव नाहीं सुखदु:खा । नाचे तुका कौतुकें ।।3।।
50 हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।1।। तोचिमोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।ध्रु।। मोहरा होय
तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगे ।।2।। तुका म्हणे तोचि संत । सोसी
जगाचे आघात ।।3।।
51 आलिंगनें घडे ।
मोक्ष सायुज्यता जोडे ॥1॥ ऐसा संताचा महिमा ।
जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥2॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥3॥
52 माझिया मीपणा ।
जाला यावरी उगाणा ॥1॥ भोगी त्यागी
पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टाळलें निमित्त । फार थोडें घात हित
॥2॥ यावें कामावरी । तुका म्हणे
नाहीं उरी ॥3॥
53 सकळ चिंतामणी शरीर
। जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धी ।
निर्मळ स्फटिक जैसा ॥1॥ मोक्षाचें तीर्थ न
लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥ तीर्थांसी तीर्थ
जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥ मन शुद्ध तया काय
करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥2॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका म्हणे तो
परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥3॥
54 आहे तें सकळ
कृष्णाचि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥1॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें
आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥2॥ तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥3॥
55 महारासि सिवे ।
कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥1॥ तया प्रायश्चित्त
कांहीं । देहत्याग करितां नाहीं
॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥2॥ ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो
त्या याती ॥3॥
56 तेलनीशीं रुसला
वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥1॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥ नावडे लोकां टाकिला
गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥2॥ शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥3॥ पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥4॥ तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥5॥
57 मज दास करी त्यांचा
। संतदासांच्या दासांचा ॥1॥ मग होत कल्पवरी ।
सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥2॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥3॥
58 सदा तळमळ ।
चित्ताचिये हळहळ ॥1॥ त्याचें दर्शन न
व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥2॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे
परउपकार ॥3॥
59 जया नाहीं नेम
एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥1॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा
॥ध्रु.॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां
॥2॥ जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥3॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड
रजकाचें ॥4॥ तुका म्हणे
त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना न जाय हरीचिया ॥5॥
60 आम्ही सदैव
सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥1॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा ।
तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार
न साहती ॥2॥ धन कण घरोघरीं ।
पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोणगुरें वासरें ॥3॥ जाली सकळ निश्चिती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं
॥4॥ तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी
आमुच्या ॥5॥
61 पराविया नारी
माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे
सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा
॥3॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥ तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥5॥
62 शुद्धबीजा पोटीं ।
फळें रसाळ गोमटीं ॥1॥ मुखीं अमृताची वाणी
। देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥2॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥3॥
63 चित्त समाधानें ।
तरी विष वाटे सोनें ॥1॥ बहु खोटा अतिशय ।
जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥2॥ तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥3॥
64 परिमळ म्हूण
चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥1॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं
नये ॥2॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे
वर्म दावूं लोकां ॥3॥
65 माया तेंचि ब्रह्म
ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥1॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते
॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥2॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥3॥
66 दुर्जनासि करी साहे
। तो ही दंड हे लाहे ॥1॥ शिंदळीच्या कुंटणी
वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥2॥ तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥3॥
67 वृत्ति भूमि राज्य
द्रव्य उपाजिऩती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥1॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं
॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥2॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥3॥
68 पवित्र सोंवळीं ।
एक तींच भूमंडळीं ॥1॥ ज्यांचा आवडता देव
। अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥2॥ तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥3॥
69 आशाबद्ध जन । काय
जाणे नारायण ॥1॥ करी इंद्रियांची
सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥2॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥3॥
70 ढेकरें जेवण दिसे
साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥1॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥ गव्हांचिया होती
परी । फके वरी खाऊं नये ॥2॥ तुकां म्हणे असे
हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥3॥
71 करावी ते पूजा मनें
चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥1॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं
॥ध्रु.॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥2॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥3॥
72 एकादशीव्रत सोमवार
न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥1॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥ हरिहरां नाहीं
बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥2॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥3॥
73 नव्हे आराणूक
संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥1॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे
कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥2॥ तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥3॥
74 स्मशान ते भूमि
प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥1॥ भरतील पोट श्वानाचिया परी । विस्त दिली घरीं यमदूतां
॥ध्रु.॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां
कंटकांची ॥2॥ तुका म्हणे नाहीं
ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥3॥
75 आहाकटा त्याचे
करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥1॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा
पापी ॥ध्रु. ॥ परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥2॥ न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥3॥ परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे
॥4॥ तुका म्हणे विटाळाची च तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥5॥
76 श्वान शीघ्रकोपी ।
आपणा घातकर पापी ॥1॥ नाहीं भीड आणि धीर
। उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥2॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥3॥
77 देखोनि हरखली अंड ।
पुत्र जाला ह्मणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥1॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल
थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥ भूमि कांपे
त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्ठउत्तरें। पापदृष्टी मळिणचित्त ॥2॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ
। ह्मणोनियां निषिद्ध तो ॥3॥
78 नेणें गाणें कंठ
नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥1॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥2॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया॥3॥
79 माझी पाठ करा कवी ।
उट लावी दारोदार ॥1॥ तंव तया पारखी सिव
। लाजे ठाव सांडितां ॥ध्रु. ॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥2॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥3॥
80 उपाधीच्या नांवें
घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥1॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.
॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते
ठायीं ॥2॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥3॥
81 योगाचें तें भाग्य
क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥1॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु. ॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक
उगें ॥2॥ तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥3॥
82 न ये नेत्रां जळ ।
नाहीं अंतरीं कळवळ ॥1॥ तों हे चावटीचे बोल
। जन रंजवणें फोल ॥ध्रु. ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥2॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥3॥
83 बाईल सवासिण आई ।
आपण पितरांचे ठायीं ॥1॥ थोर वेच जाला नष्टा
। अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु. ॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥2॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥3॥
84 दानें कांपे हात ।
नाव तेविशीं मात ॥1॥ कथी चावटीचे बोल ।
हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥ न वजती पाप । तीर्था ह्मणे वेचूं काय ॥2॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥3॥
85 वळितें जें गाई ।
त्यासि फार लागे काई ॥1॥ निवे भावाच्या
उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥2॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे
सवें दीना ॥3॥
86 मैत्र केले महा बळी । कामा न येती
अंतकाळीं ॥1॥ आधीं घे रे रामनाम
। सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥2॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥3॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥4॥ तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥5॥ तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्यांशीचा खेपा ॥6॥
87 कानडीनें केला मर्हाटा
भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥1॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची
॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा ह्मणोन । येरु पळे आण जाली आतां ॥2॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥3॥
88 सुख पाहतां
जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥1॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें
तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥2॥ तुका ह्मणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥3॥
89 बोलायाचा त्यासीं ।
नको संबंध मानसीं ॥1॥ जया घडली संतनिंदा
। तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥2॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥3॥
90 तीळ जाळिले तांदुळ
। काम क्रोधे तैसेचि खळ ॥1॥ कां रे सिणलासी
वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥ मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥2॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥3॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥4॥ तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म ॥5॥
91 संवसारतापें तापलों
मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥1॥ ह्मणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे
॥ध्रु.॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म
ठावें ॥2॥ वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी
॥3॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥4॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥5॥
92 भक्तॠणी देव बोलती
पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥1॥ मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया
वांटी ॥ध्रु.॥ माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥2॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥3॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण
फेडियेलें ॥4॥ बीज दळोनियां केली
आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥5॥ तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥6॥
93 भोगें घडे त्याग ।
त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐसें उफराटें वर्म
। धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥2॥ तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥3॥
94 भोरप्यानें सोंग पालटिलें
वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥1॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे
जैसे ॥ध्रु.॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥2॥ खाटिक
हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥3॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥4॥
95 गेली वीरसरी । मग
त्यासि रांड मारी ॥1॥ मग नये तैसी सत्ता
। गेली मागील आणितां ॥ध्रु.॥ भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥2॥ तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥3॥
96 युक्ताहार न लगे
आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥1॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी
॥ध्रु.॥ न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड
॥2॥ तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥3॥
97 कंठीं कृष्णमणी ।
नाहीं अशुभ ते वाणी ॥1॥ हो का नर अथवा नारी
। रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥2॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥3॥ तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥4॥
98 माया ब्रह्म ऐसें
ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥1॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे
॥ध्रु.॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे
॥2॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥3॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥4॥ तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट
तयां ॥5॥
99 मृगजळ दिसे साचपणा
ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥1॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥ संचित सांगातीं
बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥2॥ तुका ह्मणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥3॥
100 गौळीयाची ताकपिरें
। कोण पोरें चांगलीं ॥1॥ येवढा त्यांचा छंद
देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥ काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥2॥ तुका ह्मणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.