तुकारामगाथा २२०१ – २३००
2201 आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं
हित सांगों कोणा ॥1॥ कोण
नाहीं दक्ष करितां संसार । आम्हीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड ।
कोठें करूं कोड आणिकांचें ॥2॥ तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥3॥ ॥2॥
2202 चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥1॥ धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥
उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥2॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥3॥
2203 बरें सावधान । राहावें समय राखोन ॥1॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ
अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥2॥ तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥3॥ ॥2॥
2204 काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥1॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥ घालीं
भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥2॥ आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥3॥
2205 धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥1॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥
विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥2॥ तुका म्हणे लांसी । माया नाचविते
कैसी ॥3॥
2206 दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥1॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न म्हणे
रामराम । मनें वाचे हें चि काम ॥2॥ तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥3॥
2207 शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥1॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें
तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥2॥ सिंदळी त्या सती । तुका म्हणे
थुंका घेती ॥3॥
2208 भक्ता म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥1॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली
॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥2॥ तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥3॥
2209 गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥1॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें
जवळूनि ॥ध्रु.॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥2॥ तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥3॥
2210 बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥1॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥
सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥2॥ तुका म्हणे निघे अगी । दुजे संगीं
आतळतां ॥3॥
2211 भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥1॥ जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ
। दिली जोडोनि तळमळ ॥2॥ तुका
म्हणे
देवा । आहाच कळों आली सेवा ॥3॥
2212 नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय
बोलों ॥1॥ जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें
॥ध्रु.॥ ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥2॥ तुका म्हणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥3॥
2213 करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज
हांसतील ॥1॥ आतां
आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥ अनुभवाविण कोण करी पाप
। रिते चि संकल्प लाजलावे ॥2॥ तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा
मज ॥3॥
2214 नाहीं आइकत तुम्ही माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥1॥ येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा
॥ध्रु.॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥2॥ तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥3॥
2215 नव्हे तुम्हां सरी । येवढें कारण मुरारी ॥1॥ मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥ स्वामींचें
तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥2॥ शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची ॥3॥
2216 केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥1॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥
दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥2॥ जातीं उखळें चाटूं । तुका म्हणे
राज्य घाटूं ॥3॥
2217 आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥1॥ हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥ जाणें
तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥2॥ तुका म्हणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥3॥
2218 पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥1॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें
अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥2॥ तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥3॥
2219 बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥1॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची ॥ध्रु.॥
समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥2॥ तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥3॥
2220 काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥1॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो
तें ॥ध्रु.॥ नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥2॥ तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥3॥
2221 माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥1॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न
पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥2॥ तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥3॥
2222 कांहीं मागणें हें आम्हां
अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥1॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धी
राहिलीसे ॥ध्रु.॥ शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥2॥ तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥3॥
2223 मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥1॥ काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां
रागा । कठीण लागा मागेंमागें ॥2॥ तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥3॥
2224 असो तुझें तुजपाशीं । आम्हां
त्यासी काय चाड ॥1॥
निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥ करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥2॥ तुका म्हणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥3॥
2225 आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥1॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥ स्थिरावतां
ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥2॥ तुका म्हणे विळतां मन । आम्हां क्षण न लगे ॥3॥
2226 सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥1॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा
॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥2॥ तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥3॥
2227 अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥1॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें
दिसतसे॥ध्रु.॥ लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥2॥ तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढ्यासाटीं
॥3॥
2228 स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी
॥1॥ खोट्या तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ म्हणवावें
त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥2॥ तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥3॥
2229 कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥1॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ति । न
चलेसी युक्ति
जाली पुढें ॥ध्रु.॥ बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों
उभीं आहों तैसीं ॥2॥ तुका
म्हणे
कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥3॥
2230 रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥1॥ तुम्हीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली
इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥2॥ तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥3॥
2231 थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया
बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों
॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें
लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे
ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥
2232 तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न
संरित आली बाळवेशें जवळी ॥1॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा
केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥2॥ तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई । आतां पुढें काई तुज घालूं सांकडें
॥3॥
2233 कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें
मी न करीं सर्वथा ॥1॥ चुकी
जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या
राखिल्या ॥ध्रु.॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी
भार न कळे कैसा घालावा ॥2॥
गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका म्हणे
जाणावें ॥3॥
2234 काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय
एक न करिसी ॥1॥
उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुद्धी । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥ तूं देवांचा
ही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥2॥ तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं
धरणें बैसलों ॥3॥
2235 नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला
हरी एवढा तुम्हां आकांत ॥1॥ वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें
आघात ॥ध्रु.॥ जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि
जाणीतलें ॥2॥ तुका
म्हणे
कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता । काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥3॥
2236 तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ
कल्लोळ प्रेमाचा ॥1॥ देऊं
काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥
तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्वांचा जनिता
सकळ सत्तानायक ॥2॥
कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा
क्षमा करीं अपराध ॥3॥
2237 मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन
सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥1॥ पुरे पुरे हा संसार कर्म बळिवंत
दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुद्धीचे
तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥2॥ तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं
हृदयीं ॥3॥
2238 बरें आम्हां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥1॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥
जें आम्ही बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं आजि
शिव्या ॥2॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥3॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥4॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा बईल तूं देवा भारवाही
॥5॥ लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें
ही ॥6॥ तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥7॥
2239 आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥1॥ होसी सरड बेडुक । बाग गांढ्या ही पाईक ॥ध्रु.॥ बळ करी
तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥2॥ तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥3॥
2240 काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥1॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
चौघांचिया मतें । आधीं खरें केलें होते ॥2॥ तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥3॥
2241 प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें
पुढें पित्यासी ॥1॥ काय
लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥
सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें ॥2॥ तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें
उपजे विषम ॥3॥
2242 भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥1॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥
गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।2॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥3॥
2243 रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥1॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे
तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥2॥ अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे
विठो धरा ॥3॥
2244 जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥1॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली
गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥2॥ तुका म्हणे ठाया । जाई आपल्या आलिया ॥3॥
2245 पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥1॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं
॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥2॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ता
मायेचिये ॥3॥
मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥4॥ तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥5॥
2246 कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान
तुमचें मज ॥1॥ आठवण
तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ
अपराधी पतिता आगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥2॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥3॥
2247 संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों
त्यांचा ॥1॥ ते
चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे
। यांचियातें जोडे सर्व सुख ॥2॥ तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥3॥
2248 लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि
नानापरिचीं लाघवें ॥1॥
पुरोनि पंढरिये उरलें भक्तिसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥
बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥2॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा
कृपानिधि तुका म्हणे विठ्ठल ॥3॥
2249 कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥1॥ उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि
॥ध्रु.॥ उतावीळ बाह्य भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥2॥ तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंद्रियांची
॥3॥
2250 नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां
व्यापार नाठवती ॥1॥ गोड
गोमटें हें अमृतासी वाड । केला कैवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥ प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति
। त्रिविध सांडिती ताप अंग ॥2॥ तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥3॥
2251 स्वामिकाज गुरुभक्ति ।
पितृवचन सेवा पति ॥1॥ हे
चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे
आणिकांच्या दुःखें ॥2॥
निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥3॥
2252 चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥1॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी
कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तिची ही ॥2॥ तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तिचा भाव
रे देणें घेणें ॥3॥
2253 तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥1॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥
रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥2॥ तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥3॥
2254 आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥1॥ तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी
जगविख्यात ॥ध्रु.॥ कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥2॥ वांयां जातां मज । तुका म्हणे तुम्हां लाज ॥3॥
2255 विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥1॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥
उभयकुळींसाक्ष । तूं चि माझा मातुळपक्ष ॥2॥ समर्पिली काया । तुका म्हणे पंढरिराया ॥3॥
2256 वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी
वाहावा भार माथां ॥1॥ खादल्याची
गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥ उत्पित्तपाळणसंहाराचें निज
। जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥2॥ तुका म्हणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥3॥
2257 आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥1॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥ बैसलों
धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥2॥ तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥3॥ भांडवल माझें मिरविसी जनीं । सहस्त्र वोवनी
नाममाळा ॥4॥ तुका
म्हणे आम्ही केली
जिवें साटी । तुम्हां आम्हां तुटी घालूं आतां ॥5॥
2258 काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं
असत्यकाटें काटलें ॥1॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला
॥ध्रु.॥ पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड
सोंवळी ॥2॥ कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका
म्हणे कळा
गुंडुन ठेवीं कुसरी ॥3॥
2259 ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥1॥ सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे ।
सत्यकर्में आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥ साकरेच्या आळां लाविला
कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥2॥ सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे
याचा विचार करीं ॥3॥
2260 पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥1॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ॥ध्रु.॥ उदका भिन्न
पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥2॥ तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें ॥3॥
2261 जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईच्या ॥1॥ पाप ताप दैन्य जाईल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥
संत महंत सिद्ध हरिदास दाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं ॥2॥ तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥3॥
2262 काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥1॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥ घेसी
बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥2॥ लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें
मोकळीं ॥3॥ हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां ॥4॥ तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥5॥
2263 येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥1॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके
॥ध्रु.॥ न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु
॥2॥ नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे
हांवा हांवा हांवा साधावा ॥3॥
2264 हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥1॥ धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें
नांव ॥ध्रु.॥ हा चि होईजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥2॥ जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥3॥ पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ
येतें ॥4॥ तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥5॥
2265 सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥1॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं
॥ध्रु.॥ आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥2॥ तुका म्हणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥3॥
2266 करितां होया व्हावें चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं
नये ॥1॥ मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥
साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥2॥ तुका म्हणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥3॥
2267 संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥1॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला
॥ध्रु.॥ आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥2॥ तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥3॥
2268 पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥1॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥ इच्छेऐसी
आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥2॥ तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥3॥
2269 सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥1॥ करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥ सरे ऐसा
नाहीं झरा । पंक्ति करा समवेत ॥2॥ तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥3॥
2270 पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥1॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥2॥ तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥3॥
2271 तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥1॥ विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये
हेवा वाढवितां ॥ध्रु.॥ आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥2॥ तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥3॥
2272 करावा उद्धार हें तुम्हां उचित
। आम्ही केली नीत कळली ते ॥1॥ पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन
ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव
जाणतसों ॥2॥ तुका
म्हणे
माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥3॥
2273 संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥1॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत
पांडुरंगे ॥ध्रु.॥ उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥2॥ तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥3॥
2274 काळावरि घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥1॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम
नारायणा ॥ध्रु.॥ देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥2॥ तुका म्हणे होइल दरुषणें निश्चिंती । गाईन तें गीतीं ध्यान
मग ॥3॥
2275 परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया ॥1॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व
जोडा ॥ध्रु.॥ परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती
पूजा ॥2॥ तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना
। काय झालें नेणां दुर्वासया ॥3॥
2276 हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥1॥ अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥
भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥2॥ तुका म्हणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥3॥
2277 नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी
॥1॥ आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी
॥ध्रु.॥ नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें॥2॥ तुका म्हणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥3॥
2278 तरी सदा निर्भर दास । चिंता आस विरहित ॥1॥ अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ निरविलें
तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥2॥ तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥3॥
2279 वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप
नाचती नाचणें । भक्तिभावेंविण भक्ति
तैसी ॥1॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया । खादलें म्हणोनि
सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥ मुकियापासाव
सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय । नपुंसका काय करील पद्मिणी । रुचिविण वाणी तैसे
होय ॥2॥ हात पाय नाहीं करिल
तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक । हातां नये तैसा
वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥3॥
2280 मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य । वांटा लाभे त्यास
केल्या अर्धकर्माचा ॥1॥
द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती
पोसना ॥ध्रु.॥ बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी
लागे दिवाण ॥2॥ गुज
बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥3॥ शुद्ध कसूनि पाहावें वरि रंगा न भुलावें । तुका म्हणे
घ्यावें जया नये तुटी तें ॥4॥
2281 नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥1॥ सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ध्रु.॥ नावडावें
रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥2॥ तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥3॥
2282 उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं
॥1॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥
निसंग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥2॥ तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥3॥
2283 माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥1॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥ श्वान
झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥2॥ तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥3॥
2284 डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥1॥ तैसें शुद्ध करीं हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥
आपल्याचा कळवळा । आणिका बाळावरि न ये ॥2॥ तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥3॥
2285 मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥1॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न
लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥2॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥3॥
2286 आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥1॥ मज होत कां विपत्ती । पांडुरंग राहो
चित्तीं ॥ध्रु.॥ जळो तें समूळ । धन संपत्ती उत्तम कुळ ॥2॥ तुका म्हणे देवा । जेणें न घडे तुझी सेवा ॥3॥
2287 आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥1॥ तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥ अवघा
तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥3॥
2288 समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥1॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा
रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥ सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम
एकें ॥2॥ सकळ ही तीर्था प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥3॥ कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥4॥ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥5॥
2289 अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि
विधान न कळे न घडे सर्वथा ॥1॥ भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें
चि एक खंडती ॥ध्रु.॥ उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे
मुखें बोले आपुल्या ॥2॥
भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका म्हणे
नासी कुतर्क्याचे कपाळीं ॥3॥
2290 आम्ही नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि
प्रमाण ॥1॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख
घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥ भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं
निजध्यास म्हणों दास विष्णूचे ॥2॥ भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका म्हणे
सत्ता धरूं निकट सेवेची ॥3॥
2291 आम्ही हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे
पाठीसवें वागविलों ॥1॥ म्हणोनि
भिन्न भेद नाहीं देवा आम्हा एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥ निद्रा
करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तई । वान्नरें गोवळ गाई सवें चारित
फिरतसों ॥2॥ आम्हां
नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण । तुका म्हणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥3॥
2292 मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही ।
भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥1॥ गर्जो हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं
पाषाणामध्यें ॥ध्रु.॥ भाव शुद्ध नामावळी हर्षा नाचों पिटूं टाळी ।
घालूं पायांतळीं कळिकाळ त्याबळें ॥2॥ कामक्रोध बंदखाणी तुका म्हणे
दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥3॥
2293 अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥1॥ चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥ तुज
नांव जर नाहीं । तर माझें दाव काई ॥2॥ तुज
रूप नाहीं । तर माझें दाव काई ॥3॥ खळसी
तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥4॥ साच तूं लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥5॥
2294 मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥1॥ आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे
॥ध्रु.॥ रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥2॥ आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥3॥ तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥4॥
2295 नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत
॥1॥ येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा
अंगीं ॥ध्रु.॥ नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥2॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती
संत ॥3॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥4॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती
संत ॥5॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती
संत ॥6॥ तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥7॥
2296 हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥1॥ गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥2॥ तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥3॥
2297 भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥1॥ आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥
इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥2॥ तुका म्हणे आल्या थार्या । वस्तु बर्या मोलाच्या ॥3॥
2298 वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥1॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥ मेला राखे
दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥2॥ तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा ॥3॥
2299 अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुश्चित
निरंतर ॥1॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि ।
भले तुजहूनि पक्षिराज ॥ध्रु.॥ पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ
तया ॥2॥ सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा
॥3॥ तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥4॥
2300 कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही
॥ध्रु.॥ फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥ तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता
आठवूनि ॥3॥ तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.