तुकारामगाथा ४००१ - ४१००
4001 मुखें सांगे ब्रह्मज्ञान । जन लोकाची कापितो मान ॥1॥ ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥ कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥ तुका म्हणे तो चि
वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥3॥
4002 कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥1॥ सेठ्या ना चौधरी
। पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥ पाप न लगे धुंडावें ॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥2॥ जकातीचा
धंदा । तेथें पाप वसे सदा ॥3॥ गाई म्हसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥4॥ तुका म्हणे पाहीं
। तेथें पुण्या रीघ नाहीं ॥5॥
4003 तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥1॥ वांटेकरी म्हणून पुसती
आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥ लेंकीचें लेंकरूं नातु
जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥2॥ बाइलेचा
भाऊ पिसुना सोयरा । म्हणउनि करा विनोद हा ॥3॥ आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि
आतां ॥4॥ न म्हणसी लेंकी
माउसी बहिणी । आम्हां केलें धणी पापाचें त्या ॥5॥ बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥6॥ तुका म्हणे आधीं
मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥7॥
4004 मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥1॥ हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥ भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥2॥ तुका म्हणे पाहतां
घडी । जगा जोडी अंगारा ॥3॥
4005 आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥1॥ सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥ करावीं व्यसनें । दुरी येउनि नारायणें
॥2॥ जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं ॥3॥ म्हणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥4॥ तुका
म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥5॥
4006 झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥1॥ करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥ बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥2॥ तुका म्हणे ठावें
। ऐसें जालें अनुभवें ॥3॥
4007 पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥1॥ भेईना करितां पापाचे
डोंगर । दुर्जन पामर दुराचारी ॥ध्रु.॥ नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥2॥ तुका म्हणे
त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥3॥
4008 आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव ॥1॥ कां
रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥ दुजेपण
जालें वाव । त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥2॥ तुका म्हणे खरे
पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥3॥
4009 स्त्रिया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥1॥ म्हणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥ सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥2॥ आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥3॥ देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला ॥4॥ तुका
म्हणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥5॥
4010 जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥1॥ कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥ सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥2॥ तुका म्हणे सार ।
नांव जीवनाचे सागर ॥3॥
4011 ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥1॥ डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥ नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥2॥ तुका म्हणे आलें
नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥3॥
4012 तुम्हां सांगतों
कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥1॥ आम्हां
म्हणतील कंटक । ऐसा
पाडिती दंडक ॥ध्रु.॥
स्त्रिया पूजुनि सरे देती ।
भलते स्त्रियेसि भलते जाती ॥2॥ श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस । अंगीकारी मद्यमांस ॥3॥ चारी
वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ति ॥4॥ म्हणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥ ऐसें
होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥ तुका
सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥7॥
4013 त्या हरिदासांची भेटी घेतां । नर्का उभयतासी जातां ॥1॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥2॥ तुका म्हणे
नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥3॥
4014 देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें । वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥1॥ नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी । लागल्या लागें त्यागें सांडूनि । लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥ शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें । हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥2॥ आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें । पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥3॥ तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं । आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥4॥
4015 भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि
चुकला ॥1॥ करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा
भार विठ्ठलें ॥ध्रु.॥ तळीं पक्षिणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं
घाली बाळका ॥2॥ तुका म्हणे ये आवडी । आम्हीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी ।
जन्मांतरींचें ठेवणें ॥3॥
4016 कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥1॥ दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥ दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥2॥ तुका म्हणे
झोंडगीं हो । काुंफ्दा
कां हो कोरडी ॥3॥
4017 तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥1॥ कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा
॥ध्रु.॥ चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे
थोरपण ॥2॥ चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥3॥ तुका म्हणे मज
अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं स्थिर राहें ॥4॥
4018 आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार ।
तेणें चि वाढलें ॥1॥ ठेवा
जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥ बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो
विश्वास फळला ॥2॥ तुका म्हणे जालों बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी
आमचें ॥3॥
4019 न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥1॥ आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥ देईन हे काया । वरि
सांडणें सांडाया ॥2॥ तुका
म्हणे देवा । बहु आवडसी जीवा ॥3॥
4020 कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥1॥ गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥ आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥2॥ तुका म्हणे इंद्रियांसी । ये चि रसीं रंगवूं ॥3॥
4021 नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥1॥ नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥ नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥2॥ ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥3॥ जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥4॥ सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥5॥
4022 आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास
नामाचा एका भावें ॥1॥ तरी
च हरिचे दास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥ गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥2॥ तुका म्हणे देवा
ऐसी यांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥3॥
4023 पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥1॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥ अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥2॥ तुका म्हणे योग
घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥3॥
4024 कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥1॥ अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥ हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥2॥ तुका म्हणे सांगों
किती । कांहीं चित्तीं न राहे ॥3॥
4025 सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥1॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी
दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥ फांटा जाला त्यासी
नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥2॥ तुका
म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं
॥3॥
4026 आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥1॥ आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें
पांडुरंगा ॥ध्रु.॥ लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न
सोडीं ऐसें जालें ॥2॥ तुका
म्हणे आम्ही केली जे
लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥3॥
4027 तिळ एक अर्ध राई । सीतबुंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥1॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों
। सावचित्त तों ॥ध्रु.॥ तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥3॥ येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥3॥
4028. विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या
देखिल्या पतित उद्धरिलि ॥1॥ विठ्ठल विठ्ठल भावें म्हणे वाचे ।
तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥ बहुत तारिले सांगों
किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥2॥ तुका
म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥3॥
4029 भोळे भक्तिभाव धरिती
मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥1॥ भाव
नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥ गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥2॥ तुका
म्हणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥3॥
4030 आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥1॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥ एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥2॥ तुका म्हणे रांड ।
ऐसी कां ते व्याली भांड ॥3॥
4031 पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥1॥ तेथें
जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥2॥ तुका
पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥3॥
4032 बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥1॥ सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥ उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥2॥ सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥3॥ तुका जाला वाणी । चुकवुनि चौर्यांसीच्या खाणी ॥4॥
4033 काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना । प्रार्थितां ही
राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥1॥ आतां
धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी । न दिसे कोणी आवरी ।
आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥ न राहे एके ठायीं एकी घडी । चित्त तडतडा तोडी । घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥2॥ आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं । तुका म्हणे
चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥3॥
4034 पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥1॥ सोनियाची
पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥ ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥2॥ पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥3॥ चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥4॥ तुका
म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥5॥
4035 पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥1॥ पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आर्का वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥ सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥2॥ तुका
म्हणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥3॥
4036 लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥1॥ ऐसी भक्ताची माउली
। करी कृपेची साउली ॥ध्रु.॥ माय बाळकासी । जीव भाव
वेची तैसी ॥2॥ तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥3॥
4037 आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥1॥ म्हणउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥ कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥2॥ तुका म्हणे जीवीं
वसें । मज नसें वेगळे ॥3॥
4038 तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥1॥ कळों
आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥ मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥2॥ तुका म्हणे तूं चि
खरा । येर वाउगा पसारा ॥3॥
4039 खोंकरी आधन होय पाकसिद्धि । हें तों घडों कधीं शके चि ना ॥1॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥2॥ पालथे घागरी रिचवितां जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥3॥
4040 नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें
खुले ॥1॥ अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ध्रु.॥ आर्तभूता न घली
पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥2॥ एकासी
आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥3॥ एकासी
धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥4॥ तुका म्हणे ते
गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥5॥
4041 पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टीभेटी न हो त्याची ॥1॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला
॥ध्रु.॥ पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥2॥ सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति
॥3॥ तुका म्हणे अहो
देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥4॥
4042 संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥1॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरक्ति ॥2॥ आशापाशीं
बांधोनि चित्त । म्हणती जालों आम्ही मुक्त ॥3॥ त्यांचे
लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥4॥ तुका
म्हणे शब्दज्ञानें । जग
नाडियेलें तेणें ॥5॥
4043 दोष करूनि आम्ही पतित
सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥1॥ आतां
पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥ उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि । सोडा झडकरी ब्रीद आतां ॥2॥ तें
ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥3॥ देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आम्ही देवा ॥4॥ तुका
म्हणे आम्हीं उठलों
दैन्यवरि । विचारा श्रीहरी तुम्ही आतां ॥5॥
4044 राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें
संतांपुढें ॥1॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी
देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥2॥ तुका
म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥3॥
4045 देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥1॥ तो हा गवळियाचे घरीं । नाम
सारितो मुरारि ॥ध्रु.॥ धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद
॥2॥ ऐशा भक्तांसाटीं
देवें । नाना धरियेलीं नांवें ॥3॥ होय
दासांचा जो दास । तुका म्हणे विठ्ठलास ॥4॥
4046 आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें ॥1॥ केणें
आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥ बाखराची
करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥2॥ तुका
म्हणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥3॥
4047 जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥1॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥2॥ स्नान चंद्रभागे । तुका म्हणे हें चि मागें ॥3॥
4048 कां गा कोणी न म्हणे
पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥1॥ तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण
जन्मांतरिंचा ॥2॥ तुका म्हणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥3॥
4049 वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥1॥ विठोबासी
शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥2॥ अठरा पुराणीं सिद्धांत ।
तुका म्हणे हा चि हेत ॥3॥
4050 मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥1॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली
॥ध्रु.॥ न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग
धरावया ॥2॥ भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥3॥ तुका म्हणे नेदी
हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥4॥
4051 धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥1॥ कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं
॥ध्रु.॥ आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक
पशु जैसा ॥2॥ तुका म्हणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥3॥
4052 गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला
॥1॥ सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे
॥ध्रु.॥ पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण
करिताती ॥2॥ गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट
शोभताहे ॥3॥ पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका म्हणे मिठी घालूं चला ॥4॥
4053 नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥1॥ नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं
॥ध्रु.॥ तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥2॥ तुका
म्हणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पुर्या ॥3॥
4054 जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥1॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि
॥ध्रु.॥ प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें
होतीं रंगलीं विटलीं तीं ॥2॥ तुकें
हें दुर्बळ देखियलें संतीं । म्हणउनि
पुढती आणियेलें ॥3॥
4055 संकल्पिला तुज
सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥1॥ इंद्रियव्यापार जें जें कांहीं कर्म ।
करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥ माझें हित फार लागला
विचार । तुज सर्व भार चालवणें ॥2॥ जो
कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥3॥ तुका म्हणे मी तों
राहिलों निश्चिंत । तुज कळे हित तैसें करीं ॥4॥
4056 भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥1॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥2॥ तुका म्हणे चित्त
। होय आवडी मिश्रीत ॥3॥
4057 ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥1॥ तेथें
बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥ चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टी ॥2॥ तुका
म्हणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तीमय ॥3॥
4058 कोणा ही केंडावें हा आम्हां अधर्म । जो जो पावे श्रम तो तो देव ॥1॥ म्हणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥ हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें ॥2॥ तुका
म्हणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥3॥
4059 देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥1॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥ पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥2॥ तुका म्हणे वाणी ।
शुद्ध जनार्दनीं जनीं ॥3॥
4060 काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धि ठायीं
वोळगती ॥1॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥ स्वर्गसुखें आम्हीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥2॥ तुका म्हणे घरीं
आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥3॥
4061 माझें मागणें तें किती । दाता लक्ष्मीचा पति ॥1॥ तान्हेल्यानें
पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥ कल्पतरु
जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥2॥ तुका
म्हणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥3॥
4062 अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥1॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥2॥ तुका म्हणे नाव ।
जनासाटीं उदकीं ठाव ॥3॥
4063 जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥1॥ आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥2॥ तुका म्हणे अंतीं
। तुझी माझी एक गति ॥3॥
4064 सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥1॥ न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा
तेथें ॥2॥ तुका म्हणे आतां
धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥3॥
4065 काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥1॥ काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा
॥ध्रु.॥ काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न
तुझें देवा ॥2॥ काय जालें जरी केले म्यां सायास । म्हणवितों दास भक्त तुझा ॥3॥ तुका
म्हणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥4॥
4066 जातां पंढरीच्या मार्गा । काय वर्णू सुखा मग ॥1॥ घडे
लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥ नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होईजे मुक्त ॥2॥ जो
अलक्ष्य ब्रह्मादिकां । आला संनिध म्हणे तुका ॥3॥
4067 सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥1॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु
॥ध्रु.॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि
नेम अहर्णिशीं ॥2॥ तुका
म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥3॥
4068 मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥1॥ माझी कथा करा ऐसें म्हणे कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥ साह्य तूं
जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥2॥ तुका
म्हणे सर्व सिद्धि तुझे
पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥3॥
4069 जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रह्म होय ॥1॥ कोठोनियां
कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥ जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य
चक्षु ॥2॥ तुका म्हणे देव
दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥3॥
4070 पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥1॥ कां जी आम्हावरी
आणिकांची सत्ता । तुम्हासी असतां जविळक ॥2॥ तुका म्हणे पायीं
केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥3॥
4071 रात्री दिवस आम्हां युद्धाचा
प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥1॥ जीवा
ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥2॥ तुका
म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥3॥
4072 होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं
लागेन ॥1॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय
नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥ होइन मोचे वाहणा ।
पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥2॥ सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी ।
संतसज्जन चालती ॥3॥ लागें
संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं जन्माचा
॥4॥
4073 माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥1॥ आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां
॥ध्रु.॥ काय कराविया आणिका या युक्ति । काय नव्हे भक्ति विठोबाची ॥2॥ एक
पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥3॥ तुका म्हणे माझी
विठोबासी चिंता । भेईना सर्वथा न घडे तें ॥4॥
4074 कासया व्हावें जीतांचि मुक्त । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥1॥ वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम
॥ध्रु.॥ काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि
बैसोन धीरु धरीं ॥2॥ सुख
आम्हांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥3॥ तुका म्हणे मज न
लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥4॥
4075 आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥1॥ कामधेनु
कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥2॥ तुका म्हणे जीवा
थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥3॥
4076 लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥1॥ करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥ नाहीं चिंता रे आम्हांसी । तूं चि भार चालविसी ॥2॥ आम्ही जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥3॥ आम्हां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥4॥ तुका म्हणे भलते
सवें । जातां मागें मागें धांवे ॥5॥
4077 आम्हां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥1॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडा रोग ॥2॥ तुका म्हणे देवा ।
तुझे पायीं माझा ठेवा ॥3॥
4078 प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे
त्यासी ॥1॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥2॥ तुका म्हणे तया
दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥3॥
4079 संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥1॥ येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं
॥ध्रु.॥ घेईल
तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥2॥ सांगितली
सोय करुणासागरें । तुम्हां कांहो बरें न वाटतें ॥3॥ तुका म्हणे तेणें
उपकार केला । भोळ्या भाविकाला तरावया ॥4॥
4080 आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव
हे ॥1॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची
पांडुरंग ॥ध्रु.॥ काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता
कोण वारी ॥2॥ नाहीं शीण आम्हां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥3॥ तुका म्हणे खातों
आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥4॥
4081 तांबगी हें नाणें न चले खर्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥1॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया
॥ध्रु.॥ हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न
पाहाती ॥2॥ देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥3॥ तुका म्हणे काय
नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥4॥
4082 चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि
भलें ॥1॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥ हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं
नये ॥2॥ तुका म्हणे सत्य
पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥3॥
4083 आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥1॥ नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥ लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥2॥ तुका म्हणे निंदा
स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥3॥
4084 आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥1॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल
॥ध्रु.॥ क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत
टाकोनी ठाव जाळी ॥2॥ तुका
म्हणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥3॥
4085 अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥1॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥ अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया
कैंचें ॥2॥ अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥3॥ तुका म्हणे जळो
ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥4॥
4086 गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥1॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी
लोकां ॥ध्रु.॥ ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि
सद्भावा कोणे काळीं ॥2॥ तुका
म्हणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥3॥
4087 आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥1॥ फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥ दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग
॥2॥ तुका म्हणे ऐसें
आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥3॥
4088 अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥1॥ जये घरीं संत राहती आपण । तें तुम्हां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥ ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥2॥ संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका म्हणे ॥3॥
4089 संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥1॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा
॥ध्रु.॥ जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड
विषयसुख ॥2॥ ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं
प्रेमभावें ॥3॥ तुका म्हणे आम्हीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥4॥
4090 पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥1॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥ शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥2॥ तुका म्हणे नाहीं
वर्णा अभिमान । अवघे जीवनमुक्त लोक ॥3॥
4091 देखीचें तें ज्ञान करावें
तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥1॥ इंद्रियांचे
गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥ युक्तिचा आहार
नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥2॥ नाव
रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा
॥3॥ तुका म्हणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥4॥
4092 नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह
॥ध्रु.॥ असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥2॥ करोनियां साह्य पुरवीं
मनोरथ । व्हावें कृपावंत तुका म्हणे ॥3॥
4093 आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥1॥ जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥ पोटा घातलें अन्न । न म्हणे पतितपावन ॥2॥ मी
कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥3॥ तुका
म्हणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं ॥4॥
4094 स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥1॥ सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें
॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥2॥ तुका
म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें
ठोका ॥3॥
4095 जगीं कीर्ती व्हावी ।
म्हणोनी जालासी गोसावी ॥1॥ बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥ चित्तीं नाहीं अनुताप । लटिकें भगवें स्वरूप ॥2॥ तुका
म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥3॥
4096 प्राक्तनाच्या
योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥1॥ उभी
कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥ कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥2॥ यातिहीन
जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥3॥ भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं
॥4॥
4097 बोलिलों उत्कर्ष ।
प्रेमरस दाशत्वें ॥1॥ साच
करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥ समर्थ
तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥2॥ तुका
म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥3॥
4098 विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥1॥ कां
रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥ शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥2॥ तुका म्हणे सत्ता
। ज्याची काळाचिये माथा ॥3॥
4099 भ्रतार अंगसंगें सुखाची
वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥1॥ तथापि
सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥ तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥2॥ तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥3॥ तुका म्हणे संत
सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥4॥
4100 कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥1॥ न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले
॥ध्रु.॥ सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया
पामरा तारी कोण ॥2॥ विश्वास
तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥3॥ तुका म्हणे कैसें
केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥4॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.