मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा १००१ - ११००

तुकारामगाथा १००१ - ११००

1001 करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1 माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥ तुका म्हणे आहें पाक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4


1002 म्हीं गावें तुम्हीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥1 म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥ सहज घडे तया आळस करणें तें का । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥2॥ येथें नाहीं लाज भक्तीभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥3॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥4॥ सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥5


1003 देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1 देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4


1004 विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥1 साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥2॥ तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥3


1005 कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥1 कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देल ॥ध्रु.॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥2॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥3


1006 कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥1 अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि निश्चिंत जालों देवा ॥ध्रु.॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥2॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥3॥ तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घे देवा ॥4


1007 करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥1 देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥ बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥2॥ होल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हा चि मज ॥3॥ तुका म्हणे मी कर्माचे हीण म्हणऊनि सीण करीं देवा ॥4


1008 ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥1 काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥2॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥3॥ तुका म्हणे वांयां जालों भूमी भार । होल विचार काय नेणों ॥4


1009 साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥1 करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइ निवडूनि ॥2॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥3॥ तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥4


1010 नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥1 जन वन आम्हा समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥ षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥2म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥3म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥4


1011 वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥1 नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥2॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥3॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥4


1012 न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥1 आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥ कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥2॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥3॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥4॥ तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥5


1013 इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥1 इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥2॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥3॥ भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥4


1014 तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥1 अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥2॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥3॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥4


1015 जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥1 करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥2॥ जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥3॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥4


1016 नको ब्रह्मज्ञान आत्मिस्थतिभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥1 दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥2॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥3॥ तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥4


1017 मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥1 पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6


1018 तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥1 पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥2॥ न करावी निरास न धरावें उदास । देइ याचकास कृपादान ॥3॥ तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देइ पायापासीं ठाव देवा ॥4


1019 सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥1 सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥2॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोणी तो जनीं जनार्दन ॥3॥ तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥4


1020 कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥1 कुळधर्म भक्ति कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥2॥ कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥3॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥4


1021 पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1 सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4


1022 न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥1 न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥2॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥3॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥4


1023 चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥1 कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥ पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥2॥ करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥3॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥4


1024 बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1 तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥ तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5


1025 जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥1 न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥ मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥2॥ सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥3॥ ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥4॥ तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइ देवा ॥5


1026 शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥1 अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥2॥ भागलियाचा होइ रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥3॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥4॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥5


1027 कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥1 कोणापाशीं आम्हीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥2॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥3॥ कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥4॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥5


1028 तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तीपांग का1 धांवा केला आतां होल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आलें ॥2॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥3॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥4॥ तुका म्हणे आम्हीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥5


1029 तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तीहीन ॥1 कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥2॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥3॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥4॥ तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥5


1030 अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥1 अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥2॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥3॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥4॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥5


1031 संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥1 भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥2॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां भार सर्व वाहे ॥3॥ तुका म्हणे देव भक्तां वेळात । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥4


1032 देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥1 भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्ति त्याचा पार वाखाणिला ॥2॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥3॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तो चि देव देव भक्त 4


1033 हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥1 गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥2॥ निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥3॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥4॥ तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥5


1034 समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥1 आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥ न म्हणे सोइरा सुहुर्द आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥3॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥3॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥4॥ तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥5


1035 आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥1 उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥2॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥3


1036 लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥1 सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥2॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥3


1037 करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥1 प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥ राहे लोकाचार । पडे अवघा विसर ॥2॥ तुका म्हणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥3


1038 टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥1 जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥2॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥3


1039 वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥1 आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥2॥ तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेन ॥3


1040 जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥1 आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हांम्हां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥2॥ भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥3॥ नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥4॥ तुम्हांम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥5


 


1041 जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥1 म्हां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥2॥ तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाचा पती ॥3


1042 माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥1 तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥2॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥3


1043 आतां आम्हां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥1 अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥ गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥2॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥3


1044 चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥1 ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥2॥ तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥3


1045 मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥1 अवघा चि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥2॥ तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥2


1046 न करावी स्तुति माझी संतजनीं । होल या वचनीं अभिमान ॥1 भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥2॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होल माझ्या तुटी विठोबाची ॥3


1047 तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥1 नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥2॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥3


1048 चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥1 नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥ बुद्धीहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥2॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥3


1049 समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥1 अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥2॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥3


1050 गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥1 सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥2॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥3


1051 नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥1 शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥2॥ वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥3


1052 जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥1 म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥ संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥2॥ तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥3


1053 काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥1 कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥ पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥2॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥3


1054 स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥1 तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥2॥ तुका म्हणे तुमचें सेवितों उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥3


1055 बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥1 आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आलों मागें किती ॥2॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥3


पाक - अभंग 11


1056 पाकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥1 पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥2॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥3॥ तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाक अपार सुख भोगी ॥4


1057 पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥1 येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टी वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥2॥ पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥3॥ तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥4


1058 पाक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥1 आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाक त्या जग स्वामी मानी ॥2॥ ऐसें जन केलें पाइकें पाक । जया कोणी भीक न घलिती ॥3॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥4


1059 पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥1 पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥2॥ सांडितां मारग मारिती पाक । आणिकांसी शीक लागावया ॥3॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाक तयास सुख देती ॥4


1060 पाक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥1 तो एक पाक पाइकां नाक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥2॥ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥3॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥4


1061 धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥1 जिवाचे उदार शोभती पाक । मिरवती नाक मुगुटमणि ॥ध्रु.॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥2॥ कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥3॥ तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥4


1062 पाइकपणें खरा मुशारा । पाक तो खरा पाइकीनें ॥1 पाक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाक तो पणें निवडला ॥2॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥3॥ तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥4


1063 उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥1॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥ प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाक तो नांव मिरवी वांयां ॥2॥ गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥3॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाक पाहोन मोल करी ॥4


1064 एका च स्वामीचे पाक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥1॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥ हीन कमाचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥2॥ पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या ठाव ॥3॥ तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥4


1065 प्रजी तो पाक ओळीचा नाक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥1 आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥2॥ घेल दरवडा देहा तो पाक । मारी सकळीक सर्व हरी ॥3॥ तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाचा पण सिद्धी पावे ॥4


1066 जातीचा पाक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥1 धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥ जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥2॥ तुका म्हणे नमूं देव म्हुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥3॥ ॥11


1067 बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥1 आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥2॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥3॥ तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥4


1068 म्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हा लागे कोडें उगवणें ॥1 आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हा हातीं ॥ध्रु.॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥2॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥3॥ तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥4


1069 जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥1 हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥ थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥2॥ तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥3


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--


1070 अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥1 पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥ तुम्हीम्ही पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥2॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥3


1071 पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥1 कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥2॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥3


1072 जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥1 अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥2॥ तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥3


1073 क्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥1 ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥2 संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥3 शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तिमंत ॥4 दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥5 अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति । ब्रह्म ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥6॥ देहबुद्धी जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥7


1074 भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥1 म्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥ जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥2॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥3


घोंगड्याचे अभंग


1075 ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥1 पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥2 ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥3


1076 घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥1 कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥ तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥2॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥3


1077 खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥1 कान्होबाचे पडिलों गळां । घे गोपाळा दे झाडा ॥ध्रु.॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥2॥ तुका म्हणे बुद्धी काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥3


1078 घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥1 माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥2॥ तुका म्हणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥3


1079 नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥1 चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ तुम्हांम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥2॥ तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥3


1080 तुम्हांम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥1 माझें घोंगडें टाकुन दे । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥2॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥3


1081 मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥1 घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥2॥ तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥3


1082 घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥1 हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देह्यादिप माय लाविली वाती ॥2॥ न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥3


1083 आतां मी देवा पांघरों का । भिकेचें तें ही उरे चि ना ॥1 सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥2॥ तुका म्हणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥3


1084 मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥1 मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥2॥ तुका म्हणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥3


1085 घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥1 पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥2॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥3


1086 माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥1 चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥2॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥3॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥4 तुका म्हणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥5


 


 


1087 सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥1 तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥2 पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥3 गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥4


1088 यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥1 काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥2॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥3


1089 शीतळ साउली आमुची माउली । विठा वोळली प्रेमपान्हा ॥1 जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पी वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥2॥ आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥3॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥4॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाचें ॥5


रामचरित्र


1090 रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥1 केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥2॥ तुका म्हणे ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥3


1091 राम म्हणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥1 धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥2॥ राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥3॥ राम म्हणे भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥4॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त 5


1092 तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥1 तो हा न करी तें का । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥2॥ वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥3


1093 राम म्हणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1 ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3


1094 रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥1 कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥2॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणे म्यां धरिलें जीवें भावें ॥3


1095 राम म्हणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥1 राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम म्हणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥2॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥3॥ तुका म्हणे हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥4


1096 पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥1 अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । हो शरणागत किंवा युद्धासी सादर ॥2॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घे आतां संवंघेसी तुटी ॥3


1097 समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥1 कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥2॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥3


1098 केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥1 लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥ उदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥2॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥3


1099 रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥1 राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥2॥ स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥3॥ रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥4॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥5


1100 आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥1 आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥ करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥2॥ जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गावत्सें नरनारीबाळें ॥3


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.