तुकारामगाथा १६०१ - १७००
1601 आम्ही जातों
तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥ वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥2॥ अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित
जाला गुप्त तुका ॥3॥
1602 तुका उतरला तुकीं ।
नवल जालें तिहीं लोकीं ॥1॥ नित्य करितों
कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुका बैसला विमानीं । संत पाहाती
लोचनीं ॥2॥ देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥3॥
1603 न देखिजे ऐसें
केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥1॥ कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥ वाजता तो नलगे वारा
क्षीरसागरा शयनीं ॥2॥ तुका म्हणे
अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥3॥
1604 वाराणसीपयपत असों
सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥1॥ येथूनियां आम्हां जाणें निजधामा । सवें असे आम्हा गरुड
हा ॥2॥ कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका म्हणे ॥3॥
शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुन वद्य द्वितीया सोमवासरीं
प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥1॥
1605 जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस ॥1॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥ असो नसो भाव । जो
हा देखे पंढरिराव ॥2॥ चंद्रभागे न्हाती ।
तुका म्हणे भलते याती ॥3॥
1606 धरियेलीं सोंगें ।
येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें हें ब्रह्म
विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ अंतर व्यापी बाहे । धांडोळीतां
कोठें नोहे ॥2॥ योगयागतपें ।
ज्याकारणें दानजपें ॥3॥ दिले नेदी जति ।
भोग सकळ ज्या होती ॥4॥ अवघी लीळा पाहे ।
तुका म्हणे दासां साहे ॥5॥
1607 ज्याचे गर्जतां
पवाडे । कळीकाळ पायां पडे ॥1॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥ चिंतितां जयासी ।
भुक्तिमुक्ति
कामारी दासी ॥2॥ वैकुंठासी जावें । तुका म्हणे
ज्याच्या नांवें ॥3॥
1608 ज्याचे गर्जतां
पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥1॥ तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥ सिणलें सहस्त्र
तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥2॥ तुका म्हणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥3॥
1609 देव राखे तया मारील
कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥1॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे
फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥2॥ तुका म्हणे नारायण । येता गोळ्या वारी वाण ॥3॥
1610 कोठे गुंतलासी
द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥1॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य
॥ध्रु.॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥2॥ तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥3॥
1611कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज
॥1॥ कोठें गुंतलासी भक्तिप्रेमसुखें । न सुटेती
मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥ काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥2॥ काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि
श्रीपती कोपलासी ॥3॥ काय जालें सांग
माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका म्हणे ॥4॥
1612 परस्त्रीतें म्हणतां
माता । चित्त लाजवितें चित्ता ॥1॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारिष्टगोष्टी
सांगे । उष्ट्या
हाते नुडवी काग ॥2॥ जें जें कर्म वसे
अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥3॥ बोले तैसा चाले । तुका म्हणे तो
अमोल ॥4॥
1613 असत्य वचन होतां
सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥1॥ जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते
॥ध्रु.॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं
गेला ॥2॥ तुका म्हणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥3॥
1614 जळों त्याचें तोंड
। ऐसी कां ते व्याली रांड ॥1॥ सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥ फोडिली गोंवरी । ऐसी दिसे
तोंडावरी ॥2॥ तुका म्हणे
नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥
1615 तोंडें खाये फार ।
पादे बोचा करी मार ॥1॥ एक ऐसे ते शाहाणे ।
आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे । रागें पाहे लोकांकडे ॥2॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥3॥ निजतां आला मोहो । वीतां म्हणे
मेला गोहो ॥4॥ तुका म्हणे
त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥5॥
1616 पतिव्रता नेणे
आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥1॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें
॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥2॥ तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥3॥
1617 पंडित म्हणतां
थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥1॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें
तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥2॥ तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥3॥
1618 पंडित तो चि एक भला
। नित्य भजे जो विठ्ठला ॥1॥ अवघें सम ब्रह्म
पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं
वासुदेव ॥2॥ तुका म्हणे तो
चि दास । त्यां देखिल्या जाती दोष ॥3॥
1619 ऐका पंडितजन ।
तुमचे वंदितों चरण ॥1॥ नका करूं नरस्तुति
। माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥2॥ तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥3॥
1620 विठ्ठल टाळ विठ्ठल
दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥1॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल
भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥2॥ विठ्ठल सुखा विठ्ठल
दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥3॥
1621 काय तुझें वेचे मज
भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥1॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी
॥ध्रु.॥ काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥2॥ तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥3॥
1622 संतनिंदा ज्याचे
घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥1॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे
ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥2॥ तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥3॥
1623 आलें देवाचिया मना
। तेथें कोणाचें चालेना ॥1॥ हरिश्चंद्र
ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥ पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनि केले
दुरी ॥2॥ तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥3॥
1624 निजल्यानें गातां
उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥1॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा
॥ध्रु.॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥2॥ तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥3॥
1625 काम क्रोध आम्ही
वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥1॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी
सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥2॥ तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥3॥
1626 उठाउठीं अभिमान ।
जाय ऐसें स्थळ कोण ॥1॥ तें या पंढरीस घडे
। खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥ अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥2॥ तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥3॥
1627 पंढरी पंढरी । म्हणतां पापाची
बोहोरी ॥1॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी
लोटांगणीं । प्रेमसुखाचिया खाणी ॥2॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे
तुका ॥3॥
1628 भार घालीं देवा । न
लगे देश डोई घ्यावा ॥1॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमित्त । फळ देतसे संचित ॥2॥ तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥3॥
1629 भोग भोगावरी द्यावा
। संचिताचा करुनी ठेवा ॥1॥ शांती धरणें
जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥2॥ तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥3॥
1630 येथें बोलोनियां
काय । व्हावा गुरू तरि जाय ॥1॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा । जंव आहेसि तुं
जीता ॥2॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥3॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥4॥ आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळीकाळाचें
शीर ॥5॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥6॥ तुका म्हणे मुक्ति । नाहीं आस चि ये चित्ती ॥7॥
1631 आनुहातीं गुंतला
नेणे बाह्य रंग । वृत्ती येतां मग बळ लागे ॥1॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥ आणिकांची वाणी वेद
तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥2॥ तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥3॥ तुका म्हणे बाह्य रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥4॥
1632 ब्रह्मरसगोडी
तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥1॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या
॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥2॥ तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥3॥ तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥
1633 जैसें तैसें राहे
देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥1॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे
त्यासी ॥ध्रु.॥ मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों
कांहीं ॥2॥ तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥3॥
1634 आम्हां
हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥1॥ देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥ जैसा केला तैसा होय । धांवे सोय धरोनि
॥2॥ तुका म्हणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥3॥
1635 परद्रव्यपरनारीचा
अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥1॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस
॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥2॥ तुका म्हणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥3॥
1636 समर्थाचें केलें ।
कोणां जाईल मोडिलें ॥1॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा ।
आपुलाला तैसा खावा ॥2॥ ज्याचें त्याचें
हातीं । भुके तयाची फजिती ॥3॥ तुका म्हणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥4॥
1637 हे माझी मिराशी ।
ठाव तुझ्या पायांपाशीं ॥1॥ याचा धरीन अभिमान ।
करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव । बळी साधिला हा ठाव ॥2॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥3॥
1638 नेणे गति काय कवण
अधोगति । मानिली निश्चिंती तुझ्या पायीं ॥1॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला
॥ध्रु.॥ नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । म्हणऊनि
पाय धरिले तुझे ॥2॥ वेडा मी अविचार न
कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥3॥ तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥4॥
1639 तुझा म्हणऊनि
जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥1॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा
॥ध्रु.॥ देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥2॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया॥3॥ तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥4॥
1640 मारगीं चालतां
पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥1॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी
लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥2॥ तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥3॥
1641 जालों आतां दास ।
माझे तोडोनियां पाश ॥1॥ ठाव द्यावा
पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥ सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥2॥ तुका म्हणे भय । करा जवळी तें नये ॥3॥
1642 अंतरींचें जाणां ।
तरि कां येऊं दिलें मना ॥1॥ तुमची करावी म्यां
सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥ नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥2॥ तुका म्हणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥3॥
1643 पवित्र होईन चरित्रउच्चारें ।
रूपाच्या आधारें गोजिरिया ॥1॥ आपुरती बुद्धी पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाईन ओविया
शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥2॥ तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥3॥
1644 काय ऐसा जन्म जावा
वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥1॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा
॥ध्रु.॥ शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥2॥ तुका म्हणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥3॥
1645 नाहीं कोणी दिस जात
वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥1॥ एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें
॥ध्रु.॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥2॥ तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईल ते ॥3॥
1646 काय करील तें नव्हे
विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥1॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे
॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥2॥ तुका म्हणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥3॥
1647 संध्या करितोसी
केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥1॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें
॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें
सांडी ॥2॥ तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥3॥
1648 दुधाचे घागरी
मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥1॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें
॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां
गेलीं ॥2॥ तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥3॥
1649 सांगावें तें बरें
असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धी मग ॥1॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत
बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥2॥ तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥3॥
वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र
धाडिलें - ते अभंग ॥4॥
1650 परिसें वो माते
माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये
॥ध्रु.॥ जीतां भुक्ति
मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥2॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें
॥3॥
1651 तुह्मी विश्वनाथ ।
दीनरंक मी अनाथ ॥1॥ कृपा कराल ते थोडी
। पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हांपाशीं । मी तों अल्पें चि संतोषी ॥2॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥3॥
1652 पिंड पदावरी । दिला
आपुलिये करीं ॥1॥ माझें जालें
गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर
॥2॥ तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥3॥
1653 मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥1॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं ।
असें आर्तभूत पोटीं ॥2॥ जीवींचें ते जाणा ।
तुका म्हणे नारायणा ॥3॥
1654 जाय तिकडे लागे
पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥1॥ हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥ दावूनियां रूप
डोळां । मन चाळा लावियेलें ॥2॥ आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥3॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥4॥ तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥5॥
1655 नको ऐसें जालें
अन्न । भूक तान ते गेली ॥1॥ गोविंदाची आवडी
जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥2॥ देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥3॥ जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥4॥ तुका म्हणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥5॥
1656 वाट पाहें हरि कां
नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥1॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला
॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती
॥2॥ नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥3॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवाळीलें ॥4॥ तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥5॥
1657 नाहीं दिलें कधीं
कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥1॥ म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥ वेळोवेळां वाचे
आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥3॥
1658 आतां न करीं सोस ।
सेवीन हा ब्रह्मरस ॥1॥ सुखें सेवीन अमृत ।
ब्रह्मपदींचें निश्चित ॥ध्रु.॥ तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥2॥ तुका म्हणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥3॥
1659 जेथें जेथें जासी ।
तेथें मज चि तूं पासी ॥1॥ ऐसा पसरीन भाव ।
रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥ चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥2॥ तुका म्हणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥3॥
1660 सांपडला हातीं ।
तरी जाली हे निश्चिंती ॥1॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें
समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥2॥ तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥3॥
1661 मुक्तिपांग
नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥1॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान
॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥2॥ बळ बुद्धी त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥3॥ दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥4॥ तुका म्हणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥5॥
1662 सेवीन उच्छिष्ट
लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥1॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे
जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥2॥ तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥3॥
1663 क्षेम देयाला हो ।
स्फुरताती दंड बाहो ॥1॥ आतां झडझडां चालें
। देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥ सांडीं हंसगती ।
बहु उत्कंठा हे चित्तीं ॥2॥ तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥3॥
1664 जेणें वेळ लागे ।
ऐसें सांडीं पांडुरंगे ॥1॥ कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं
घेई ॥ध्रु.॥ नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥2॥ टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥3॥ हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥4॥ तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥5॥
1665 कृपेचा ओलावा ।
दिसे वेगळा चि देवा ॥1॥ मी हें इच्छीतसें
साचें । न लगे फुकटशाई काचें ॥ध्रु.॥ जेणें जाय कळसा । पाया उत्तम तो तैसा ॥2॥ तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥3॥
1666 दावूनियां कोणां
कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥1॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी
ऐसे आड । येती नाड नागवूं ॥2॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥3॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥4॥ तुका म्हणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥5॥
1667 काय माता विसरे
बाळा । कळवळा प्रीतीचा ॥1॥ आवडीनें गळां मिठी
। घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥ लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥2॥ भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥3॥ माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥4॥ तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणां बुझावूं ॥5॥
1668 तरीं आम्ही तुझी
धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥1॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे
॥ध्रु.॥ पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥2॥ तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥3॥
1669 करावा कांटाळा नव्हे
हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥1॥ जाणतसां तुम्ही रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥ काय म्हणऊनि
आलेती आकारा । आम्हां उजगरा करावया ॥2॥ तुका म्हणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥3॥
1670 धरूनि पालव असुडीन
करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥1॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश
॥ध्रु.॥ अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं
॥2॥ रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥3॥ सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥4॥ तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥5॥
1671 निष्ठे
उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥1॥ तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता
पांडुरंगा ॥ध्रु.॥ मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों
॥2॥ पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥3॥ राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥4॥ तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥5॥
1672 सांगतां गोष्टी
लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥1॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों
। आतां सोस कासया ॥2॥ तुका म्हणे जतन
करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥3॥
1673 मजशीं पुरे न पडे
वादें । सुख दोहींच्या संवादें ॥1॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार ।
दुःख साहोनि अपार ॥2॥ तुका म्हणे
नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥3॥
1674 तुज नाहीं शक्ति । काम घेसी आम्हां हातीं ॥1॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आम्हां तुझा
कैवाड ॥2॥ तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥3॥
1675 तुझाठायीं ओस ।
दोन्ही पुण्य आणि दोष ॥1॥ झडलें उरलें किती ।
आम्ही धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा ।
यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥2॥ तुका म्हणे
बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥3॥
1676 भांडावें तों हित ।
ठायी पडा तें उचित ॥1॥ नये खंडों देऊं वाद
। आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं
तुटी ॥2॥ तुका म्हणे आळस । तो चि कारणांचा नास ॥3॥
1677 नव्हों गांढे आळसी
। जो तूं आम्हांपुढें जासी ॥1॥ अरे दिलें आम्हां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥ धरोनियां वाट । जालों शिरोमणि
थोंट ॥2॥ तुका म्हणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥
1678 तुझा विसर नको
माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥ कुश्चीळ इंद्रियें
आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥ पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां
॥3॥ पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी
देणें ॥4॥ तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥
1679 ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज
करा कृपा देवा ॥1॥ वचनांसारिखें तळमळी
चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥ तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं ।
सत्यत्वें जाणसी दास खरा ॥2॥ तुका म्हणे
सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥3॥
1680 आदि वर्तमान जाणसी
भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥1॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा
॥ध्रु.॥ आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें
॥2॥ तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥3॥
1681 सुखें न मनी अवगुण
। दुःख भोगी त्याचें कोण ॥1॥ हें कां ठायींचें न
कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥2॥ तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥3॥
1682 आम्ही न
देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥1॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥ मज मुक्ती सवें
चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥2॥ तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाटीं ॥3॥
1683 मज नाहीं तुझ्या ज्ञानाची
ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥1॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें
॥ध्रु.॥ भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥2॥ तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥3॥
1684 काय माझी संत
पाहाती जाणीव । सर्व माझा भाव त्यांचे पायीं ॥1॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥ बोबडा उत्तरीं म्हणे
हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें ॥2॥ तुका म्हणे तुम्ही
विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची॥3॥
1685 जीवाचें जीवन
अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥1॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥ गोडाचें ही गोड
हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥2॥ भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे
॥3॥ तुका म्हणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥4॥
1686 आतां मी सर्वथा
नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥1॥ माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥ बापुडा मी नव्हें
दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥2॥ दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥3॥ संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥4॥ तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥5॥
1687 केलें नाहीं मनीं
तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥1॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग
॥ध्रु.॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना
॥2॥ तुका म्हणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥3॥
1688 हित व्हावें तरी
दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥ आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं
निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥ तुका म्हणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥
1689 हो कां नर अथवा
नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर
निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥2॥ तुका म्हणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥3॥
1690 हरिची हरिकथा नावडे
जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर
साधिलें कुंभपाक ॥1॥ कासया जन्मा आला तो
पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं । उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं
॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी । देवधर्मांविण तो हा
चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥2॥ राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे
चुकी जरी यासी ॥3॥
1691 उपेक्षिला
येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आइकीली ॥1॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां
॥ध्रु.॥ माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥2॥ तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥3॥
1692 आवडीसारिखें
संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥1॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी
॥ध्रु.॥ हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥2॥ तुका म्हणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ती ॥3॥
1693 धन्य मी मानीन
आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥1॥ धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा
हातीं ॥ध्रु.॥ ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥2॥ तुका म्हणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥3॥
1694 आवडी न पुरे
सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥1॥ न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि
मागों ॥ध्रु.॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥2॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥3॥
1695 नाहीं त्रिभुवनीं
सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥1॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा
॥ध्रु.॥ शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता
॥2॥ तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥3॥
1696 मायबापापुढें
लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥1॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग
॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळीते ॥2॥ तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥3॥
1697 आठवों नेंदी आवडी
आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥1॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ
॥ध्रु.॥ न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं
रिता उरों दिला ॥2॥ तुका म्हणे
समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥3॥
1698 उत्तम घालावें
आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥1॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात
॥ध्रु.॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥2॥ तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥3॥
1699 आम्हां
अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥1॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥ आम्हां
आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥2॥ तुका म्हणे आम्ही नेघों या मुक्ती । एकविण चित्तीं दुजें नाहीं ॥3॥
1700 चला पंढरीसी जाऊं ।
रखुमादेवीवरा पाहूं ॥1॥ डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥ध्रु.॥ संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥2॥ तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥3॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे
माझी भाक ॥4॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.