तुकारामगाथा १७०१ - १८००
1701 पैल घरीं जाली चोरी
। देहा करीं बोंब ॥1॥ हाबा हाबा करिसी
काये । फिराऊनि नेट्या वायें ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥2॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥3॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥4॥ तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥5॥
1702 किती वेळा खादला
दगा । अझून कां जागसी ना ॥1॥ लाज नाहीं हिंडतां
गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥ सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे
न देखसी ॥2॥ तुका म्हणे
सांडिती वाट । तळपट करावया ॥3॥
1703 मुदलामध्यें पडे
तोटा । ऐसा खोटा उदीम ॥1॥ आणिकांची कां लाज
नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥2॥ तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥3॥
1704 निरोप सांगतां । न
धरीं भय न करीं चिंता ॥1॥ असो ज्याचें त्याचे
माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥2॥ तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥3॥
1705 शूरत्वासी मोल ।
नये कामा फिके बोल ॥1॥ केला न संडी कैवाड
। जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥2॥ तुका म्हणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥3॥
1706 हरिच्या दासां भये
। ऐसें बोलों तें ही नये ॥1॥ राहोनियां आड । उभा
देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरिच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥2॥ खावे
ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥3॥
1707 दासां सर्व काळ ।
तेथें सुखाचे कल्लोळ ॥1॥ जेथें वसती हरिदास
। पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥2॥ तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥3॥
1708 आमचा स्वदेश ।
भुवनत्रयामध्यें वास ॥1॥ मायबापाचीं लाडकीं
। कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥ नाहीं निपराद । कोणां आम्हांमध्यें
भेद ॥2॥ तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धन ॥3॥
1709 काय ढोरापुढें
घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥1॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे
॥ध्रु.॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥2॥ तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥3॥
1710 आनंदें एकांतीं
प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥1॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी
॥ध्रु.॥ झणी दृष्टी लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥2॥ तुका म्हणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥3॥
1711 मोक्षपदें तुच्छ
केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥1॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस ।
पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥2॥ तुका म्हणे चित्त निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें
विटेवरि ॥3॥
1712 नको बोलों भांडा ।
खीळ घालुन बैस तोंडा ॥1॥ ऐक विठोबाचे गुण ।
करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥ प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥2॥ तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥3॥
1713 अति जालें उत्तम
वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥1॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥ शूरत्वावांचूनि
शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥2॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईवीण
नाहीं ॥3॥
1714 शूरां साजती
हतियारें । गांढ्या हासतील पोरें ॥1॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे । सिंदळ काजळ लेतां
लाजे ॥2॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥3॥ मान बुद्धीवंतां । थोर न मनिती पिता ॥4॥ तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥5॥
1715 काय केलें जळचरीं ।
ढीवर त्यांच्या घातावरी ॥1॥ हा तों ठायींचा
विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥2॥ तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥3॥
1716 वाइटानें भलें ।
हीनें दाविलें चांगलें ॥1॥ एकाविण एका । कैचें
मोल होतें फुका ॥ध्रु.॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥2॥ काळीमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥3॥ उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥4॥ तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥5॥
1717 असो खळ ऐसे फार ।
आह्मां त्यांचे उपकार ॥1॥ करिती पातकांची
धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥ फुकाचे मजुर । ओझें वागविती भार ॥2॥ पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥3॥
1718 संत पंढरीस जाती ।
निरोप धाडीं तया हातीं ॥1॥ माझा न पडावा विसर
। तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥2॥ तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥3॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥4॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥5॥ लागती पादुका । ते मी तळील मृत्तीका ॥6॥ तुका म्हणे पंढरिनाथा । दुजें न धरावें सर्वथा ॥7॥
1719 इच्छेचें पाहिलें ।
डोळीं अंतीं मोकलिलें ॥1॥ यांचा विश्वास तो
काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पाळीतां ।
केश फिरले जाणतां ॥2॥ पिंड पाळितां
ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥3॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥4॥ अल्प जीवन करीं । तुका म्हणे
साधीं हरी ॥5॥
1720 यज्ञानिमित्त
तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥1॥ नव्हे
ते भक्ती परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची ।
तीर्थाव्रतीं मुक्ती
कैंचि ॥2॥ तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥3॥
1721 संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम
उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया
॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें
घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥ अंतकाळीं गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम
उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें
॥3॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका म्हणे
भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥
1722 दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें
जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥1॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया
नरा । जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा
॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो । कुचर मुग नये चि
पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥2॥ तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रयत्न कांहीं । म्हणऊनि
संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥3॥
1723 कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं
आतां ॥1॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे
देवा ॥ध्रु.॥ गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥2॥ फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥3॥ वाहूं दक्षिणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काई ॥4॥ गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥5॥ तुका म्हणे मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥6॥
1724 गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं
॥1॥ रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥ विषयांच्या सुखें
अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥2॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी
॥3॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें
शरीर पुष्ट लोभें ॥4॥ तुका म्हणे मग
केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥5॥
1725 तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥1॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला
देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥2॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥3॥ मृत्तीका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥4॥ तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥5॥
1726 जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळीलें
वरीं वरीं ॥1॥ अंतरींचें शुद्ध
कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥ इंद्रावण फळ घोळीलें
साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥2॥ तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया स्फुंदी तुम्हीं ॥3॥
1727 बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥1॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरि
मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥2॥ तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥3॥
1728 धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥1॥ न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें
॥ध्रु.॥ सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥2॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥3॥ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥4॥
1729 धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥1॥ धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं
॥ध्रु.॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥2॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥3॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥4॥ तुका म्हणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥5॥
1730 मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥1॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ कर्णद्वारें
पुराणिक । भुलवी शब्दें लावी भीक ॥2॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥3॥ आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥4॥ तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥5॥
1731 मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर
नाहीं ॥1॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें
॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें
तडातडी चित्त माझें ॥2॥ तुका म्हणे
माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥3॥
1732 मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥1॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांटवणें
प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥2॥ तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥3॥
1733 जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥1॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥ सुखाची विश्रांती ।
उमटे मातेचिये चित्तीं ॥2॥ तुका म्हणे संत
। तुम्ही बहु कृपावंत ॥3॥
1734 यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥1॥ घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे
तोंवरी च नाड ॥2॥ तुका म्हणे
देवें । माझें सिद्धी पाववावें ॥3॥
1735 लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥1॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व
ही साहे ॥2॥ तुका म्हणे
माझें । तैसे तुम्हां संतां ओझें ॥3॥
1736 आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥1॥ जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥ आम्हीं जना
भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें ॥2॥ तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥3॥
1737 तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥1॥ आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं ।
देव वसे घरीं रानीं ॥2॥ तुका म्हणे भये
। आतां स्वप्नीं ही नये ॥3॥
1738 काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥1॥ करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी ।
वदे आमुचे समोरी ॥2॥ तुका म्हणे बाण
। हातीं हरिनाम तीक्ष्ण ॥3॥
1739 जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन
मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥1॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां
ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥ घरा व्याही पाहुणा आला । म्हणे
त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥2॥ उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें म्हणे
यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥3॥ पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला म्हणे
पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी आला ॥4॥ दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । म्हणे
आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥5॥ तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया ।
आडकुनि दार बैसे दारीं । आल्या घर म्हणे ओस ॥6॥ तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी । या ही तारीं जीवांसी । माझ्या भय
वाटे चित्तीं । नरका जाती म्हणोनि ॥7॥
1740 जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥1॥ तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां
पावे नास ॥ध्रु.॥ वेची अनुष्ठान । सिद्धी कराया प्रसन्न ॥2॥ तुका म्हणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥3॥
1741 घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥1॥ आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥ उगवूं जाणों मोडी ।
जाली नव्हे त्याची जोडी ॥2॥ तुका म्हणे
पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥3॥
1742 सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥1॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं ।
नाहीं पुसायाची गुंती ॥2॥ तुका म्हणे बरा
। आहे ढसाळ वेव्हारा ॥3॥
1743 तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥1॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें ।
मागें नसावें पारिखें ॥2॥ मागें पुढें ॠण ।
तुका म्हणे फिटे हीण ॥3॥
1744 नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥1॥ जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥ राहों नेदी बाकी ।
दान ज्याचें त्यासी टाकी ॥2॥ होवा वाटे जना ।
तुका म्हणे साटीं गुणां ॥3॥
अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला
तो ज्यानें शमला तो अभंग
1745 चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती
सर्प तया ॥1॥ विष तें अमृत
अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥ दुःख तें देईल सर्व सुख फळ ।
होतील शीतळ अग्निज्वाळा ॥2॥ आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥3॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥4॥
1746 लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥1॥ मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण
॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्ष्ण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥2॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप
त्याचें ॥3॥ तुका म्हणे
दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥4॥
1747 बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥1॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा ।
जल्पे रोगी मेळवी दाढा ॥2॥ खाऊं नये तें चि
मागे । निवारितां रडों लागे ॥3॥ वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥4॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥5॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥6॥ तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥7॥
1748 पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥1॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं
आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥2॥ शूरा उल्हास अंगीं । गांढ्य मरण
ते प्रसंगीं ॥3॥ शुद्ध सोनें उजळे
अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥4॥ तुका म्हणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥5॥
1749 चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥1॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥ विष सेवूनि वारी
मागें । प्राण जातां जेणें संगें ॥2॥ बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥3॥ तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥4॥
1750 कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे
घरीं ॥1॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा
॥ध्रु.॥ पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईन त्यांचे घरीं
पशुयाति ॥2॥ विठ्ठलचिंतन
दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥3॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥4॥ तुका म्हणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥5॥
1751 अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा
तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा
तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥ माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान ।
कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें
चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं
बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग
सर्वस्वें केला । सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥ एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं
माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे
माव न कळे चि तुझी । म्हणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक
माझी ॥3॥
1752 आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें ।
आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर
श्वानासी भक्षितां । याती तयाचा गुण । तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात
पाय कान ॥1॥ काय जालें यांस
वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी
टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥ सिद्धीं सेविलें
सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती । वरुषलें सर्वत्र जळ
। कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ । तें चि भुजंगें
धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥2॥ भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां
घसां अंगोळीया । हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी
बाळें । तुका म्हणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥3॥
1753 चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती
द्वीपांतरीं ॥1॥ एका ओझें एका लाभ
घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥ क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी
तें जावें भोगें दुरी ॥2॥ तुका म्हणे ऐसी
बुद्धी ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥3॥
1754 तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥1॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता
॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥2॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंद्रियें
सुनाट दाही दिशा ॥3॥ वेरझारीफेरा सिणलों
सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥4॥ तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥5॥
1755 स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी
बुडती ॥1॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां
वाट चुकले ॥ध्रु.॥ तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती
पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥2॥ तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी । वेठी आणि करियेले
॥3॥ अखंड ते ध्यान । समबुद्धी
समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥4॥ करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे
साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥5॥
1756 माझिया संचिता । दृढ देखोनि बळीवंता ।
पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥1॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान
करिसी लोकांत ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय
तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥2॥ भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण
। तुज म्यां सीण करावा ॥3॥ तुज नव्हतां माझें
कांहीं । परि मी न संडीं भक्तिसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥4॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा
। कांहीं न धरीं संकोच ॥5॥
1757 लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख ।
तुझिये भेटीवांचूनि ॥1॥ तरी मज ये भेट ये
भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥ काय ब्रह्मज्ञान करूं
कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥2॥ आत्मस्थितीचा विचार । काय करूं हा उद्धार । न देखतां धीर ।
चतुर्भुज मज नाहीं ।3॥ रिद्धीसिद्धी काय
करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥4॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें । तुका म्हणे
द्यावें । दरुषण पायांचें ॥5॥
1758 तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥1॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय
शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥2॥ तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥3॥
1759 उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी ।
रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥1॥ तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण
। उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥ जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी ।
विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥2॥ पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी ।
यागीं बिरडें चोळीचें ॥3॥ करी
गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥4॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणे
आतां । कोड पुरवीं हें माझें ॥5॥
1760 मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥1॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी
॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥2॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥3॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें
॥4॥ तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥5॥
1761 भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥1॥ न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥2॥ तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥3॥
1762 दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥1॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥2॥ देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव
नाहीं ॥3॥
1763 माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन
आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी
मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला । तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥1॥ असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप । बाळकासी चिंता काय
पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥ पापपुण्यें श्रुति आटिल्या । शास्त्रांस न लगे
चि ठाव । विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव । ओंकाराचें मूळ
व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव । म्हणऊन काबाड सांडिलें
उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥2॥ तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान
करवूं कवणा । हातीं अधीन तें मज काई । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं
। मायामोहपाश करीं विष तैसें । तुका म्हणे माझ्याठायीं ॥3॥
1764 तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥1॥ रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥2॥ तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हांसी ॥3॥
1765 धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥1॥ क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥ अवघे
खेळों अवघ्यामधीं । डोई न पडों ऐसी बुद्धी ॥2॥ तुका
म्हणे
वांचवीत । आम्हां सत्ता समर्थ ॥3॥
1766 एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि ॥1॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥ दुसरा
परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥2॥ तुका म्हणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ म्हूण ॥3॥
1767 बोलविले जेणें । तो चि याचें गुह्य जाणे
॥1॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥2॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥3॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥4॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥5॥ त्याच्या साच गाई म्हैसी ।
येणें खेळावें मातीशीं ॥6॥ तुका
म्हणे बोल
। माझा बोलतो विठ्ठल ॥7॥
1768 कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥1॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला
॥ध्रु.॥ स्वामिसेवा म्हूण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥2॥ तुका म्हणे नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥3॥
1769 सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥1॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये
॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥2॥ तुका म्हणे तरी म्हणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥3॥
1770 नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें आतां नाहीं ॥1॥ ज्याचें तो बळीवंत सर्व निवारिता । आम्हां काय
चिंता करणें लागें ॥ध्रु.॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं
तया ॥2॥ तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥3॥
1771 बळीवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळीकाळासी
॥1॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं
॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥2॥ तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥3॥
1772 एका गावें आम्हीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥1॥ मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा
॥ध्रु.॥ लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥2॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥3॥
1773 वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥1॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें
॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥2॥ तुका म्हणे खूण न कळे चि निरुती । सांपडलों हातीं
अहंकाराचे ॥3॥
1774 आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों
दास ॥1॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा
चि ॥ध्रु.॥ मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥2॥ तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥3॥
1775 सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥1॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा
॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥2॥ परउपकार घडे तो भला । नाठ्याळ तया
दया नाहीं ॥3॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥4॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे
पिसें लागलें यास ॥5॥
1776 तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी
॥1॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिर कान तुझी
कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥3॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो
जळो ॥3॥ हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥4॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड
नाम तुझें ॥5॥
1777. म्हणसी
होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं ।
संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥1॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता
पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती
तडातोडी आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥2॥ मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी । जागा होई करीं हिताचा उपाय
। तुका म्हणे हाय करिसी मग ॥3॥
1778 कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा
धांवा तुवां केला विठाई ॥1॥
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥ भक्तांच्या
कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥2॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य
प्रेमपान्हा पाजिला ॥3॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥4॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें
कैसी जाली माउली ॥5॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥6॥ कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार
। करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥7॥
1779 कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि
निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥1॥ कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक । कायावाचामन ठेविलें
तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥ध्रु.॥ जळें जळ काय
धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें । पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ
समर्पिली ॥2॥ पितरस्वरूपी तूं चि जनार्दन । सव्य तें कवण
अपसव्य । तुका म्हणे जीत पिंड तुम्हां हातीं । देऊनि निश्चिती मानियेली ॥3॥
1780 सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं
संसारापासोनियां ॥1॥ न
सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं
जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥2॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥3॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां
॥4॥ जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥5॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥6॥ तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि
आशा मोकलिली ॥7॥
1781 देवाचा भक्त
तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे
च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥1॥ निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत
कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥ प्रातःस्नान करी विभूतिचर्चन ।
दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या
चांडाळा काय जालें ॥2॥ गातां शंका नाहीं
बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ । घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥3॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि
गोपाळा दुर्लभ तो । तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥4॥
1782 कस्तुरी भिनली जये मृत्तीके ।
तयेसी आणिके कैसी सरी ॥1॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥2॥ तुका म्हणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥
1783 अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा
तरे ॥1॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे
॥ध्रु.॥ ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तिविण
तें च ब्रह्म नव्हे ॥2॥ काय
मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥3॥ तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥4॥
1784 नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत
झणी ॥1॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया
॥ध्रु.॥ मज मूढा शक्ति कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥2॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि
ध्यान ॥3॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥4॥
1785 देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे
खावें काय चिंता ॥1॥ देवा
विचारावें लागे पापपुण्य । आम्हांसी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पत्ति लागला
संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥2॥ देवासी काम लागला धंदा । आम्हांसी ते
सदा रिकामीक ॥3॥ तुका
म्हणे आम्ही भले
देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥4॥
1786 घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं
॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥2॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें
॥3॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥4॥
1787 देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥1॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगीं
लावीन ॥ध्रु.॥ आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥2॥ न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही
बळकाविले दोष ॥3॥ दिशा
भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥4॥ तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥5॥
1788 लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव
शुद्ध बोला ॥1॥
अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥2॥ तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥3॥
1789 नव्हे ब्रह्मज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥1॥ काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ
जाणिवेचा ॥ध्रु.॥ मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥2॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी। आपण उपवासी मरोनिया ॥3॥ तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥4॥
1790 गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥1॥ रवि दीप काळीमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥2॥ परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥3॥ तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥4॥
1791 परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥1॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक
॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥2॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥3॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता
तुका म्हणे ॥4॥
1792 तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥1॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥ धान्यें
बीजें जेणें जाळीलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥2॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥3॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥4॥ तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥5॥
1793 संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥1॥ जेथें तेथें आपण आहे । आम्हीं
करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥2॥ गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें
तें कैसें ॥3॥
स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥4॥ तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥5॥
1794 आण काय सादर । विशीं आम्हां कां
निष्ठ ॥1॥ केलें भक्त
तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥ काय पंगतीस कोंडा ।
एकांतासी साकरमांडा ॥2॥ काय
एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥3॥ काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥4॥ तुका म्हणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥5॥
1795 चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥1॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥ आम्ही
सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥2॥ इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥3॥ न पडे विसर । तुझा आम्हां
निरंतर ॥4॥ प्रेम एकासाटी । तुका म्हणे न
वेचे गांठी ॥5॥
1796 आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय
होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥1॥ आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥ अन्याय
एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि । काय ते शूरत्व
मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥2॥ पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी । नव्हे कीर्त कांहीं
न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥3॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष
काई । तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्हीं नाहीं
॥4॥
1797 काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥1॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥2॥ बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना
मथुरेचें ॥3॥
पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले ॥4॥ तुका म्हणे हा भक्तांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥5॥
1798 तुजविण देवा । कोणा म्हणे माझी
जिव्हा ॥1॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं
इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥2॥ तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर ॥3॥
1799 आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥1॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥ आसनीं
भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥2॥ तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥3॥
1800 नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥ म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर
जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥ तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.