तुकारामगाथा २७०१ -२८००
2701 चोराचिया
धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥1॥ ऐशा आम्हीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे
खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥2॥ तुका म्हणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥3॥
2702 बुद्धीहीना
उपदेश । तें तें विष अमृतीं ॥1॥ हुंगों नये गोहवाडी ।
तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें ।
जैसें मढें निष्काम ॥2॥ तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥3॥
2703 न करीं
तुमची सेवा । बापुडें मी पण देवा । बोलिलों तो पाववा । पण
सिद्धी सकळ ॥1॥ आणीक काय तुम्हां काम ।
आम्हां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती
॥ध्रु.॥ आम्ही वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें । संयोगाचें बरें ।
गोड होतें उभयतां ॥3॥ एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी । जाला तरी बळी ।
स्वामीविण शोभेना ॥3॥ रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता । होईन सरता
। संतांमाजी पोसणा ॥4॥ ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा । तुका म्हणे बरा
। रोकडा चि निवाड ॥5॥
2704. भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥1॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥
नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥2॥ तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥3॥
2705 सर्व
भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥1॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि
सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥2॥ तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥3॥
2706 भाग्याचा
उदय । ते हे जोडी संतपाय ॥1॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होई बळकट
। माझ्या मना तूं रे धीट ॥2॥ तुका म्हणे लोटांगणीं । भक्तीभाग्यें
जाली धणी ॥3॥
2707 नाहीं
तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥1॥ जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त
समाधान ॥ध्रु.॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥2॥ तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥3॥
2708 आम्ही
सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥1॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥
याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥2॥ तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ती । तुम्ही हो
श्रीपती साक्षी येथें ॥3॥
2709 नसता
चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥1॥ जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥ गंवसिलों
पुढें मागें लागलागे पावला ॥2॥ तुका म्हणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥3॥
2710 हें का
आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥1॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्हीं कां
कळीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वैर्या हातीं । हे निश्चिंती
देखिली ॥2॥ तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥3॥
2711 कां हो
आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥1॥ उफराटी तुम्हां चाली । क्रिया गेली
सत्याची ॥ध्रु.॥ साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥2॥ तुका म्हणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥3॥
2712 शकुनानें
लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥1॥ भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥ प्रीत कळे
आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥2॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥3॥
2713 नव्हेव
निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥1॥ तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा
॥ध्रु.॥ नाहीं विटाळिलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥2॥ तुका म्हणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥3॥
2714 ऐकिली
कीर्ती संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥1॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा
॥ध्रु.॥ आमहासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥2॥ तुका म्हणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥3॥
2715 मोलाचें
आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥1॥ उगवूं आलेति तुम्हीं
नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी ।
उरली ते उरी नाहीं कांहीं ॥2॥ तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥3॥
2716 म्हणऊनि
जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥1॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च
॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥2॥ तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥3॥
2717 विभ्रंशिली
बुद्धी देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥1॥ पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥ न
मारितां हीन बुद्धी दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥2॥ तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥3॥
2718 न
वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥1॥ म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥ मोकळें हे मन
कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥2॥ तुका म्हणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥3॥
2719 कल्पतरूअंगीं
इच्छिलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥1॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला
॥ध्रु.॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥2॥ तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥3॥
2720 उकरडा
आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥1॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय
॥ध्रु.॥ काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥2॥ तुका म्हणे काय उपदेश वेड्या ।
संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥3॥
2721 जया
शिरीं कारभार । बुद्धी सार तयाची ॥1॥ वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥ आपणीयां
पाक करी । तो इतरीं सेविजे ॥2॥ तुका म्हणे शूर राखे । गाढ्या
वाखेसांगातें ॥3॥
2722 एक एका
साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥1॥ कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥ अवघे धन्य
होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥2॥ तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥3॥
2723 फळकट
तो संसार । येथें सार भगवंत ॥1॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि
काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥2॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥3॥
2724 सुधारसें
ओलावली । रसना धाली न धाय ॥1॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥ आवडे तें तें
च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥2॥ तुका म्हणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥3॥
2725 असंतीं
कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित ॥1॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥
सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥2॥ तुका म्हणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥3॥
2726 आपुलें
आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥1॥ बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी
॥ध्रु.॥ पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥2॥ तुका म्हणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥3॥
2727 असोनि
न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥1॥ धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तीहीन
॥ध्रु.॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥2॥ तुका म्हणे धांव घेतलीसे सोई ।
आतां पुढें येई लवकरी ॥3॥
2728 आपुल्याचा
भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥1॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥ गळ गिळी
आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥2॥ तुका म्हणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥3॥
2729 विषय
तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥1॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥2॥ तुका म्हणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥3॥
2730 मी च
विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥1॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च
माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥2॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥3॥
2731 येणें
जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥1॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥
भय निवारिता । कोण वेगळा अनंता ॥2॥ तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥3॥
2732 भल्याचें
कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥1॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें
॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥2॥ तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥3॥
2733 लावूनियां
पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥1॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥
कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥2॥ तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥3॥
2734 पुण्य
उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥1॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे
फळा । कळवळा बहुतांचा ॥2॥ तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥3॥
2735 आइकिली
मात । पुरविले मनोरथ ॥ ॥ प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥ केली
विनवणी । तैसी पुरविली धणी ॥2॥ तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥3॥
2736 संतांची
स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥1॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ती
अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥2॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे
॥3॥
2737 सेजेचा
एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥1॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला
॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥2॥ तुका म्हणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥3॥
2738 न सरे
भांडार । भरलें वेचितां अपार ॥1॥ मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥
कारणापुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥2॥ तुका म्हणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥3॥
2739 तरी
हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥1॥ जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची
॥ध्रु.॥ जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥2॥ तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥3॥
2740 कोण
दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥1॥ तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ कोण ऐसें वारी
पाप । हरी ताप जन्माचा ॥2॥ तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥3॥
2741 ग्रंथाचे
अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥1॥ नाहीं भेदू म्हूण भलतें चि आचरे । मोकळा
विचरे मनासवें ॥2॥ तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥3॥
2742 कायावाचामनें
जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥1॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥2॥ तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥3॥
2743 याती
हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥1॥ येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण
जाली काया ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी
गाजे ॥2॥ विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका म्हणे हें
चि आम्हां ध्यान निरंतर ॥3॥
2744 गंगा
आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥1॥ तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी ।
पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥2॥ तुका म्हणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥3॥
2745 पोटासाठीं
खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दांतखीळ
॥1॥ हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । म्हणतां
राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती
। कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥2॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न म्हणे
त्याचा गाढव मातापिता ॥3॥
2746 आम्हां सुकाळ
सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥1॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी
। तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥ वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें
एका । सनकादिकां सांपडलें ॥2॥ धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं
दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥3॥ माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि
चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥4॥ नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका म्हणे
गेलें । वांयांविण न घेतां ॥5॥
2747 चुकलिया
ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥1॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥
निक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसे मन ॥2॥ नाशिवंतासाटीं । तुका म्हणे
करिसी आटी ॥3॥
2748 करूनि
जतन । कोणा कामा आलें धन ॥1 ॥ ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥ प्रिया
पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥2॥ तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥3॥
2749 आम्हीं देतों
हाका । कां रे जालासी तूं मुका ॥1॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥ आधीं करूं
चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥2॥ तुका म्हणे सेवटीं । तुम्हां आम्हां घालूं
तुटी ॥3॥
2750 नव्हे
भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥1॥ जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥ चाल जाऊं
संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥2॥ तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी
गरज ॥3॥
2751 बहु
होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥1॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥ नव्हतें
आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥2॥ ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे
धांवे खाऊं ॥3॥
2752 काय
करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥1॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥ होय
आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥2॥ तुका म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥3॥
2753 केली
सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥1॥ न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥
अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥2॥ तुका म्हणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥3॥
2754 शिकवूनि
बोल । केलें कवतुक नवल ॥1॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥ हातीं
प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥2॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा
नाहो ॥3॥
2755 तेथें
सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥1॥ दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं
। नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा
। रूप धरिलें गोजिरें ॥2॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका ह्मणे
पाहे । कोण आस या मुक्तीची ॥3॥
2756 शूद्रवंशी
जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥1॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥ घोकाया
अक्षर । मज नाहीं अधिकार ॥2॥ सर्वभावें दीन । तुका म्हणे
यातिहीन ॥3॥
2757 वेडें
वांकडें गाईन । परि मी तुझा चि म्हणवीन ॥1॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥ केल्या
अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥2॥ तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥3॥
2758 हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥1॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देई
त्यांसी ॥ध्रु.॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥2॥ देइन आलिंगण धरीन चरण । संवसारसीण
नासे तेणें ॥3॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥4॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥5॥ अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे
॥6॥ कायावाचामनें देई क्षेम
त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥7॥ हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥8॥ तुका म्हणे तया उपकारें बांधलों । म्हणऊनि
आलों शरण संतां ॥9॥
2759 लटिका
तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंद्रियें ॥1॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे
॥ध्रु.॥ लटिकिया विपत्ती हरिविण करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥2॥ तुका म्हणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा
॥3॥
2760 सर्वस्वा
मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥1॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां
॥ध्रु.॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥2॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी
त्यांसी ॥3॥ तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥4॥
2761 एकांतांचे
सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥1॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं
॥ध्रु.॥ मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा
॥2॥ कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी
॥3॥ तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥4॥
2762 लटिकें
तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन प्रिय
नाहीं ॥1॥ लटिकें
चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥ लटिकें चि केलें वेदपारायण ।
जरि नाहीं स्फुंदण प्रेम कथे ॥2॥ लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥3॥ नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धी ॥4॥ तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥5॥
2763 भूतीं
भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥1॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें
। अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥ माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं
फार । विचार चि करणें ॥2॥ तुका म्हणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें
आप वाढलें ॥3॥
2764 नेणें स्पुंदो कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥1॥ तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥ नाहीं देखिला तो
डोळां । देव दाखवूं सकळां ॥2॥ चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे
नेणें दुःखें ॥3॥
2765 त्याग
तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥1॥ मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥
अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥2॥ तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥3॥
2766 मातेचिये
चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ती ॥1॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥ दावी
प्रेमभातें । आणि अंगावरि चढतें ॥2॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥3॥
2767 कोणा
पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥1॥ ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें
दीना ॥ध्रु.॥ कोण लाभकाळ । दीन आजि मंगळ ॥2॥ तुका म्हणे जाला । लाभ सहज विठ्ठला ॥3॥
2768 मान
इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥1॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥
आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥2॥ तुका म्हणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥3॥
2769 संसारापासूनि
कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा
देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों ।
मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥1॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची ।
करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥
इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं ।
हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें
होय । क्षण एक स्थिर नाहीं । करिती
ताडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझें यास कांहीं ॥2॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन
लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय
करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी
राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥3॥
2770 नाम
घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥1॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥2॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥3॥
2771 प्राण
समर्पिला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥1॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥ जाला
कंठस्फोट । जवळी पातलों निकट ॥2॥ तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥3॥
2772 येणें मार्गा आले ।
त्यांचें निसंतान केलें ॥1॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥ नागविल्या थाटी
। उरों नेदी च लंगोटी ॥2॥ तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥3॥
2773 तोंवरि
तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥1॥ तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा
देखिलें नाहीं ॥ध्रु.॥ तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव
सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥2॥ तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा
पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥3॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें
दर्शन जालें नाहीं ॥4॥
2774 तोंवरि
तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥1॥ तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥2॥ तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी
तुक्यासवें ॥3॥
2775 धरोनि
दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥1॥ जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥
भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥2॥ वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥3॥ कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥4॥ तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥5॥
2776 उचिताचा
भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥1॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें
॥ध्रु.॥ विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥2॥ तुका म्हणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुम्ही कोड
पुरविलें ॥3॥
2777 लांब
लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥1॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा
॥ध्रु.॥ सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥2॥ तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥3॥
2778 अवघीं
च तीर्था घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥1॥ अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया
॥ध्रु.॥ अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥2॥ तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥3॥
2779 सदा
सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥1॥ ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं
नये ॥ध्रु.॥ जयासी न कळे भक्तीचें महिमान । तेणें ब्रह्मज्ञान
बोलों नये ॥2॥ ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं
नये ॥3॥ तुका
म्हणे ज्यासी नाहीं हरिभक्ती । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥4॥
2780 आम्ही असों
निश्चिंतीनें । एक्या गुणें तुमचिया ॥1॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि
॥ध्रु.॥ नाहीं तुम्हां धांव घेता । कृपावंता आळस ॥2॥ तुका म्हणे विसरूं कांहीं । तुज वो आई
विठ्ठले ॥3॥
2781 अनुभवें
वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥1॥ कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥ जातीऐसा दावी
रंग । बहु जग या नावें ॥2॥ तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥3॥
2782 परपीडक
तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥1॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा
दुरि ॥ध्रु.॥ अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥2॥ तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥3॥
2783 कांहीं
न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी ॥1॥ देव तयासी म्हणावें । त्याचे चरणीं
लीन व्हावें ॥ध्रु.॥ भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥2॥ नाहीं नाहीं त्यासमान । तुका म्हणे मी
जमान ॥3॥
2784 नाम
उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥1॥ ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥
ब्रह्मादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥2॥ तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥3॥
2785 आडलिया
जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥1॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा
॥ध्रु.॥ प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥2॥ आपुलें चि अंग तुम्ही
वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥3॥ तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई
जननीये ॥4॥
2786 तपासी
तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा
॥1॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥
पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥2॥ तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥3॥
2787 गुरुशिष्यपण
। हें तों अधमलक्षण ॥1॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥ न कळतां दोरी
साप । राहूं नेंदावा तो कांप ॥2॥ तुका म्हणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥3॥
2788 अंगीकार
ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥1॥ अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य
केली ॥ध्रु.॥ ब्रह्महत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥2॥ तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥3॥
2789 धनवंता
घरीं । करी धन चि चाकरी ॥1॥ होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥ रानीं
वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥2॥ तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥3॥
2790 हा गे
माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥1॥ केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥ घालोनियां भार
माथा । अवघी चिंता वारली ॥2॥ तुका म्हणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥3॥
2791 देव आहे
सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा ॥1॥ नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥ वसवूनि
असे घर । माग दूर घातला ॥2॥ तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥3॥
2792 खुंटोनियां
दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥1॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सार करा याची ॥2॥ तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा । वेगळें
नाहीं देवा उरों दिलें ॥3॥
2793 शाहाणपणें
वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥1॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥ यज्ञमुखें
खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥2॥ तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥3॥
2794 मजुराचें
पोट भरे । दाता उरे संचला ॥1॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥ रोजकीर्द होतां
झाडा । रोकडा चि पर्वत ॥2॥ तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥3॥
2795 स्मशानीं
आम्हा न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥1॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड
॥ध्रु.॥ झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान
तुम्हीं केलें ॥2॥ तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥3॥
2796 आमची
जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥1॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या
॥ध्रु.॥ उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥2॥ तुका म्हणे होय दरिद्र विच्छीन्न ।
ऐसे देऊं दान एकवेळे ॥3॥
2797 दधिमाझी
लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥1॥ अग्नि काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥
तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥2॥
2798 नको
नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥1॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप
॥ध्रु.॥ सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥2॥ तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥3॥
2799 पुढें
जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥1॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥ होणारासी
मिळे बुद्धी । नेदी शुद्धी धरूं तें ॥2॥ तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥3॥
2800 ऐका गा
ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥1॥ अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥ नाहीं कोणी
सवें येता । संचिता या वेगळा ॥2॥ बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥3॥ कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥4॥ तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥5॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.