तुकारामगाथा ३००१ – ३१००
3001 कांहीं विपत्ति अपत्यां
। आतां अमुचिया होतां । काय होईल अनंता । पाहा बोलों
कासया ॥1॥ बरें अनायासें जालें ।
सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥ बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा ।
उजुरचि नाहींसा ॥2॥ तुकयाबंधु
म्हणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें
पावलों ॥3॥
3002 देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी
अझून । अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों
नेदीं ॥1॥ कळों येईल रोकडें । उभा करिन
संतांपुढें । तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥ आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥2॥ ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बंधव । माझा
गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥3॥
3003 मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला । तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥1॥ इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार । सिद्धासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥ असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा । धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥2॥ अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी । तुकयाबंधु म्हणे उरी ।
नाहीं तरी नुरे कांहीं ॥3॥
3004 आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक । नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥1॥ संबंध पडिला कोणाशीं ।
काय डोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि ॥ध्रु.॥ सुखें नेदीस जाणवलें ।
नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आम्ही आहे तुज आधीं ॥2॥ असें
च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥3॥
3005 तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते
आम्हांसवें आतां न फावे कांहीं ॥1॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा
विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं ॥ध्रु.॥ अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार ।
कळला असावा असेल ॥2॥ आतां
निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥3॥
3006 बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि
वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥1॥ देणें आहे कीं भांडाई ।
करणें आहे सांग भाई । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा
॥ध्रु.॥ मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं
मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥2॥ सारखी
नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥3॥
3007 आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके । जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं
॥1॥ नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें । बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥ दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे । दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥2॥ तुकयाबंधु म्हणे देखतां
। अंध बहिर ऐकतां । कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी ॥3॥
3008 तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा
बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥1॥ थोंटा
नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं । म्हणोनि शाहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥2॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण ।
आतां जीवें न सोडीं ॥3॥
3009 तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥1॥ तूं तर न होसी शाहाणा । नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा
॥ध्रु.॥ न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट ।
कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥2॥ आतां
श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥3॥
3010 हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी
परी पुढें ॥1॥ मी तों सांगून उतराई । जालों आतां तुज काई । कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥ मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज
कासावीस । होसी देवा ये कामें ॥2॥ तुकयाबंधु म्हणे राखें
। आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥3॥
3011 पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी
पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥1॥ नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी
। म्हणउनि नाहीं म्हणसील ॥ध्रु.॥ आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥2॥ तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा । केला कांहीं मागायाची नव्हती गरज ॥3॥
3012 माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी
। घालुनि अवघें वैकुंठ ॥1॥ आतां
न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें
जालें ॥ध्रु.॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें
अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥2॥ अवघें
भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥3॥
3013 आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर ।
आला सकळसिद्धींचा ॥1॥ जालों
निधाई निधानें । लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विच्छिन्न । दुःख जालें दारिद्र ॥ध्रु.॥ तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें
संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥2॥ तुकयाबंधु
म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा । आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥3॥
3014 सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें
। कृपा पुण्यें पूर्वाचिया ॥1॥ सुखें
आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां । निवारली चिंता । देणें
घेणें चुकलें ॥ध्रु.॥ जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें
। सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥2॥ तुकयाबंधु
म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला । चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥3॥
3015 काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता
कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥1॥ कृपा देई दान हरि मज कृपा देई दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण । आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥ नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं
स्वप्नीं । संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं
नेणें तुजवांचूनि ॥2॥ पंथपुरिंचा
रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं
ठेवूनि माथा ॥3॥
3016 तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥1॥ परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा
॥ध्रु.॥ बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण
भलतें चि ॥2॥ तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥3॥
3017 मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥1॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी
॥ध्रु.॥ मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग
वांयां ॥2॥ तुकयाबंधु म्हणे
पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥3॥
3018 मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥1॥ काय धाक आम्हां कासयाची
चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥ शंखचक्रगदा
आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाटीं ॥2॥ पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी
तुकयाच्या ॥3॥
3019 राम म्हणतां
कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥1॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥ राम म्हणे जन्म
नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥2॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥3॥ राम म्हणतां धर्म
घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥4॥ राम म्हणतां म्हणे
तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥5॥
3020 मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या
चक्रपाणी मायबापा ॥1॥ चुकविलीं
दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥2॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥3॥ तुकयाबंधु म्हणे अवघ्या
देशदिशा । मुक्त रे परेशा
तुझ्या पुण्यें ॥4॥
3021 आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥1॥ असों
दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥ मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥2॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा
ही देख प्रेत्न ॥3॥ सकळ
इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि
भ्रम ॥4॥ तुकयाबंधु म्हणे ते चि
वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा ॥5॥
3022 नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥1॥ परउपकारीं वेचियेल्या शक्ति । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥ द्वयें द्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती
जाणीतली ॥2॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें
आत्मिस्थती जाणीतली ॥3॥ उचित
अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥4॥ तुकयाबंधु
म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥5॥
3023 चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो
संबळीमध्यें देखा ॥1॥ उत्पित्तसंहारकरिता
जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥ असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥2॥ लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥3॥ तुकयाबंधु
म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥4॥
3024 कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥1॥ भला रे पुंडलिका भला ।
महिमा नव जाये वर्णिला । दगा
देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥ केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥2॥ तुकयाबंधु म्हणे
किल्ल्या । संताचे हातीं दिल्या । आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥3॥
3025 पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥1॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार । सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥2॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ । नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥3॥ शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रीया । ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगिलें ॥4॥ राहिले
वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । श्रम महा मानिती॥5॥ थेर
भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं । कथा पुराण म्हणतां सिसी
। तिडीक उठी नकर्याचे ॥6॥ विषयलोभासाटीं
। सर्वाथासीं प्राण साटी । परमार्थी पीठ मुठी ।
मागतां उठती सुनींसीं ॥7॥ धनाढ्य देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रज्ञ संपन्न ॥8॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥9॥ खोटें
जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी । भ्रतारें
तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥10॥ नमस्कारावया
हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाटीं
खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥11॥ बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ । अभक्ष भक्षिती विटाळ
। कोणी न धरी कोणाचा ॥12॥ कैसें
जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे
घेऊनि ब्राह्मण । अविंदवाणी वदताती ॥13॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती । सोवळ्याच्या
स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥14॥ मद्यपानाची
सुराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवती व्यभिचारिणी ।
दैन्यवाणी पतिव्रता ॥15॥ केवढी
दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता । पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥16॥ भेणें मंद जाल्या मेघवृष्टी । आकांतली कांपे सृष्टी । देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥17॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें । गाई म्हैसी चेवल्या गोरसें । नगरें
दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥18॥ होम
हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥19॥ अठरा यातींचे व्यापार । करिती तस्कराई विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥20॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥21॥ वेदाध्ययनसंहितारुचि
। भकाद्या करिती तयांची । आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥22॥ मुख्य
सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें । कुडीं कापटें महा मोहनें। मिरविताती दुर्जन ॥23॥ कळाकुशळता चतुराई ।
तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाचा वाही ।
एक ही ऐसीं नाडलीं ॥24॥ जे
संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होतां वैरागी
दिगांबर निस्पृही वैराग्यकारी । कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छाकरीं न सुटती ॥25॥ कैसें
विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर ।
एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥26॥ केवढी
ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन । याती
अठरा चारही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥27॥ पूर्वाहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें । ऐकत होतों ते देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥28॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्यें वागवरावें । देवासी भाकोनि
करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥29॥ अगा
ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥30॥
3026 केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं ॥1॥ अजिचें
जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥2॥ तुकयाबंधु
म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥3॥
3027 तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥1॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं
॥ध्रु.॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण
करिताति ॥2॥ प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य
तयापरी ॥3॥ तुका म्हणे आतां
कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥4॥
3028 कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥1॥ लागतसें
पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥ गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥2॥ सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥3॥ तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥4॥
3029 एकाचिये सोई कवित्वाचे बांधे ।
बांधिलिया साध्य काय तेथें ॥1॥ काय
हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥ कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥2॥ तुका म्हणे देव
केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥3॥
3030 भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥1॥ बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥2॥ तुका म्हणे बहु ।
लागे ऐसें बरें मऊ ॥3॥
3031 आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥1॥ वेडा
जाला वेडा जाला । लांचावला भक्तिसी
॥ध्रु.॥ निचाड्या चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥2॥ धरिला
मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥3॥
3032 कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥1॥ ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥ संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोई ॥2॥ तुका
म्हणे तरें । भवसिंधु एका सरें ॥3॥
3033 विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥1॥ वाये टाळ टाळ्याटाळी ।
होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आद्ये अवसानीं
। विठ्ठल मनीं स्मरावा ॥2॥ तुका
म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईका ॥3॥
3034 पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥1॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे ।
उतरी कासे लावूनि ॥2॥ तुका
म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥3॥
3035 अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥1॥ ऐसियांचा संग देई
नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥ उत्तम
सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥2॥ तुका
म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥3॥
3036 पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥1॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥2॥ तुका म्हणे नेदी
आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥3॥
3037 न कळे तें कळों येईल
उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥1॥ न
दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥ न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥2॥ न भेटे तें भेटों येईल
आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥3॥ अलभ्य
तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥4॥ तुका
म्हणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥5॥
3038 बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥1॥ जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥ गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥2॥ तुका म्हणे तांतड
करूं । पाय धरूं बळकट ॥3॥
3039 भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥1॥ आत्मनिष्ठ
जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥2॥ तुका म्हणे कृपा
करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥3॥
3040 दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे
॥ध्रु.॥ मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे
लीळे वर्तूं नेणे ॥2॥ जरी
तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे
श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥
3041 देव भक्तांलागीं
करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥1॥ भाग्य
द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि
करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥ स्त्री द्यावी गुणवंती
नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥2॥ तुका
म्हणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥3॥
3042 वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥1॥ अंतीं
मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥ येरू म्हणे भला
भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥2॥ देह
तंव जाणार । घडेल हा उपकार ॥3॥ येरू
म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥4॥ गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥5॥
3043 जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥1॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी
॥ध्रु.॥ धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प
गोविंदाचे ॥2॥ तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥3॥
3044 तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा
जिव्हाळा ॥1॥ माझा
बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥2॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥3॥ वराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥4॥ हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥5॥ वामन
जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥6॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥7॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥8॥ मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥9॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥10॥ गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥11॥ तुका
म्हणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥12॥
3045 सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन ।
उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥1॥ पुण्य
करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें
॥ध्रु.॥ भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी
। उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥2॥ म्हणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥3॥
3046 देवावरी भार । वृत्ती अयाचित सार ॥1॥ देह
देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥ विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥2॥ तुका म्हणे
व्हावें । बळ एक चि जाणावें ॥3॥
3047 वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥1॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥2॥ तुका म्हणे भले ।
जन्मा येऊनियां जाले ॥3॥
3048 केली प्रज्ञा मनाशीं ।
तई मी दास सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥1॥ तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं
सांपडली वाट । सैराट फिरतसें ॥ध्रु.॥ ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥2॥ घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता
। काय पाहें मारगा ॥3॥
3049 नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥1॥ उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी
पावशील ॥2॥ सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥3॥
3050 संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥1॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥2॥ तुका
म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥3॥
3051 जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥1॥ आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥2॥ तुका म्हणे काय
देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥3॥
3052 देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रीयेसी पाठवी उंच साडी ॥1॥ गाईचें पाळण नये चि
विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥ लेकराची
रास स्वयें धांवें क्षाळूं ॥ न म्हणे
प्रक्षाळूं द्विजपायां ॥2॥ तुका
म्हणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥3॥
3053 उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥1॥ अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥ द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुकाऩचे दासीचा लेंक होय ॥2॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥
3054 ब्रह्मज्ञान जरी कळें
उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥1॥ शास्त्रांचे
भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥ याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥2॥ या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥3॥
3055 गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥1॥ कन्येचा
जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥ नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥2॥ आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥3॥
3056 साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें
नेसी ॥1॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी
॥2॥ तुका म्हणे आतां
लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥3॥
3057 राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥ न करी स्नान संध्या म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्णिशी
॥ध्रु.॥ देवाब्राह्मणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगधीशीं अतिआदरें ॥3॥ तुका म्हणे अरे ऐक
भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥
3058 दुर्बुदधि ते मना ।
कदा नुपजो नारायणा ॥1॥ आतां
ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥ उपजला
भाव । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥2॥ तुका
म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥3॥
3059 तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥1॥ तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥ उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥2॥ तुका
म्हणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया ॥3॥
3060 साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥1॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया
॥ध्रु.॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती
यमा हातीं ॥2॥ ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं
बापुडीं सिणलीं वांयां ॥3॥ तुका
म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोर्यांसीचा फेरा फिरों नको ॥4॥
3061 चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गर्वावार बोभाट जनामध्यें ॥1॥ लटिके
चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥2॥ तुका म्हणे अंतीं
वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥3॥
3062 माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न
विसंभें ॥1॥ विसरतां रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती
सांवळी ते ॥ध्रु.॥ विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी
लक्षलाभ ॥2॥ तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥3॥
3063 काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या
॥1॥ झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥ हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥2॥ तुका म्हणे किती
जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥3॥
3064 थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥1॥ व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं
॥ध्रु.॥ घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण
तैसें पाठांतर ॥2॥ तुका
म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥3॥
3065 जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥1॥ सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥ खांद्या
पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥2॥ साधुसंतांच्या
दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥3॥
3066 जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा ॥1॥ पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥ मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आम्ही लागलों ध्यानीं ॥2॥ तुका म्हणे मी
पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रह्मींची आळ ॥3॥
3067 संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड
चर्मकाचें ॥1॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें
नाहीं खळा ॥ध्रु.॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ
बहु त्याचा ॥2॥ तुका म्हणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं
॥3॥
3068 बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥1॥ बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥2॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥3॥
3069 जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥1॥ हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा
॥2॥ तुका म्हणे जाली ।
मज हे अनावर बोली ॥3॥
3070 गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥1॥ कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥ वाढावें संतान । गृहीं व्हावें
धनधान्य ॥2॥ मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥3॥ तुका म्हणे मोल ।
देउन घेतला सोमवल ॥4॥
3071 बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें
॥1॥ विटू दांडू चेंडू लगोर्या वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी
॥2॥ सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥3॥ तुका म्हणे ऐसें
बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥4॥
3072 तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥1॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥ हातीं
दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥2॥ श्वानाचिया
परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥3॥ तुका
म्हणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥4॥
3073 म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥1॥ खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी
॥ध्रु.॥ बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ
कफ भारी ॥2॥ सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥3॥ तुका
म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥4॥
3074 जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥1॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा ।
तृण मागों नये जाणा ॥2॥ तुका
म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥3॥
3075 लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥1॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी
॥ध्रु.॥ कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं ।
शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥2॥ तुका
म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥3॥
3076 व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥1॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥ पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥2॥ तुका म्हणे
विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥3॥
3077 गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥1॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो
तुझी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया
दोघांजणा तारियेलें ॥2॥ तुका
म्हणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥3॥
3078 ब्रह्मयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप
॥1॥ तेणें आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडासी । काय ब्रह्मयासी
नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥ परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥2॥ तुका म्हणे विठोबा
मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देई ॥3॥
3079 देवीं आणि दैतीं सिंधू गुसिळला । भार पृथ्वीस जाला साहावेना
॥1॥ जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥ तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती म्हणोनियां ॥2॥ तुका
म्हणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥3॥
3080 हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥1॥ इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी म्हणती धांव ॥ध्रु.॥ तइं
पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले ॥2॥ तुका
म्हणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली
पांडुरंगा ॥3॥
3081 प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य
केलें ॥1॥ राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥ विठ्ठल माधव मुकुंद
केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥2॥ तुका
म्हणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥3॥
3082 नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥1॥ खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही
॥ध्रु.॥ राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक
बळियासी ॥2॥ असों
द्यावीं सामर्थ्या
ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देई ॥3॥
3083 वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥1॥ भोक्ता नारायण
केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥2॥ तुका म्हणे ऐसे
तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥3॥
3084 अग्निकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद
विसरेना ॥1॥ पितियासी म्हणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥ अग्निरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक
मारी ॥2॥ तुका म्हणे अग्नि जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥3॥
3085 कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे
॥1॥ येरू म्हणे
काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥ खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण म्हणतां चि ॥2॥ तुका
म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥3॥
3086 डळमळिला मेरु आणि तो मांदार
। पाताळीं फणिवर डोई झाडी ॥1॥ लोपे
तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥ ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी ॥2॥ तुका
म्हणे भक्तांकारणें
श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळले ॥3॥
3087 बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥1॥ मानियेला
चित्तीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥ काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा
बहु ॥2॥ तुका म्हणे भक्तजनाची ममता । तुम्हांसी अनंता अलोलिक ॥3॥
3088 पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥1॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गार्हाने सांगावया ॥ध्रु.॥ बळिचिये द्वारीं तुम्ही बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥2॥ तुका म्हणे
कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी
प्रेमच्छाया ॥3॥
3089 दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप
द्यावा ॥1॥ त्याचे आज्ञेविण आम्हां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥ पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू म्हणे झणी बोलों नका ॥2॥ तुका
म्हणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥3॥
3090 बळी म्हणे आजि
दुर्वासया स्वामी । मागों नका तुम्ही नारायणा
॥1॥ बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया
॥ध्रु.॥ परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं
उद्वेगला ॥2॥ काय तूं एकाचा आहेसी अंकित । होई कृपावंत तुका म्हणे ॥3॥
3091 त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बळिचें तुवां घर धरियेलें ॥1॥ आम्हां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक
॥ध्रु.॥ अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । ब्रिदें तुझीं हरी जाती वांयां ॥2॥ तुका
म्हणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥3॥
3092 बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥1॥ मागुता दुर्वास पुसे बळिराया । निरोप जावया देई देवा ॥ध्रु.॥ बळी म्हणे त्यासी जाय मी न म्हणे । जाईल नारायण लागला ची ॥2॥ मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका म्हणे पाय न सोडीं मी ॥3॥
3093 दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥1॥ ठेविलें चरण बळिचिये द्वारीं । शीर
अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥ पाडियेलें द्वार
द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥2॥ तेथूनियां
नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका म्हणे ॥3॥
3094 मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥1॥ मारियेला मुरु म्हणोनी
मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥ पूर्वाहुनी ऐसा भक्तिप्रतिपाळ
। केला त्वां सांभाळ नारायणा ॥2॥ तुका
म्हणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥3॥
3095 गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥1॥ संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे
चिरकाळ ॥ध्रु.॥ गुरुतीर्था अनमान । यथासांग मद्यपान ॥2॥ गुरुअंगुष्टा
न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥3॥ तुका
म्हणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥4॥
3096 वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥1॥ काय
होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ ब्रह्मसंतर्पण
। लोकीं करावें कीर्तन ॥2॥ निमित्याचा
धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥3॥
3097 साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे
घरीं क्रीडतो राम ॥1॥ शिवाचें
निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥ योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी
सांगे ॥2॥ चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम ॥3॥ क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम
दे राम ॥4॥ राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका
चरण वंदितो ॥5॥
3098 विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा
॥1॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा
॥ध्रु.॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल
चुलता बहिणी बंधु ॥2॥ विठ्ठल
हे जन विठ्ठल माझें मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥3॥ तुका म्हणे माझा
विठ्ठल विसावा । नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥4॥
3099 न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥1॥ ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥ माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥2॥ सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥3॥
3100 माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥1॥ बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥ सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥2॥ तुका
म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.