बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा ४१०१ - ४२००



तुकारामगाथा ४१०१ - ४२००


4101 आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥1 आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बल चुकला मोरा ॥2 तुका म्हणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥3


4102 भावभक्तिवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥1 अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥ सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें 2 तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥3 देव जोडिलिया तया काय उणें । तुका म्हणे मन धीट करा ॥4


4103 चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥1 दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥2 तुका म्हणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धि संतसंगीं 3


4104 रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥1 निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥ दास तुका म्हणे विठ्ठलउदारें । अज्ञानअंधारें दूरी केलें ॥2


4105 मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥1 तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥2 तुका म्हणे घालें पोट । मग बोटचांचणी 3


4106 माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥1 ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥ चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2 तुका म्हणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥3


4107 संतपाउलें साजिरीं । गंगा आली आम्हांवरी ॥1 जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥ स्वेतबंद वाराणसी । अवघीं तीर्थे तयापासीं ॥2 तुका म्हणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥3


4108 न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥1 कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥ वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥2 तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥3


4109 करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥1 मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥ शांतिखड्ग हातीं । काळासी ते नागविती ॥2 तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥3


4110 तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रह्मांडीं ही हरी माना ते ॥1 मेरूची लेखणी सागराची शा । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥ अनंत अपार आपंगिले भक्त । माझें चि संचित ओडवेना ॥2 तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥3


4111 काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या॥1 देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥ केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥2 तुका म्हणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥3


4112 तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥1 काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥2 जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥3 नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥4 तुका म्हणे आम्ही गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥5


4113 कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज 1 बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥ तेणें सुखें मन स्थिर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥2 ना भी ना भी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥3 तुका म्हणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥4


4114 क्तिचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥1 अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां ॥ध्रु.॥ तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥2 संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥3 तुका म्हणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आम्ही करूं ॥4


4115 साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥1 साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥2 तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥3


4116 संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥1 याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥2 शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥3 तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥4


4117 तुझें वर्म आम्हां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥1 अवघा चि नट वाउगा पसारा । चेला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥ म्हणउनि देहबुद्धि नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥2 सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥3 तुका म्हणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥4


4118 पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥1 जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥ अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥2 जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥3 तुका म्हणे देह वालें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥4


4119 संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥1 कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥ तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणउनि हेवा हा चि करीं ॥2 विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें 3


4120 देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥1 आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥ नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥2 आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥3


4121 क्ति ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥1 तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥ भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥2 तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥3


4122 समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥1 मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥2 दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका म्हणे मात ऐसी आहे ॥3


4123 भवाचिया संगें बहु च नाडिले । कळिकाळें पाडिले तोंडघसीं ॥1 तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥ जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥2 तुका म्हणे करीं सर्व ही तूं त्याग । अर्पा हें सर्वांग जगदीशीं ॥3


4124 रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान 1  तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥ दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2 तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3


4125 जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥1 हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥ हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥2 सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥3 तराळ राळ बोंबें उतरा। राखा आपुलिया भा4 हरिच्या नामीं घालूं जागा । तुका म्हणे हुशार गा ॥5


4126 संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली 1 गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥2 तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥3


4127 चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥1 हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥ खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥2 तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार 3


4128 संतांच्या पादुका घेन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥1 भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धि पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥ ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥2 नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥3 सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥4


4129 हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥1 म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उचिष्टाची धणी घ्यावयासी ॥2 चालतां ते मागाअ चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥3 दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगीं ॥4


4130 पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥1 आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रह्म सावळें ॥ध्रु.॥ आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥2 तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥3


4131 ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥1 पातकाची रासी म्हणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥ नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥2 एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥3 तुका म्हणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥4


4132 आतां आम्हां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥1 धीर दिला आम्हां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥2 तुका म्हणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥3


4133 क्ति म्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥1 सुख आम्हा जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥2 तुका म्हणे सुख बहु जालें जिवा । घडली  या सेवा विठोबाची ॥3


4134 शास्त्रज्ञ हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥1 क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥ तोळाभर सोनें रतिभार रा । मेळविल्या पाहीं नास होतो ॥2 हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥3 तुका म्हणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥4


4135 इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि का1 जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥ कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥2 हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥3 तुका म्हणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥4


4136 न लगे देवा तुझें आम्हांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥1 दे तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥2 सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें 3 तुका म्हणे हरी दे तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥4


4137 पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥1 मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥ सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥2 तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥3


4238 होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥1 संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस ॥ध्रु.॥ नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥2 तुका म्हणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥3


4139 स्थिरावली वृत्ति पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥1 पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मीळित । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥ चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥2 सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥3 शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥4 तुका म्हणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों निश्चिंत निश्चिंतीनें ॥5


4140 बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥1 लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥ आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥2 म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ॥3


4141 मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥1 चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥ सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥2 मुक्तिवरील भक्तिजाण । अखंड मुखीं नारायण ॥3 मग देवभक्त जाला । तुका तुकीं उतरला ॥4


4142 प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥1 रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥2 तुका म्हणे अंतकाळीं । आम्हां सोडवीं तात्काळीं ॥3


4143 तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी 1 तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥2 तुका म्हणे सकळ तीर्थे । तुझें पायीं वसती येथें ॥3


4144 क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥1 कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥ बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥2 तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥3


4145 श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥1 शरण निरंतर म्हण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥ यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥2 नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥3 तुका म्हणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥4


4146 सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥1 माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ‍ मन केलें ॥ध्रु.॥ गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी 2 प्रल्हादास कष्टीं रक्षिलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥3 अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥4 तुका म्हणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥5


4147 आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥1 दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥ यावें जावें आम्हीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥2 काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥3 तुका म्हणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥4


4148 आतां आम्हां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥1 ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥2 तुका म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥3


4149 आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥1 जेथें चंद्रभागातिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥ जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥2 तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पायां तळीं ॥3


4150 म्ही नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥1 तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥ तुझें पावनपण न चले आम्हांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥2 म्ही दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥3 तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझें ॥4


4151 पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही1 आतां संतांनीं करावी पंचात । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥2 याचें पावनपण सोडवा चि तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥3 म्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥4 तुका म्हणे आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥5


4152 घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥1 ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥ रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥2 जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥3 तुका म्हणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥4


4153 वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी 1 आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥ वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥2 तुका म्हणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥3


4154 हातपाय मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळां 1 देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥2 डोळ्याचा डोळा पाहों गेला । तुका म्हणे तो पाहों ठेला ॥3


4155 मुखें संति इंद्रियें जती । आणिक नेणे भाव भक्ति 1 देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥2 चित्ताचें आसन । तुका करितो कीर्त्तन ॥3


4156 धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥1 ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन स्थिरावलें तुझ्या पायीं ॥2 तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥3


4157 गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥1 तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥ काय तुजपासीं सांगों हें गार्‍हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥2 कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥3 तुका म्हणे आम्ही मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥4


4158 जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥1 आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥ देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठाचे हात वाहाती कैसे ॥2 तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥3


4159 मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥1 पाहा जना सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥ शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥2 तुका म्हणे विठोबासी । ठाव दे चरणापासीं ॥3


4160 भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥1 ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥ सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥2 तुका म्हणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥3


4161 काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें ॥1 आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥ कैसी तुम्हां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥2 आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥3


4162 चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥1 आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥ गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥2 तुका म्हणे चाली । पुढें वाट खोळंबली 3


4163 किती एका दिसीं । बुद्धि जाली होती ऐसी ॥1 कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥ अवलंबुनी भीक । लाज सांडिली लौकिक ॥2 तुका म्हणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥3


4164 आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥1 मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥ युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥2 तुका म्हणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥3


4165 परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाच्या पती पांडुरंगा ॥1 चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2 तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां3


4166 पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥1 दोष जाले बळिवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥ मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥2 तुका म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं 3


4167 ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥1 कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥ मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥2 वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥3 तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधीं बैसे 4


4168 देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा 1 वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥ अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥2 भूत न बोले निरुतें । कांहीं केल्या न सुटे तें ॥3 जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥4 तुका म्हणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें 5


4169 हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥1 म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥ संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥2 तुका म्हणे अंगीं । शक्ति दे नाचें रंगीं ॥3


4170 लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥1 कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥ जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥2 तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥3


4171 काय आम्ही केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥1 हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥ गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥2 तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥3


4172 भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आम्हांसी फळला 1 याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥ गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाइऩम्हसी ॥2 स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥3 तुका म्हणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥4


4173 गुणा आला टेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥1 डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥2 तुका म्हणे समध्यान । हे चरण सकुमार ॥3


4174 रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥1 हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥2 तुका म्हणे देवा । दे कीर्त्तनाचा हेवा ॥3


4175 तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥1 भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥ नाम आदित्याचें झाड । त्याचा न पडे उजड ॥2 सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥3 तुका म्हणे देवा । ब्रीद सोडूनियां ठेवा ॥4


4176 जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥1 पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥2 चंद्रभागे स्नान । तुका म्हणे हें चि दान ॥3


4177 यासाटीं करितों निष्ठ‍ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥1 ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्‍याची ॥2 तुका म्हणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥3


4178 पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥1 सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित्त ॥2 आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥3 लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें 4 तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥5


4179 देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला 1 भेऊं नको दे भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥ तुझ्या जीवींचें मी जाणें । म्हणसी मुक्तिम्हां देणें ॥2 तुका म्हणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥3


4180 यमधर्म आणिक ब्रह्मादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥1 करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे ॥ध्रु.॥ सहस्त्रमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥2 चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदक्षिणा ॥3 तुका म्हणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥4


4181 विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भक्तिभावें केला देव ॠणी ॥1 देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥ भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥2 तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥3 अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥4 बंधनाचा फांसा आम्हीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥5 पद्मनाभा नाभिकमळीं ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक म्हणविसी ॥6 म्हणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥7 पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥8 जवळीक जाली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥9 मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥10 धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥11


4182 बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥1 पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥ दिनानाथ ब्रीद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥2 उतरीं सत्वर पैलथडी ने । पूर्णसुख देइप पायांपाशीं 3 पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥4 केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें 5 नाम तुझें गोड स्वभक्ता आवडे । भक्तांलागीं कडे खांदा घेसी 6 घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥7 विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥8 पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥9


4183 एक वेळे तरी जान माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी 1 चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥ करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥2 तुका म्हणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥3


4184 सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें 1 संत शब्द उपदेशी । मग तूं हो म्हणशी ॥2 तुका म्हणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥3


4185 उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥1 दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥ तेथें असे भागीरथी । येथें जाणा भीमरथी ॥2 वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥3 मनकर्णिका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥4 वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥5 धुंडिराज दंडपाणी । उभा गरुड कर जोडुनी ॥6 गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥7 तेथें असती गयावळ । येथें गा आणि गोपाळ 8 शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्राप्ती9 संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥10


4186 ट्याचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1 कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2 तुका म्हणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3


4187 दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥1 काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥ वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥2 तुका म्हणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥3


4188 अहो कृपावंता । हाइप बुद्धीचा ये दाता ॥1 जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥2 तुका म्हणे देवा । माझें अंतर वसवा ॥3


4189 निंदक तो परउपकारी । काय वर्णू त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥1 नेघे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥ मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥2 तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका म्हणे न्हाणी ते ॥3


4190 प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥1 नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥ मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥2 स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां 3 चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥4 नये त्याचा संग धरूं म्हणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥5


4191 र्थेविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥1 घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥2 तुका म्हणे ज्याला अर्था आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥3


4192 बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतां चि चिंधी मन धांवे ॥1 व्यभिचार्‍यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥ प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥2 सांडुनियां दे संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥23 तुका म्हणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥4


4193 मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥1 आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥ सद्गुणसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥2 आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥3 तुका म्हणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥4


4194 स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥1 जें जें मागावें भातुकें । तें तें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥ खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥2 तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥3


4195 तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥1 दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥ शां नये सहस्रा नये । लक्षकोडीलागीं नये ॥2 तुका म्हणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥3


4196 संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥1 तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥ आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥2 तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3


4197 हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥1 तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥2 तुका म्हणे तैसे भक्त । तयांसी जन हें निंदित ॥3


4198 परिसें गे सुनेबा । नको वेचूं दूध दहीं ॥1 आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥2 माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥3 वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥4 उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥5 भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥6 भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥7 सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥8 सासूबा स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥9 सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥10 सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे 11 अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं 12 मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥13 तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥14


4199 एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥1 निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥2 तुका म्हणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥3


4200 मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं 1 ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥2 तुका म्हणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला 3


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.