तुकारामगाथा १४०१ - १५००
1401 प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥1॥ करितां घाईळाचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥ आविसा अंगें पीडा वसे
। त्यागें असे बहु सुख ॥2॥ तुका
म्हणे जीव
भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥3॥
1402 आशा ते करविते बुद्धीचा लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥1॥ आपला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन गोही ॥ध्रु.॥
नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें त्या निर्मळ शुद्ध बुद्ध ॥2॥ अंधळ्यानें नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥3॥
1403 जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥1॥ संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥
लटिकियाचा अभिमान । होता सीण पावित ॥2॥ तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥3॥
1404 निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥1॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥
शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥2॥ तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥3॥
1405 भिक्षापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें ।
उपेक्षीजे सर्वथा ॥1॥ देवा
पायीं नाहीं भाव । भक्ति
वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाहीं तो हा
व्यभिचार ॥ध्रु.॥ जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें
। मूळ आणि विश्वास ॥2॥ काय
न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार ।
दृढ पाय धरावे ॥3॥
1406 भावबळें विष्णुदास । नाहीं नास पावत ॥1॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ती चालत ॥ध्रु.॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥2॥ तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥3॥
1407 कोरड्या गोठी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥1॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥ घरोघरीं
सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥2॥ तुका म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळें ॥3॥
1408 नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥1॥ देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें
॥ध्रु.॥ लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥2॥ तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥3॥
1409 सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥1॥ ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥ध्रु.॥ असे प्रारब्ध
नेमें । श्रमुचि उरे श्रम ॥2॥ सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥3॥
1410 काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म ।
भागा आले ते करूं ॥1॥ देईन हाक नारायणा ।
तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥ सातांपांचांचें गोठलें
। प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥2॥ फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधीं ।
कोठें नेघें विसावा ॥3॥
1411 न लगे देशकाळ । मंत्रविधानें सकळ । मनें चि निश्चळ । करूनि
करुणा भाकावी ॥1॥ येतो
बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥2॥ घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव । तुका म्हणे जीव ।
जीवीं मेळविल अनंत ॥3॥
1412 नाहीं आलें भक्तीसुख अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥1॥ नसावें जी तुम्ही कांहीं निश्चिंतीनें । माझिया वचनें अभेदाच्या ॥ध्रु.॥ एकाएकीं मन नेदी
समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥2॥ तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राह उगली मौन्य मज ॥3॥
1413 मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥1॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥ होइन
धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥2॥ तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥3॥
1414 मिटवण्याचे धनी । तुम्ही वेवसाय जनीं ॥1॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥
केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥2॥ तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥3॥
1415 समर्पिली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥1॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥ धार अखंडित । ओघ चालियेला
नित ॥2॥ पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥3॥
1416 अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरिचें नाम
॥1॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांटविलें
॥ध्रु.॥ शरीरसंपत्ती मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥2॥ तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥3॥
1417 बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥1॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥ पाहेन ते
पाय । जोंवरि हे दृष्टी धाय ॥2॥ तुका म्हणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥3॥
1418 येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥1॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥2॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥3॥
1419 भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि
फांकती ॥1॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें
देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥ दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती
गोडा । आचरणें आपुलाल्या ॥2॥ तुका
म्हणे पराधीनें
। जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविते ॥3॥
1420 आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥1॥ काय चाले तुम्हीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥ शरीर तें
करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥2॥ चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥3॥ इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥4॥ तुका म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती म्हणऊनि ॥5॥
1421 आम्हां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥1॥ कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ परतें
कांहीं नेणें दुजें । तत्वबीजें पाउलें ॥2॥ तुका म्हणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥3॥
1422 साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खया मोलें ॥1॥ भोगाचे सांभाळीं द्यावें कळिवर ।
संचित चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥ महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥2॥ तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥3॥
1423 निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥1॥ नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं
शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥ त्यागा नांव तरी निर्विषयवासना ।
कारीयेकारणांपुरते विधि ॥2॥ तुका
म्हणे राहे
चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥3॥
1424 पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं या विषयांचे ॥1॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥ केला
आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥2॥ तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥3॥
1425 कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि
निष्काम ॥1॥
कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥ आवडीनें नाचें । आहे तरी पुढें
साचें ॥2॥ तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥3॥
1426 खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥1॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥ परउपकार
। एका वचनाचा फार ॥2॥ तुका
म्हणे मळ ।
मनें सांडितां शीतळ ॥3॥
1427 दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥1॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥
कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥2॥ तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥3॥
1428 शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥1॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥ त्याचें
खरें ब्रह्मज्ञान । उदासीन देहभावीं ॥2॥ तुका म्हणे सत्य सांगें । योत रागें येती ते ॥3॥
1429 माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥1॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥ तुज
देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥2॥ आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥3॥ तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥4॥ तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखिल लागलीं औघीं ॥5॥
1430 आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता
॥1॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया
॥ध्रु.॥ समाधानासाटीं बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥2॥ जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥3॥ तुका म्हणे माझें तो चि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥4॥
1431 आशा हे समूळ खणोनि काडावी । तेव्हां चि गोसावी व्हावें
तेणें ॥1॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये
॥ध्रु.॥ आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ॥2॥ तुका म्हणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥3॥
1432 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार
हें वर्म चुकों नये ॥1॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥2॥ तुका म्हणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥3॥
1433 नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥1॥ सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे
दासीं केली आम्हीं ॥ध्रु.॥ गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी
वश्य होय ॥2॥ तुका
म्हणे कडु
वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥3॥
1434 नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें
त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥1॥ जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां
मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद ।
जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥2॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं
बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥3॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं
। वेद चारी काढिले ॥4॥ जगीं
प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी
महादोषी ॥5॥ जे
हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं
विषाचे ॥6॥ काय सांगों ऐशीं किती । तुका म्हणे नामख्याती
। नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥7॥
1435 किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोवाठीं ॥1॥ लक्ष चौर्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥ उपजल्या
पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥2॥ तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥3॥
1436 गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं
राहें उगा ॥1॥
अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा श्रम करिसी वांयां ॥2॥ तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं नीतिं निलाजिरा ॥3॥
1437 जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥1॥ शत्रु तो म्यां केला न म्हणे आपुला
। जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥2॥ जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥3॥
1438 आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥1॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी
॥ध्रु.॥ अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥2॥ तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥3॥
1439 जीव तो चि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ती
पापाड्याची ॥1॥ पिंडाच्या पोषकी नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥ मना आला तैसा
करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हा ॥2॥ तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारी ॥3॥
1440 भक्तांचा महिमा भक्त
चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥1॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती
॥ध्रु.॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥2॥ टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥3॥ तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । जिहीं एक्या भावें जाणीतलें ॥4॥
1441 आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥1॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दरुषण धीर
त्याचें ॥2॥ तुका
म्हणे नाहीं
आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥3॥
1442 चिंतनें सरे तो धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥1॥ संसारसिंधु नाहीं हरिदासा । गर्भवास कैसा नेणती ते
॥ध्रु.॥ जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥2॥ तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥3॥
1443 मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघाड गांठोळीस ॥1॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥
ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुख ॥2॥ तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥3॥ ॥12॥
1444 चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥1॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥ पढिये सर्वोत्तमा
भाव । येथें वाव पसारा ॥2॥ ऐसें
उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥3॥
1445 अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो चि बाधी ॥1॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा
॥ध्रु.॥ अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥2॥ तुका म्हणे विश्वीं विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥3॥
1446 एकाचिया घाट्या टोके । एक फिके उपचार ॥1॥ ऐसी सवे गोवळीया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥ एकाचेथें उच्छिष्ट
खाय । एका जाय ठकोणि ॥2॥ तुका
म्हणे सोपें
। बहु रूपें अनंत ॥3॥
1447 कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥1॥ ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥
मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥2॥ तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥3॥
1448 ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥1॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥ अवघें
साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥2॥ तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥3॥
1449 आचरती कर्में । तेथें काळें कर्मधर्में ॥1॥ खेळे गोवळीयांसवें । करिती तें त्यांचें साहावें ॥ध्रु.॥ यज्ञमुखें
घांस । मंत्रपूजेसी उदास ॥2॥ तुका
म्हणे चोरी ।
योगियां ही सवें करी ॥3॥
1450 नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तो चि ठेला ॥1॥ आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी
॥ध्रु.॥ आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥2॥ तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥3॥ परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥4॥ कोळियाची कीर्ती वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥5॥ सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद
नाहीं नांवा ॥6॥
1451 भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥1॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें
॥ध्रु.॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥2॥ सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं
॥3॥ आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥4॥ तुका म्हणे नाहीं नरमता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥5॥
1452 आणीक कांहीं मज नावडे मात । एक पंढरिनाथ वांचुनिया ॥1॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥2॥ तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥3॥
1453 ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥1॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाणें पंढरिराज ॥ध्रु.॥
तर्कवितर्कासी । वाव न लागे सायासीं ॥2॥ तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥3॥
1454 येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥1॥ तो चि ध्यावा एका चित्तें । करूनि रितें कळिवर
॥ध्रु.॥ षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥2॥ तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥3॥
1455 मुक्त
तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥1॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥2॥ तुका म्हणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥3॥
1456 कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं
॥1॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतां ॥ध्रु.॥
शब्दज्ञानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥2॥ तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥3॥
1457 देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥1॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धी
द्वारीं । कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास ।
अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥2॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघशामा । तुका म्हणे आम्हां ।
जन्म गोड यासाटीं ॥3॥
1458 न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या
केशवाविण दुजें ॥1॥ काय
उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥ आणिकाची कीर्ती
नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥2॥ न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें
कोठें ॥3॥ न करीं कांहीं आस मुक्तीचे
सायास । न भें संसारास येतां जातां ॥4॥ तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण
दुजें ॥5॥
1459 नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥1॥ साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें
कळे ॥ध्रु.॥ नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥2॥ तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥3॥
1460 या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥1॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥ बिजाऐसीं
फळें । उत्तम कां अमंगळें ॥2॥ तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे नित ॥3॥
1461 कुशळ वक्ता नव्हे जाणीव श्रोता । राहे भाव चित्ता धरूनियां ॥1॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रह्म तया अंगीं वसतसे
॥ध्रु.॥ न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥2॥ जप तप ध्यान नेणे याग युक्ती ।
कृपाळु जो भूतीं दयावंत ॥3॥ तुका
म्हणे होय
जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥4॥
1462 काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥1॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं
॥ध्रु.॥ याकारणें माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥2॥ तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥3॥
1463 घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥1॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥ काढावें
आइतें । तें चि जोडावें स्वहितें ॥2॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥3॥
1464 नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें
गुरुपुत्रा ॥1॥ म्हणऊनि
बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥ नये होऊं कदा निंदकाची भेटी ।
जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥2॥ तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥3॥
1465 कथा करोनिया द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥1॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची
॥ध्रु.॥ असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥2॥ तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥3॥
1466 नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण
फोल ज्ञान सांगे ॥1॥ वाखाणी अद्वैत भक्तीभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता
॥ध्रु.॥ अहं ब्रह्म म्हणोनि पाळित पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥2॥ वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥3॥ तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥4॥
1467 वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें
॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥3॥ तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥
1468 तीर्थांचे मूळ व्रतांचें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरिये ॥1॥ तें आम्हीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं
॥ध्रु.॥ जीवांचें जीवन सुखाचें सेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥2॥ जनाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥3॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तें
चि असे ॥4॥ तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां
सांपडलें गीती गातां ॥5॥
1469 माझे मनोरथ पावले सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली
॥1॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥
त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥2॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥3॥ जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं सामावलें ॥4॥ तुका म्हणे माप भरी आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥5॥
1470 कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥1॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज
लवलाहें ॥ध्रु.॥ अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥2॥ तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरि ॥3॥
1471 पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें वाव घेती ॥1॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो
॥ध्रु.॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥2॥ तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥3॥
1472 वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥1॥ केला आतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥ संसाराचा
नाहीं पांग । देव सांग सकळ ॥2॥ तुका म्हणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥3॥
1473 कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती
नरकामध्यें ॥1॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥ मधुरवाणीच्या नका
पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥2॥ तुका म्हणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥3॥
1474 गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥1॥ तैसें जाणा ब्रह्मज्ञान । बापुडें तें भक्तीविण
॥ध्रु.॥ रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥2॥ अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥3॥ तुका म्हणे तारा । नाव तंबुर्याच्या सारा ॥4॥
1475 नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥1॥ हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥ अवघा
जाला पण । लवण सकळां कारण ॥2॥ तुका म्हणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥3॥
1476 आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥1॥ तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥
गांवाखालील वाहाळ । गंगा न मनी अमंगळ ॥2॥ तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥3॥
1477 आशाबद्ध वक्ता । भय श्रोतयाच्या चित्ता ॥1॥ गातो तें चि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें
॥ध्रु.॥ जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ॥2॥ तुका म्हणे गोणी । माप आणि रितीं दोन्ही ॥3॥
1478 तक्र शिष्या मान । दुग्धा म्हणे
नारायण ॥1॥ ऐशीं ज्ञानाचीं डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥ उपदेश तो जगा ।
आपण सोंवळा इतका मांगा ॥2॥
रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्पित ॥3॥
1479 ब्रह्मचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥1॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग
संकल्पाचा ॥ध्रु.॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥2॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥3॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥4॥
1480 आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी
। आशाकामबोहरी ॥1॥ आलें
अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निश्चिंती
॥ध्रु.॥ दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंदी बंद कौपीन । बहिरवास
औठडें ॥2॥ काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ ।
धरूनि असों ऐकांत ॥3॥
कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें चाली । स्वरूपीं च राहाणें ॥4॥ नव्हे वेषधारी । तुका आहाच वरवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडितों
वेदांची ॥5॥
1481 निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा
॥1॥ कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा
॥ध्रु.॥ नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें
दमी ॥2॥ तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥3॥
1482 जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥1॥ आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥ शुद्ध नाहीं चित्त
। परी म्हणवितों भक्त
॥2॥ मज कोण पुसे रंका ।
नाम सांगे तुझें तुका ॥3॥
1483 नाशवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥1॥ नामें चि तारिले कोट्यान हे कोटी । नामें हे
वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥ नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्ही मनीं
आठवाना ॥2॥ तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाटीं ॥3॥
1484 आळवितां बाळें । मातेतें सुख आगळें ॥1॥ द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥ लेववूनि अळंकार ।
दृष्टी करावी सादर ॥2॥ आपुलिये पदीं ।
बैसवूनि कोडें वंदी ॥3॥ नेदी लागों दिठी ।
उचलोनि लावी कंठीं ॥4॥ तुका म्हणे लाभा
। वारी घ्या वो पद्मनाभा ॥5॥
1485 तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती
ब्रह्महत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥ व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥ तुका म्हणे हित माना या वचना ॥ सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥
1486 देवासाटीं जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी
॥1॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य
॥ध्रु.॥ कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥2॥ यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता
नाहीं उभयतां ॥3॥ तुका
म्हणे वर्म
जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥4॥
1487 अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न
पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥1॥ बाह्यरंगाचें
कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान ।
मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥ पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष
उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥2॥ हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय
संगी । पाणोवाणी तयेच्या ॥3॥
पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा
होऊनि ॥4॥ लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार ।
तुका म्हणे वाहोनि ॥5॥
1488 आम्ही वीर जुंझार । करूं जमदाढे मार । तापटिले भार । मोड जाला
दोषांचा ॥1॥ जाला
हाहाकार । आले हांकीत जुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाणें । गरुडटके पताका ॥2॥ तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ। भोग आम्हां आमचा
॥3॥
1489 आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥1॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोल
॥ध्रु.॥ जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥2॥ तुका म्हणे भय बांधलें गांठीं
। चोर लागे पाठी दुम तया ॥3॥
1490 आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥1॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं
अळंकारीं ॥ध्रु.॥ ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥2॥ एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥3॥ तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥4॥
1491 वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा
॥1॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥
काय मानुनियां राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूतां ॥2॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥3॥ काय हातीं नाहीं करील तयासी ॥ काय जालें यांसी काय जाणों
॥4॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥5॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत
नाहीं ॥6॥ तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी ॥ कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥7॥
1492 काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें
काय म्हूण ॥1॥
देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥ काय हें शरीर साच
कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥2॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा
॥3॥ कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा
कोण कोणा आलें ॥4॥ कां
हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥5॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥6॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें
वज्रपाशीं ॥7॥
1493 जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां
॥1॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे
॥ध्रु.॥ ऊर्ध पुंड भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळीकाळ
तया भेणें ॥2॥ तुका
म्हणे
शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥3॥
1494 जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे
॥1॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव
॥ध्रु.॥ बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥2॥ तुका म्हणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥3॥
1495 मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला
निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥1॥ म्हणोनि जया जे वासना ॥ ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा
आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥ अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तिंचे
लहणें । दास्य करी हा दासाचें ॥2॥ म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बळिच्या
द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥3॥ अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवडे भक्तीचे
उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥4॥ पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें
राहिला ॥5॥ भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि
राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥6॥
1496 सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥1॥ त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धींचे
साधक । वाचासिद्ध होती एक ॥2॥ तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥3॥
1497 ठाकलोंसें द्वारीं । उभें याचक भीकारी ॥1॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा
भार । नये घेऊं येरझार ॥2॥ तुका
म्हणे दान ।
सेवा घेतल्यावांचून ॥3॥
सदाशिवावर अभंग ॥ 2 ॥
1498 काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित ॥1॥ अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रह्मांड सकळा ॥ध्रु.॥ नाम
महादेव । येथें निवडला भाव ॥2॥ तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां कां न कळे ॥3॥
1499 भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥1॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥ हाक देतां
दारीं । येती जवळी सामोरीं ॥2॥ तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥3॥
1500 ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥1॥ कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥ भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥2॥ तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.