तुकारामगाथा ३४०१ - ३५००
3401 न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥1॥ सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥ न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईन तेथें दाटी वैष्णवांची ॥2॥ अनु
नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥3॥ उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणे नारायण ॥4॥ आणिकांची
सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका म्हणे आणु
दुजें नाहीं ॥5॥
3402 पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥1॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥ उभा कटीं ठेवुनि कर । न म्हणे पर बैससें ॥2॥ तुका
म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥3॥
3403 बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥2॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु ॥ आपुलें शरीर रक्षितां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥2॥ तुका म्हणे माझा
विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥3॥
3405 काय करिती केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥1॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें
॥ध्रु.॥ विष्णुमूर्तीपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥2॥ तुका म्हणे नाम
जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥3॥
3406 वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रह्म्यानें गार्हाणें ॥1॥ धांव
धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥ गजेंद्र
नाडियें गांजिला ॥ तेणें तुझा धांवा केला ॥ 2॥ तुका म्हणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥3॥
3407 माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥1॥ एका
रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥ सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥2॥ तुका म्हणे भार
वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥3॥
3408 भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥1॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥ नेत्र उन्मळित राहिले तटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥2॥ तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥3॥
3409 धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥1॥ लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥ खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥2॥ तुका म्हणे जिवें
साटीं ॥ पडिली मिठी धुरेसी ॥3॥
3410 मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥1॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥ भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥2॥ तुका म्हणे करा
परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥3॥
3411 लावूनि कोलित । माझा करितील घात ॥1॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥2॥ तुका म्हणे रिघे ।
पुढें नाहीं जालें धींगे ॥3॥
3412 ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥1॥ साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥ कां हीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥2॥ तुका
म्हणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥3॥
3413 चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥1॥ काय
करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥ कांहीं
सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥2॥ चालिले
अगळे । हळू च कान केश डोळे ॥3॥ वोसरले
दांत । दाढा गडबडल्या आंत ॥4॥ एकली
तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥5॥ तुका
म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी
॥6॥
3414 नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥1॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥2॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी ॥3॥ सांडियेलीं
पानें । पुढें पिका अवलोकन ॥4॥ पडों
नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥5॥
3415 जाले आतां सांटे । कासयाचे लहान मोटे ॥1॥ एक एका पडिलों हातीं । जाली तेव्हां चि निश्चिंती ॥ध्रु.॥ नाहीं फिरों येत मागें
। जालें साक्षीचिया अंगें ॥2॥ तुका
म्हणे देवा । आतां येथें कोठें हेवा ॥3॥
3416 माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥1॥ सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥ साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥2॥ तुका म्हणे माल ।
माझा खरा तो विठ्ठल ॥3॥
3417 करूं स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणां हे गोविंदा ॥1॥ आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ध्रु.॥ बोबड्या उत्तरीं
। तुम्हा रंजवितों हरी ॥2॥ मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥3॥
3418 नव्हतील जपें नव्हतील तपें । आम्हांसी हें सोपें गीतीं गातां ॥1॥ म्हणे न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरि ॥ध्रु.॥ जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥2॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तिभावें ॥3॥ तुका म्हणे वर्म
जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥4॥
3419 आम्ही
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥1॥ केला
घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हातां
चढलें धन । नेणं रचिलें कारण ॥2॥ तुका म्हणे मिठी ।
पायीं देउनि केली सुटी ॥3॥
3420 लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥1॥ करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥ फोडिलीं भांडारें ।
मोहोरलीं एकसरें ॥2॥ अवघियां
पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥3॥
3421 एकीं असे हेवा । एक अनावड जीवां ॥1॥ देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥ प्रीतिसाटीं भेद ।
कोणी पूज्य कोणी निंद्य ॥2॥ तुका
म्हणे कळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥3॥
3422 स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥1॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥ कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥2॥ तुका म्हणे सिद्धी
। हे चि पाववावी बुद्धी ॥3॥
3423 रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥1॥ म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥ परते चि ना मागें । मोहो निष्ठ जालों अंगें ॥2॥ सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥3॥
3424 हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवे धीर ॥1॥ माझा
फुटतसे प्राण । धांवा धांवा म्हणऊन
॥ध्रु.॥ काय नेणों दिशा । जाल्या तुम्हांविण ओशा ॥2॥ तुका म्हणे कां गा
। नाइकिजे पांडुरंगा ॥3॥
3425 धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥1॥ वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥ उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥2॥ तुका म्हणे त्वरें
। वेग करीं विश्वंभरे ॥3॥
3426 जोडिले अंजुळ । असें दानउताविळ ॥1॥ पाहा वाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥ तूं धनी मी सेवक । ऐक्य
तें एका एक ॥2॥ करितों विनंती । तुका सन्मुख पुढती॥3॥
3427 काय तुज कैसें जाणवेल देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥1॥ सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझा ॥ध्रु.॥ कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥2॥ तुका म्हणे कैसे
पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥3॥
3428 मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥1॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास
॥ध्रु.॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें
पुरवावी ॥2॥ तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥3॥
3429 आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥1॥ अन्नवस्त्रचिंता
नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥ सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडी या बंदीं सुटलोंसें ॥2॥ घ्यावा
द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥3॥ तुका म्हणे तुज
कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥4॥
3430 कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं जालों देवा ॥1॥ आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें
॥ध्रु.॥ तुझिया विनोदें आम्हां प्राणसाटी । भयभीत पोटीं सदा दुःखी ॥2॥ तुका म्हणे माझ्या
कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥3॥
3431 सन्मुख चि तुम्हीं सांगावी
जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥1॥ निघों
आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें
जीवावरी ॥ध्रु.॥ बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख
डोळेभरी ॥2॥ तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥3॥
3432 मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥1॥ जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥ चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥2॥ तुका म्हणे
कृपावंत । माझी चिंता असावी ॥3॥
3433 कासया वांचूनि जालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी
॥1॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव
नुच्चारितां ॥2॥ तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥3॥
3434 नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥1॥ दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥2॥ तुका म्हणे तुझें
जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥3॥
3435 चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥1॥ वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । वरी
अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥ प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥2॥ आहे
त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥3॥ करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण
वारी ॥4॥ तुका म्हणे आतां
आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥5॥
3436 देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा
मनुष्यपणा ॥1॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें
कोणी नाहीं ॥ध्रु.॥ देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या
पाशा शिवों नेदी ॥2॥ देवाची
ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥3॥ देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥4॥ पहा
देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ
चिन्हें होतीं ॥5॥
3437 अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥1॥ माझें
कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य जालों
॥ध्रु.॥ सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥2॥ तुका म्हणे ऐसे
कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥3॥
3438 न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥1॥ दासां साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥ध्रु.॥ न लगे परिहार । कांहीं
योजावें उत्तर ॥2॥ न
धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥3॥
3439 भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥1॥ कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे
गर्भवास ॥ध्रु.॥ चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट
अंगें धरूनियां ॥2॥ बहुतांचे
बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥3॥ उकलूनि
नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥4॥ तुका
म्हणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥5॥
3440 संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥1॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥2॥ तुका
म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥3॥
3441 जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥1॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥ होतीं धालीं पोटें ।
मागें उरलीं उच्छिष्टें ॥2॥ तुका
म्हणे धांव । पुढें खुंटेल हांव ॥3॥
3442 धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥1॥ निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥ एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥2॥ हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥3॥ विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥4॥ तुका म्हणे बरीं ।
घरा येतील त्यापरी ॥5॥
3443 धोंड्यासवें आदळितां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥1॥ इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देतां काई सुख
वाटे ॥2॥ तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥3॥
3444 सरे आम्हांपाशीं एक
शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥1॥ कोण
मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥2॥ तुका
म्हणे आम्हां
जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥3॥
3445 आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥1॥ करील तें पाहें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥ तो चि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥2॥ तुका म्हणे दासा ।
नुपेक्षील हा भरवसा ॥3॥
3446 लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥1॥ आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥ खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥2॥ तुका म्हणे भावहीण
। त्याचा सीण पाचावा ॥3॥
3447 माझ्या इंद्रियांसीं
लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥1॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर
॥ध्रु.॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें
नव्हे ॥2॥ दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥3॥ तुका म्हणे ऐसें
करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥4॥
3448 सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला सर्व तुझा ॥1॥ सर्वकाळ
सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥ नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा
॥2॥ न करीं आस मुक्तिचे सायास
। भक्तिप्रेमरस सांडूनियां ॥3॥ गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें
॥4॥ तुका म्हणे जालों
तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥5॥
3449 जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥1॥ संसारदुःखें
नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष ॥ध्रु.॥ धन्य ते संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव टाकियेला ॥2॥ प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥3॥ पावटणिया पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥4॥ प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥5॥ तें दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी ॥6॥ तुका म्हणे त्यासी
। धन्य भाग्य दरूषणें ॥7॥
3450 काय दिवस गेले अवघे चि वहाडें । तें आलें सांकडें कथेमाजी
॥1॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥ कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥2॥ काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय
गेलें ॥3॥ ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें ॥ 4॥ तुका म्हणे हें चि
बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥5॥
3451 शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥1॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥ उदक भिन्न असे काई ।
वाहाळ बावी सरिता नई ॥2॥ सूर्य
तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥3॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥4॥ करितां
भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥5॥ वर्त्ते
एकविध अग्नि । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥6॥ तुका म्हणे पात्र
चाड । किंवा विसें अमृत गोड ॥7॥
3452 न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥1॥ सांपडे
हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥कोण लोक जो हा सुटला तो
एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥2॥ तुका
म्हणे हित तों म्हणा विठ्ठल
। न म्हणे तो भोगील कळेल तें ॥3॥
3453 म्हणवितां हरी न म्हणे तयाला
। दरवडा पडिला देहामाजी ॥1॥ आयुष्यधन
त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निश्चिंतीं
कामरंगें ॥ध्रु.॥ नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥2॥ कोण
नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका
नागवसी ॥3॥
3454 कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे
। आणीक तरे सुगंधें ॥1॥ पुण्य
घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या
बीजाचें । फळ घेई शेवटीं ॥ध्रु.॥कथा विरस पाडी आळसें । छळणा
करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें । विटाळसें नावेसी ॥2॥ सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो म्हणे हरि । विनंती करी तुका हे ॥3॥
3455 कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसनें ॥1॥ वाट पाहासी आठवाची । सत्ता सतंत कईची ॥ध्रु.॥ बोलावितां यावें रूपा
। सदा निर्गुणीं चि लपा ॥2॥ तुका
म्हणे तूं परदेशी । येथें आम्हां अंगेजिसी ॥3॥
3456 आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥1॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा
॥ध्रु.॥ माझें केलें मज पारिखें माहेर । नटोनी साचार
चाळविलें ॥2॥ सुखासाटीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु
मांदी मेळविली ॥3॥ केला
चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥4॥ तुका म्हणे आतां
घेईन कांटीवरी । धनी म्यां कैवारी केला देव ॥5॥
3457 आजिवरि होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी तों केली विटंबणा ॥1॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी
॥ध्रु.॥ सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी
पापिणी काय जाणों ॥2॥ तुका
म्हणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥3॥
3458 देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं
कोणी ॥1॥ मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥ परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥2॥ तुका म्हणे आणा
राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥3॥
3459 कां रे तुम्ही निर्मळ
हरिगुण गा ना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जा ना ॥1॥ काय
गणिकेच्या याती अधिकार मोटा । दोषी अजामेळ ऐसीं नेलीं वैकुंठा ॥ध्रु.॥ ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी पातकां नाहीं
पार ॥2॥ पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥3॥
3460 बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥1॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥ घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥2॥ तुका म्हणे आटाआटी
। चुकली दाटी सकळ ॥3॥
3461 नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जवळिकें ॥1॥ सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी
॥ध्रु.॥ नवनीतासाटीं खादला हा जीव । थोड्यासाटीं कीव कोण करी ॥2॥ तुका
म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥3॥
3462 सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥1॥ सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे
॥ध्रु.॥ वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें
थोर जाल्यावरी ॥2॥ तुका
म्हणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥3॥
3463 पोट धालें मग न लगे परती । जालिया निश्चिंती खेळ गोड ॥1॥ आपुलिया
हातें देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥ घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी
छंदें प्रेमाचिया ॥2॥ तुका
म्हणे तों च वरी करकर । मग हें उत्तर खंडईल ॥3॥
3464 बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरीं ॥1॥ कांहीं
कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥ बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥2॥ तुका म्हणे देवा ।
माझें चळण तुज सवा ॥3॥
3465 दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥1॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥ माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥2॥ तुका
म्हणे काई । मी हें माझें येथें
नाहीं ॥3॥
3466 एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाटीं ॥1॥ घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥ धांवे मागें मागें । जाय तिकडे चि लागे ॥2॥ तुका म्हणे नेलें
। माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥3॥
3467 बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥1॥ तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥ मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥2॥ तुका म्हणे छाया
भेटे । बरें वाटे तापे त्या ॥3॥
3468 आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥1॥ उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥2॥ तुका म्हणे केली
आस । तो हा दिस फळाचा ॥3॥
3469 बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥1॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥ येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥2॥ तुका म्हणे धालें
मन । हें चि दान शकुनाचें ॥3॥
3470 उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥1॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥ भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥2॥ तुका म्हणे
कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥3॥
3471 तुम्हांसी हें
अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥1॥ कां
बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठपदणें टाळित असां ॥ध्रु.॥ आळवितां मायबापा । नये
कृपा अझूनि ॥2॥ तुका म्हणे जगदीशा । काय असां निजेले ॥3॥
3472 नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥1॥ साह्य जालीं
घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥ मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥2॥ तुका म्हणे उघडें
केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥3॥
3473 जाला हा डांगोरा । मुखीं लहानाचे थोरा ॥1॥ नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥ संचिताचा ठेवा । आतां आला तैसा
घ्यावा ॥2॥ तुका म्हणे देवें
। म्हणों केलें हें बरवें ॥3॥
3474 किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥1॥ असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥ आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥2॥ तुका म्हणे
खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥3॥
3475 पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥1॥ बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥2॥ तुका म्हणे माझे
हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥3॥
3476 ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥1॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥ करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥2॥ तुका
म्हणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥3॥
3477 आतां नव्हे गोड कांहीं करितां संसार । आणीक संचार जाला माजी
॥1॥ ब्रह्मरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला
॥ध्रु.॥ रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन
निवविलें ॥2॥ तुका ह्मणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते
धणी पुरईल ॥3॥
3478 आतां काशासाटीं दुरी । अंतर उरी राखिली ॥1॥ करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळीचिया ॥ध्रु.॥ दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें निश्चिंती ॥2॥ तुका
म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥3॥
3479 पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हुण ॥1॥ मरणाची
कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें
ठेविलेंसे ॥2॥ तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥3॥
3480 जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस
॥1॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥ वेठीचें मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे
॥2॥ तुका म्हणे कां
उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥3॥
3481 जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥1॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥ मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥2॥ तुका म्हणे डेंगा
न कळे हित । किती फजित करूं तरी ॥3॥
3482 अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥1॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ
॥ध्रु.॥ षड उर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या
संता आल्या वेगीं ॥2॥ तुका
म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥3॥
3483 खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥1॥ लटिक्याचे आम्ही नव्हों
सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥ कोणा
इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥2॥ तुका
म्हणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥3॥
3484 गोमट्या बीजाचीं
फळें ही गोमटीं । बाहे तें चि पोटीं समतुक ॥1॥ जातीच्या
संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥ खर्याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा
ढाळें दुरी ॥2॥ तुका म्हणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥3॥
3485 मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥1॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे ।
तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार ।
करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥2॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या
उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥3॥
3486 दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥1॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं
॥ध्रु.॥ मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर
जालें होतें ॥2॥ तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाई ॥3॥
3487. कळों नये तों चि चुकावितां बरें । मग
पाठमोरें काय काज ॥ 1॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां
भाव ऐसा आहे ॥ ध्रु.॥ होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तो मी हा न्याहाळीं धरुनी
दृष्टी ॥ 2॥ तुका म्हणे तुज
रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥3॥
3488 करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥1॥ केला अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ यथंभुतें यावें ।
दावूं लपों ही जाणावें ॥2॥ तुका
म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥3॥
3489 विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥1॥ माझी
वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥ जोडिलीं
अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥2॥ नाहीं
केली आटी । कांहीं मानदंभासाटीं ॥3॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥4॥ तुका म्हणे झरा ।
आहे मुळींचा चि खरा ॥5॥
3490 सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥1॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळचिया मुळें स्थिराविलें ॥2॥ लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥3॥ सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥4॥ तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी
दाखविली ॥5॥
3491 एका वेळे केलें रितें कलिवर । आंत दिली थार पांडुरंगा ॥1॥ पाळण पोषण लागलें ते सोई । देहाचें तें काई
सर्वभावें ॥ध्रु.॥ माझिया मरणें जाली हे वसति । लागली ते ज्योती
अविनाशा ॥2॥ जाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका म्हणे कांहीं बोलों नये ॥3॥
3492 पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥1॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥ होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥2॥ तुका म्हणे मान ।
होतां उत्तम खंडन ॥3॥
3493 धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥1॥ जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥ कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥2॥ तुका म्हणे असो ।
अथवा हें आतां नासो ॥3॥
3494 आम्हांसी सांगाती । होती अराले ते होती ॥1॥ येती आइकतां हाक । दोन मिळोन म्हणती एक ॥ध्रु.॥ आणिकां उत्तरीं । नसे गोवी वैखरी ॥2॥ तुका
म्हणे बोल । खूण पहाती विठ्ठल ॥3॥
3495 आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥1॥ ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥ अंकिता ऐसया । होइल पावविलें ठाया
॥2॥ तुका म्हणे ऐसें ।
दिलें आभंड प्रकासे ॥3॥
3496 काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥1॥ देवलवासी तरवरछाया । घरघर माई खपरिबसमाया॥ध्रु.॥ कां
छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें ॥2॥ कहे
तुका तुम सुनो हो सिद्धा । रामबिना और झुटा कछु धंदा ॥3॥
3497 आणीक पाखांडें असती उदंडें । तळमळिती पिंडें आपुलिया ॥1॥ त्याचिया
बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥ दृढ एक चित्तें जालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुम्हांसी हे ॥2॥ पीडों
नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥3॥ तुका
म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येइल तुम्हां ॥4॥
3498 व्हावया भिकारी हें आम्हां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥1॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥2॥ तुका
म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥3॥
3499 कोरडिया ऐशा सारून गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥1॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥ लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा
दुःख देती ॥2॥ तुका म्हणे डांख लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटाविण ॥3॥
3500 ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥1॥ माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥ पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥2॥ संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥3॥ परउपकार । न घडावा हा विचार ॥4॥ तुका म्हणे लांसी
। आतां भेटों नये ऐसी ॥5॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.