तुकारामगाथा २९०१ – ३०००
2901 लोक म्हणती मज
देव । हा तों अधर्म उपाव ॥1॥ आतां कळेल तें करीं
। सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा
कांहीं ॥2॥ मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥3॥
2902 एका म्हणे
भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥1॥ कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥ बरें
वाइटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥2॥ तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥3॥
2903 आणिलें सेवटा ।
आतां कामा नये फांटा ॥1॥ मज आपुलेंसें म्हणा ।
उपरि या नारायणा ॥ध्रु.॥ वेचियेली वाणी । युक्ति अवघी
चरणीं ॥2॥ तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥3॥
2904 न करा टांचणी ।
येथें कांहीं आडचणी ॥1॥ जिव्हा अमुप करी
माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥2॥ तुका म्हणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥3॥
2905 तुझ्या नामाची आवडी
। आम्ही विठो तुझीं वेडीं ॥1॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥
काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥2॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥3॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥4॥
2906 साकरेच्या योगें
वर्ख । राजा कागदातें देखे ॥1॥ तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥ फिरंगीच्या योगें
करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥2॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥3॥ देवा देवपाट । देव्हार्यावरी बैसे स्पष्ट ॥4॥ ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥5॥
2907 धनवंतालागीं ।
सर्वमान्यता आहे जगीं ॥1॥ माता पिता बंधु जन
। सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥ जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥2॥ सदा शृंगार भूषणें । कांता लवे बहुमानें ॥3॥ तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥4॥
2908 न विचारितां
ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥1॥ केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥ करावें
लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥2॥ न कळे उचित । तुका म्हणे नीत
हित ॥3॥
2909 कंठ नामसिका । आतां
कळिकाळासी धका ॥1॥ रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥ रोखा
न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥2॥ सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥3॥ सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥4॥ तुका म्हणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा ॥5॥
2910 भूतीं देव म्हणोनि
भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥1॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार
॥ध्रु.॥ दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥2॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥3॥
2911 हारपल्याची नका
चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥1॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥ होणार तें तें भोगें
घडे । लाभ जोडे संकल्पें ॥2॥ तुका
म्हणे
मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥3॥
2912 नेसणें आलें होतें
गळ्या । लोक रळ्या करिती ॥1॥ आपणियां सावरिलें ।
जग भलें आपण ॥ध्रु.॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥2॥ भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥3॥ सावरिलें नीट वोजा । दृष्टिलाजा
पुढिलांच्या ॥4॥ बरे उघडिले डोळे ।
हळहळेपासूनि ॥5॥ तुका म्हणे
विटंबना । नारायणा चुकली ॥6॥
2913 जिव्हा जाणे फिकें
मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥1॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों
येती ॥ध्रु.॥ परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥2॥ एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी ॥3॥ तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥4॥
2914 न लगे द्यावा जीव
सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥1॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥2॥ तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥3॥
2915 मोल वेचूनियां
धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥1॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं
॥ध्रु.॥ नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हूण
॥2॥ कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा
॥3॥ तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां ना भी म्हणसी ना
॥4॥
2916 काय लवण कळिकेविण
। एके क्षीण सागरा ॥1॥ मां हे येवढी अडचण
। नारायणीं मजविण ॥ध्रु.॥ कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥2॥ तुका म्हणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥3॥
2917 तुज मज नाहीं भेद ।
केला सहज विनोद ॥1॥ तूं माझा आकार । मी
तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥2॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ ॥3॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥4॥ तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥5॥
2918 वैराग्याचें भाग्य
। संतसंग हा चि लाग ॥1॥ संतकृपेचे हे दीप ।
करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥ तो चि देवभक्त
। भेदाभेद नाहीं ज्यांत ॥2॥ तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥3॥
2919 जप तप ध्यान न लगे
धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥1॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें
॥ध्रु.॥ कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥2॥ तुका म्हणे मुक्ती
हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠिद्धसिद्धी ॥3॥
2920 नाहीं तुज कांहीं
मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥1॥ सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥ आतां
मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥2॥ तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ
॥3॥
2921 हितावरी यावें ।
कोणी बोलिलों या भावें ॥1॥ नव्हे विनोदउत्तर ।
केले रंजवाया चार ॥ध्रु.॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥2॥ तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥3॥
2922 संचित प्रारब्ध
क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥1॥ नाहीं आम्हांसी
संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥ द्वैताद्वैतभावें । अवघें व्यापियेलें
देवें ॥2॥ तुका म्हणे हरि । आम्हांमाजी क्रीडा करी ॥3॥
2923 नेणे करूं सेवा ।
पांडुरंगा कृपाळुवा ॥1॥ धांवें बुडतों मी
काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥ क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां
अधीन ॥2॥ तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥3॥
2924 जयापासोनि सकळ ।
महीमंडळ जालें ॥1॥ तो एक पंढरीचा राणा
। नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥ विवादती जयासाठीं । जगजेटी तो विठ्ठल
॥2॥ तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक ॥3॥
2925 नाहीं रूप नाहीं
नांव । नाहीं ठाव धराया ॥1॥ जेथें जावें तेथें
आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥ नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥2॥ नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥3॥ तुका म्हणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥4॥
2926 आहे सकळां वेगळा ।
खेळे कळा चोरोनि ॥1॥ खांबसुत्राचिये परी
। देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥ आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥2॥ जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥3॥ तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥4॥
2927 आतां पुढें मना ।
चाली जाली नारायणा ॥1॥ येथें राहिलें
राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥ भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥2॥ तुका म्हणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥3॥
2928 आळस पाडी विषयकामीं
। शक्ती देई तुझ्या नामीं ॥1॥ हे चि विनवणी
विनवणी । विनविली धरा मनीं ॥ध्रु.॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी
गुणीं ॥2॥ तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥3॥
2929 कोण वेची वाणी ।
आतां क्षुल्लका कारणीं ॥1॥ आतां हें चि काम
करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥ नेंदाविया वृत्ती । आतां
उठों चि बहुती ॥2॥
उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥3॥
2930 मागेन तें एक तुज ।
देई विचारोनि मज ॥1॥ नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥ जन्म घेईन मी नाना । बहु
सोसीन यातना ॥2॥ रंक
होईन दीनांचा । घायें देहपात साचा ॥3॥ तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥4॥
2931 जाणसी उचित ।
पांडुरंगा धर्मनीत ॥1॥ तरि म्यां बोलावें
तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥ पालटती क्षणें । संचित प्रारब्ध क्रियमाण ॥2॥ तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता॥3॥
2932 तुम्ही
कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥1॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥ केली
जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥2॥ तुका म्हणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥3॥
2933 येउनि संसारीं । मी
तों एक जाणें हरी ॥1॥ नेणें आणिक कांहीं
धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥ काम क्रोध लोभ स्वार्थ । अवघा माझा
पंढरिनाथ ॥2॥ तुका
म्हणे एक
। धणी विठ्ठल मी सेवक ॥3॥
2934 सर्वपक्षीं हरि
साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥1॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥2॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥3॥
2935 काय पुण्य ऐसें आहे
मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥1॥ काय ऐसा भक्त
वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥ काय कष्ट
माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥2॥ कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥3॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥4॥
2936 आमुचिया भावें तुज
देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥1॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां
॥ध्रु.॥ चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥2॥ तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥3॥
2937 आम्ही मेलों
तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥1॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें
॥ध्रु.॥ बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥2॥ पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥3॥ तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥4॥
2938 लागों नेदीं बोल
पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥1॥ परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥2॥ तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥3॥
2939 हे चि भेटी साच
रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥1॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय
॥ध्रु.॥ दुरील जवळी आपण चि होतें । कवळिलें चित्तें जिवापासीं ॥2॥ तुका म्हणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥3॥
2940 आपुलिया बळें नाहीं
मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥1॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥2॥ तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥3॥
2941 हित सांगे तेणें
दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥1॥ बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें
॥ध्रु.॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥2॥ तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥3॥
2942 ऐसा घेई कां रे संन्यास ।
करीं संकल्पाचा नास ॥1॥ मग तूं राहें भलते
ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥ तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥2॥ तुका म्हणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥3॥
2943 सोळा सहस्र होऊं
येतें । भरलें रितें आम्हापें ॥1॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । देव म्हूण संपादे ॥ध्रु.॥ कैची
चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तें ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा ॥3॥
2944 इहलोकीं आम्हां भूषण
अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥1॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥2॥ तुका म्हणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥3॥
2945 आम्ही
भाग्याचे भाग्याचे । आम्हां तांबे भोपळ्याचे ॥1॥ लोकां घरीं गाई म्हैसी । आम्हां घरीं
उंदीरघुसी ॥ध्रु.॥ लोकां घरीं हत्ती घोडे । आम्हां
आधोडीचे जोडे ॥2॥ तुका
म्हणे आम्ही सुडके । आम्हां देखोन
काळ धाके ॥3॥
2946 गाऊं नेणें कळा
कुसरी । कान धरोनि म्हणे हरी ॥1॥ माझ्या बोबडिया
बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥ मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥2॥ तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥3॥ तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥4॥
2947 विष पोटीं सर्वा ।
जन भीतें तया दर्पा ॥1॥ पंच भूतें नाहीं
भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥ चंदन प्रिय वासें । आवडे तें
जातीऐसें ॥2॥ तुका
म्हणे
दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥3॥
2948 देव अवघें
प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥1॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥
सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥2॥ तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥3॥
2949 मज माझा उपदेश ।
आणिकां नये याचा रीस ॥1॥ तुम्ही अवघे
पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥2॥ तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥3॥
2950 जाणे त्याचें वर्म
नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥2॥ मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥2॥ तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥3॥
2951अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥1॥ अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥ कोठें
राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥2॥ तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥3॥
2952 तुझें वर्म हातीं ।
दिलें सांगोनियां संतीं ॥1॥ मुखीं नाम धरीन
कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥ नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥2॥ तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥3॥
2953 माझ्या मना लागो
चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥1॥ आणीक नाही चाड । न
लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥ तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥2॥ तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥3॥
2954 अवघें जेणें पाप
नासे । तें हें असे पंढरीसी ॥1॥ गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥ अवघी
सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥2॥ तुका म्हणे जवळी आलें । उभे ठालें समचरणीं ॥3॥
2955 देह तुझ्या पायीं ।
ठेवूनि जालों उतराई ॥1॥ आतां माझ्या जीवां
। करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥ बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धी ॥2॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥3॥
2956 जन हें सुखाचें
दिल्या घेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥1॥ जाल्या हीन शक्ती
नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥ बाइल म्हणे खर
मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥2॥ तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥3॥
2957 जाणोनि नेणतें करीं
माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र
॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्निचीया सृष्टी
चेविल्या जेवीं ॥2॥ तुका
म्हणे
ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥
2958 विठ्ठला विठ्ठला ।
कंठ आळवितां फुटला ॥1॥ कई कृपा करिसी नेणें
। मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥2॥ तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥3॥
2959 ज्यासी विषयाचें
ध्यान । त्यासी कैंचा नारायण ॥1॥ साधु कैंचा
पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥ काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥2॥ तुका म्हणे निरंजनी । शट कैंचा ब्रह्मज्ञानी ॥3॥
2960 वरतें करोनियां
तोंड । हाका मारितो प्रचंड ॥1॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥ आशा धरोनि
मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥2॥ पोटा एका साटीं । तुका म्हणे जाले कष्टी ॥3॥
2961 प्रपंच वोसरो ।
चित्त तुझे पायीं मुरो ॥1॥ ऐसें करिं गा
पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥2॥ लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय
पीडा ॥3॥
2962 ऐका कलीचें हें फळ
। पुढें होइल ब्रह्मगोळ ॥1॥ चारी वर्ण अठरा
याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥ पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥2॥ वामकवळ मार्जन । जन जाईल अधोपतन ॥3॥ तुका हरिभक्ती
करी । शक्ती
पाणी वाहे घरीं ॥4॥
2963 गुरुमार्गामुळें
भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥1॥ पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मीक
अनामिका ॥ध्रु.॥ डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥2॥ कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती
स्वधर्माची ॥3॥ नसता
करुनी होम खाती एके ठायीं । म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥4॥ इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥5॥ नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें
द्रव्य कांहीं ॥6॥ तुका
म्हणे ऐसे
गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥7॥
2964 बोलाचे गौरव ।
नव्हे माझा हा अनुभव ॥1॥ माझी हरिकथा माउली
। नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥ व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें
॥2॥ दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रह्मरसें ॥3॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥4॥ तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥5॥
2965 सेवट तो भला । माझा
बहु गोड जाला ॥1॥ आलों निजांच्या
माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥2॥ तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥3॥
2966 तुझें नाम गाऊं
आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥1॥ तुझ्या नामाचा
विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी
हत्या घडे ॥2॥ नाम
घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥3॥
2967 बाइल तरी ऐसी
व्हावी । नरकीं गोवी अनिवार ॥1॥ घडों नेदी
तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥ आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें
॥2॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥3॥
2968 बाइले अधीन होय
ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥1॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोड्यांच्या
॥ध्रु.॥ वाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥2॥ तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुत्र्याचें
खाणें लगबगा ॥3॥
2969 जगीं मान्य केलें
हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥1॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें
माझें ॥ध्रु.॥ तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥2॥ तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥3॥
2970 कोंडिला गे माज ।
निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥1॥ हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी ।
जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥ तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड ।
हात गोउनी पळावें ॥2॥
संशयाचें बिर्हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल
॥3॥ तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आम्ही भार
वाहिका ॥4॥
2971 झड मारोनियां
बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥1॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो
झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥2॥ तुका म्हणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥3॥
2972 नाम न वदे ज्याची
वाचा । तो लेंक दो बापांचा ॥1॥ हे चि ओळख तयाची ।
खूण जाणा अभक्ताची ॥ध्रु.॥ ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा
॥2॥ नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥3॥ तुका म्हणे त्याचे दिवशीं । रांड गेली महारापाशीं ॥4॥
2973 पतित मी पापी शरण
आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥1॥ तारियेले भक्त
न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥ द्रौपदी
बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥2॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा
॥3॥ सुदामा ब्राह्मण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला
पांडुरंगा ॥4॥ तुका
म्हणे तुज
शरण निजभावें । पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥5॥
2974 कस्तूरीचें रूप अति
हीनवर । माजी असे सार मोल तया ॥1॥ आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां
॥ध्रु.॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥2॥ फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें
सहस्रवरी ॥ ।3॥ तुका
म्हणे
नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥4॥
2975 नव्हें मी स्वतंत्र
अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥1॥ तुम्हां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥ शक्तीहीन
तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥2॥ तुका म्हणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥3॥
2976 पाहों ग्रंथ तरी
आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥1॥ होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं
॥ध्रु.॥ एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ती वाढे ॥2॥ तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥3॥
2977 पाहातां रूप डोळां
भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥1॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥ दिसतो
हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥2॥ म्हणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां
दाखवितो ॥3॥
2978 दुःखें दुभागलें
हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे ॥1॥ ऐसें काय केलें
सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं ।
त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥2॥ काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥3॥ तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥4॥ कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥5॥
2979 सख्यत्वासी गेलों
करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥1॥ पावलों आपुलें केलें लाहें रास । निद।वां परिस काय होय
॥ध्रु.॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥2॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे
कांहीं बोलों आतां ॥3॥
2980 असो आतां कांहीं
करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥1॥ करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास
भावाचिये ॥ध्रु.॥ करितां रोदना बापुडें म्हणती । परि नये अंतीं
कामा कोणी ॥2॥
तुकयाबंधु म्हणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥3॥
2981 चरफडें चरफड शोकें
शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥1॥ कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी
॥ध्रु.॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सत्वा होइल
हानी ॥2॥ तुकयाबंधु म्हणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥3॥
2982 न लगे चिंता आतां
अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥1॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही
॥ध्रु.॥ त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥2॥ तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥3॥
2983 मूळस्थळ ज्याचें
गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥1॥ ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा
॥ध्रु.॥ वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥2॥ तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास । तेणें च आम्हांस
नागविलें ॥3॥
2984 बरा रे निर्गुणा
नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥1॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आम्हां ॥2॥ कान्हा म्हणे कां रे निःकाम देखिलें । म्हणोनि
मना आलें करितोसी ॥3॥
2985 धिंदधिंद तुझ्या
करीन धिंदड्या । ऐसें काय वेड्या जाणितलें ॥1॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला
॥ध्रु.॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥2॥ तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥3॥
2986 भुक्ती मुक्ती
तुझें जळों ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोनी
भावा वेगीं ॥1॥ रिद्धी सिद्धी
मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥ नको आपुलिया नेऊं
वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥2॥ नको होऊं कांहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून
भावा वेगीं ॥3॥
तुकयाबंधु म्हणे पाहा हो नाहींतरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा
॥4॥
2987 मुख्य आहे आम्हां
मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥1॥ नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥ साहे
संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥2॥ तुकयाबंधु म्हणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥3॥
2988 नये सोमसरी
उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥1॥ मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां एके
ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥2॥ तुकयाबंधु म्हणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥3॥
2989 लालुचाईसाटीं बळकाविसी
भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥1॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास
॥ध्रु.॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥2॥ करुणारसें तुकयाबंधु म्हणे
भुलवीन । काढूनि घेईन निज वस्तु ॥3॥
2990 तुझीं वर्में आम्हां ठावीं
नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥1॥ मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी
॥ध्रु.॥ जाणोनि अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥2॥ तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥3॥
2991 अवघीं तुज बाळें
सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥1॥ म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी
॥ध्रु.॥ एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥2॥ एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥3॥ एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥4॥ तुकयाबंधु म्हणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥5॥
2992 निनांवा हें तुला ।
नांव साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥1॥ कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें ।
एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥ मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं फांशाचे
गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥2 ॥ तुकयाबंधु म्हणे मिस्कीन । करितोसी देखोन । पाहा दुरिवरी विच्छिन्न ।
केला परी संसार ॥3॥
2993 नाहीं घटिका म्हणसी ।
लाग लागला तुजपाशीं । पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥1॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन । माणसांमधून ।
उठविलें खाणोर्या ॥ध्रु.॥ आम्हीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि । जालासी कोठोनि ।
पैदा चोरा देहाच्या ॥2॥ तुकयाबंधु म्हणे
केलें । उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें ।
होतें तुज न पुरतें ॥3॥
2994 कनवाळ कृपाळ । उदार
दयाळ मायाळ । म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥1॥ काय केलें होतें आम्हीं । सांग तुझें एकये
जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥ध्रु.॥ भलेपणाचा
पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥2॥ तुकयाबंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला । जीव आमुचा
नेला । अंत पाहिला कांहींतरी ॥3॥
2995 आतां कळों आले गुण
। अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥1॥ या नांवें कृपासिंधु । म्हणवितोसी
दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥ अमळ दया नाहीं पोटीं । कठीण
तैसाचि कपटी । अंधळ्याची काठी । माझी गुदरसी च ना ॥2॥ तुकयाबंधु म्हणे पुरता । नाहीं म्हूण बरें अनंता । एरवीं असतां ।
तुझा घोंट भरियेला ॥3॥
2996 काय सांगों
हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥1॥ माझें बुडविलें घर । लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं
काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥ जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें
उरलें आहे । भावाचिया निमित्यें ॥2॥ तुकयाबंधु म्हणे जग । बरें वाईट म्हणो मग
। या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥3॥
2997 मायबाप निमाल्यावरी
। घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाई ॥1॥ हे कां भक्तीचे उपकार । नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे
जालासी ॥ध्रु.॥ एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो
निर्लज्जा ॥2॥
तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला । वेडा
त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥3॥
2998 पूर्वा
पूर्वजांची गती । हे चि आईकीली होती । सेवे लावूनि श्रीपती । निश्चिंती
केली तयांची ॥1॥ कां रे पाठी
लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी
किती म्हूण ॥ध्रु.॥ जन्मजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां
केशवा । निमित्य चालवा । काईसयास्तव हें ॥2॥ तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न
खात्या ॥3॥
2999 निसुर संसार करून ।
होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥1॥ ऐसा काढियेला निस । काय म्हूण सहित
वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ध्रु.॥ उरलों पालव्या सेवटीं । तें
ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥2॥ तुकयाबंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाड । म्हणोनी
कां बुड । मुळ्यासहित खावें ॥3॥
3000 बरा जाणतोसी
धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती । करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥1॥ आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा ।
आपणां भोंवता ॥ध्रु.॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व ।
येइल परि हा भाव । ज्याचा त्यासी कारणा ॥2॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां आम्हां बोल कांहीं । जडोनियां
पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.