तुकारामगाथा १८०१ - १८९७
1801 रज्जु धरूनियां
हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥1॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव
पाहों तरावया ॥ध्रु.॥ सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक
सोनें आटितां ॥2॥ पिसांचीं पारवीं ।
करोनि बाजागिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥3॥
1802 नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥1॥ वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥ आतां तुझ्या घरा ।
कोण करी येरझारा ॥2 ॥ तुका म्हणे
ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥3॥
1803 व्यवहार तो खोटा ।
आतां न वजों तुझ्या वाटा ॥1॥ एका नामा नाहीं ताळ
। केली सहस्त्रांची माळ ॥ध्रु.॥ पाहों जातां घाई । खेळसी लपंडाई ॥2॥ तुका म्हणे चार
। बहु करितोसी फार॥3॥
1804 लटिका चि केला ।
सोंग पसारा दाविला ॥1॥ अवघा बुडालासी ॠणें
। बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥ लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥2॥ तुका म्हणे हात । आम्ही अवरिली मात ॥3॥
1805 दाखवूनि आस । केला
बहुतांचा नास ॥1॥ थोंटा झोडा शिरोमणी
। भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥2॥ तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥3॥
1806 लाज ना विचार ।
बाजारी तूं भांडखोर ॥1॥ ऐसें ज्याणें
व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥ फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥2॥ तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥3॥
1807 ठाव नाहीं बुड ।
घरें वसविसी कुड ॥1॥ भलते ठायीं तुझा
वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥2॥ न पुसतां भलें । तुका म्हणे
बुझें बोलें ॥3॥
1808 श्वाना दिली सवे ।
पायांभोंवतें तें भोंवे ॥1॥ तैसी जाली मज परी ।
वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥ जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥2॥ कोपेल तो घनी । तुका म्हणे
नेणें मनीं॥3॥
1809 वटवट केली । न
विचारितां मना आली ॥1॥ मज कराल तें क्षमा
। कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥2॥ तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥3॥
1810 जीवें व्हावें साटी
। पडे संवसारें तुटी ॥1॥ ऐशीं बोलिलों वचनें
। सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥ नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥2॥ ठाव पुसी सेणें । तुका म्हणे
खुंटी येणें ॥3॥
1811 आता पंढरीराया ।
माझ्या निरसावें भया ॥1॥ मनीं राहिली आशंका
। स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥ ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥2॥ तुका म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥3॥
1812 कवतुकवाणें । बोलों
बोबड्या वचनें ॥1॥ हें तों नसावें अंतरीं । आम्हां
धरायाचें दुरी ॥ध्रु.॥ स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥2॥ तुका म्हणे बोलें । मज तुम्ही शिकविलें॥3॥
1813 असो मागें जालें ।
पुडें गोड तें चांगलें ॥1॥ आतां माझे मनीं ।
कांहीं अपराध न मनीं ॥ध्रु.॥ नेदीं अवसान । करितां नामाचें चिंतन ॥2॥ तुका म्हणे बोले । तुज आधीं च गोविलें॥3॥
1814 मातेविण बाळा ।
आणिक न माने सोहळा ॥1॥ तैसें जालें माझ्या
चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥ वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥2॥ सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥3॥ जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥4॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥5॥ कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥6॥ तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥7॥
1815 तुजऐसा कोणी न
देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥1॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ
देसी ॥ध्रु.॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कैवारें
देवा भक्तांचिया ॥2॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥3॥ तुका म्हणे तुज वाणूं कैशापरी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥4॥
1816 काय तुझे उपकार
पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥1॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥ घडल्या दोषांचें न
घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥2॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥3॥ तुका म्हणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥4॥
1817 वाळूनियां जन सांडी
मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥1॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥ नावडती जीवा आणीक
प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥2॥ तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होई नारायणा साह्य मज ॥3॥
1818 सांगतों या मना तें
माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥1॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥ काय तें संचित न
कळे पाहातां । मतिमंद चित्ता उपजतें ॥2॥ तुका म्हणे
ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥3॥
1819 आतां नको चुकों
आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाईच्या ॥1॥ आचरावे दोष हें आम्हां विहित । तारावे पतित
तुमचें तें ॥ध्रु.॥ आम्ही तों आपुलें केलेसें जतन । घडो तुम्हांकून
घडेल ते ॥2॥ तुका म्हणे
विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥3॥
1820 मुखें बोलावें तें
जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥1॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुम्ही
त्याचा ॥ध्रु.॥ आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों
नये ॥2॥ तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥3॥
1821 कामातुरा भय लाज ना
विचार । शरीर असार तृणतुल्य ॥1॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले
॥ध्रु.॥ लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥2॥ तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥3॥
1822 बांधे सोडी हें तों
धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥1॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतर्यानें
भाव पालटिला ॥ध्रु.॥ घरांत रिघावें दाराचिये सोई । भिंतीसवें डोई घेऊनि फोडी ॥2॥ तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥3॥
1823 कवण जन्मता कवण
जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥1॥ कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी
॥ध्रु.॥ कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥2॥ कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥3॥ सर्वां ठायीं तूं चि सर्व ही जालासी । तुका म्हणे
यासी दुजें नव्हे ॥4॥
1824 जेथें देखें तेथें
तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा
मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघीच मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन
सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥1॥ अवघा आम्हां तूंच जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें
कांहींच करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥ वाचा बोले ते तुझेचि
गुणवाद । मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं
फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा
निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ती ॥2॥ जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें । महाल मंदिरें माड्या
तनघरें । झोपड्या अवघीं देव देवाइलें । ऐकें कानीं त्या
हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले ॥3॥
1825 जे दोष घडले न फिटे
करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥1॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठ पांडुरंगा
॥ध्रु.॥ यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥2॥ तुका म्हणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥3॥
1826 हरिकथेची आवडी देवा
। करितो सेवा दासांची ॥1॥ म्हणोनि
हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥ निर्लज्ज भोजें
नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥2॥ तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवसाटी ॥3॥
1827 साधन संपत्ती हें
चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥1॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥ वैष्णवांचा संग
रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥2॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥3॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥4॥ तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥5॥
1828 यथार्थवादें तुज न
वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज
नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां॥1॥ आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों
॥ध्रु.॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां
श्रुतीं । तो आम्ही भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥2॥ सहस्त्रमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला । तेथें माझी देहबुद्धी तें
काई । थोर मी अन्यायी तुका ह्मणे ॥3॥
1829 कृष्ण गातां गीतीं
कृष्ण ध्यातां चित्तीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥1॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे
भोगिता नारायण ॥ध्रु.॥ ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥2॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥3॥ तुका म्हणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥4॥
1830 डोळियां पाझर
कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥1॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त
तुझें ॥ध्रु.॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥2॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥3॥ तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥4॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥5॥ एक वेळ माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये
वो न्यावयासी ॥6॥
1831 अधिक कोंडितां
चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥1॥ काय करूं या मना
आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥ध्रु.॥ भजन नावडे श्रवण ।
धांवे विषय अवलोकून ॥2॥ बहुत चंचळ चपळ ।
जातां येतां न लगे वेळ ॥3॥ किती राखों दोनी
काळ । निजलिया जागे वेळे ॥4॥ मज राखें आतां ।
तुका म्हणे पंढरिनाथा ॥5॥
1832 कंथा प्रावर्ण ।
नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥1॥ करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥ देऊळ नव्हे घर ।
प्रपंच परउपकार ॥2॥ विधिसेवन काम ।
नव्हे शब्द रामराम ॥3॥ हत्या क्षत्रधर्म ।
नव्हे निष्काम तें कर्म ॥4॥ तुका म्हणे
संतीं । करूनि ठेविली आइती ॥5॥
1833 पडोनियां राहीं ।
उगा च संतांचिये पायीं ॥1॥ न लगे पुसणें सांगावें
। चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥ सहज ते स्थिति । उपदेश परयुक्ती
॥2॥ तुका म्हणे भाव
। जवळी धरूनि आणी देव ॥3॥
1834 देवाचे घरीं देवें
केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥1॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें
कवणिया गांवा ॥ध्रु.॥ सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें
वाटोळें ॥2॥ तुका म्हणे
येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥3॥
1835 अवघे चि निजों नका
अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥1॥ जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें
॥ध्रु.॥ सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं
तळमळ उरे ॥2॥ तुका म्हणे आम्ही करूं
आपलें जतन । न लगे कांहीं कोणां द्यावें उघडा रे कान ॥3॥
1836 काळोखी खाऊन कैवाड
केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥1॥ कां रें तुम्ही नेणां कां रे तुम्ही नेणां । अल्पसुखासाटीं
पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥ नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया
बळें ॥2॥ तुका म्हणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें॥3॥
1837 जाय परतें काय
आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसें तरी ॥1॥ कां हो केलें तुम्ही निष्ठ देवा । मानेना
हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥ भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं
आमुचिया ॥2॥ तुका म्हणे तुम्हापासूनि
अंतर । न पडे नाहीं स्थिर बुद्धी माझी ॥3॥
1838 अनुभवें कळों येतें
पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुम्हांवरी ॥1॥ आवरितां चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ध्रु.॥ अंतरीं संसार भक्ती बाह्यात्कार । म्हणोनि अंतर तुझ्या पायीं ॥2॥ तुका म्हणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥3॥
1839 तुजकरितां होतें
आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥1॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥ चुकलासी म्हणों
तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥2॥ तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुम्ही ॥3॥
1840 फळ देंठींहून झडे ।
मग मागुतें न जोडे ॥1॥ म्हणोनि
तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥ पुढें चढे हात । त्याग मागिलां
उचित ॥2॥ तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥3॥
1841 अगी देखोनियां सती
। अंगीं रोमांच उठती ॥1॥ हा तो नव्हे उपदेश
। सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥ वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥2॥ आठवूनि एका । उडी घाली म्हणे
तुका ॥3॥
1842 फळ पिके देंठीं ।
निमित्य वारियाची भेटी ॥1॥ हा तों अनुभव रोकडा
। कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥ तोडिलिया बळें । वांयां जाती काचीं फळें ॥2॥ तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण ॥3॥
1843 हालवूनि खुंट ।
आधीं करावा बळकट ॥1॥ मग तयाच्या आधारें
। करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ सुख दुःख साहे । हर्षामर्षा भंगा
नये ॥2॥ तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें॥3॥
1844 धांवे माते सोई । बाळ न विचारितां
कांहीं ॥1॥ मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥ नेणे सर्प दोरी ।
अगी भलतें हातीं धरी ॥2॥ तीविन तें नेणें ।
आणीक कांहीं तुका म्हणे ॥3॥
1845 भोग द्यावे देवा ।
त्याग भोगीं च बरवा ॥1॥ आपण व्हावें एकीकडे
। देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥2॥ वंचक त्यासी दोष । तुका म्हणे
मिथ्या सोस ॥3॥
1846 पायांच्या प्रसादें
। कांहीं बोलिलों विनोदें ॥1॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ती ॥ध्रु.॥ नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥2॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥3॥
1847 जायांचें अंगुलें
लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥1॥ गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां
॥2॥ तुका म्हणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥3॥
1848 न बोलावें परी
पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥1॥ लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें
॥ध्रु.॥ निलाजिरीं आम्ही करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥2॥ कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥3॥ तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥4॥
1849 नाहीं जालें मोल
कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥1॥ आम्ही तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥ बहु चाळविलें मागें
आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥2॥ नव्हती जों भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि
दुःखी बहु जालें ॥3॥ तुका म्हणे
कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥4॥
1850 कैसा कृपाळु हें न
कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥1॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हा रिघेसी कोणा आड
॥ध्रु.॥ पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥2॥ आतां तुम्हां आम्हां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥3॥ तुका म्हणे मज साह्य झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥4॥
1851 चुकलिया आम्हां
करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥1॥ चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी
भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥ कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा
दंभासाटीं ॥2॥ केलें म्यां जतन
आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥3॥ तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥4॥
1852 कृपावंता कोप न
धरावा चित्तीं । छळूं वक्रोक्ती स्तुती करूं ॥1॥ आम्ही तुझा पार काय जाणों देवा । नेणों कैसी सेवा करावी ते
॥ध्रु.॥ अनंता अरूपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा
॥2॥ चांगलीं हीं नामें घेतलीं ठेवून । जालासी लाहान भक्तीकाजा ॥3॥ तुका म्हणे तुझ्या पायांवरी सदा । मस्तक गोविंदा असो माझा ॥4॥
1853 आतां तुझा भाव कळों
आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥1॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार
॥ध्रु.॥ स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥2॥ जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥3॥ तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैसें नाचों ॥4॥
1854 जन पूजी याचा मज
कां आभार । हा तुम्ही विचार जाणां देवा ॥1॥ पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्या चि मुळें
॥ध्रु.॥ मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय
तेव्हां ॥2॥ आतां तूं भोगिता
सर्व नारायणा । नको आम्हां दीनां पीडा करूं ॥3॥ आपुलिया हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा
तो चि आम्हां ॥4॥
1855 आमची कां नये तुम्हासी
करुणा । किती नारायणा आळवावें ॥1॥ काय जाणां तुम्ही दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥ देती घेती करिती
खटपटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥2॥ दिवस बोटी आम्ही धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥3॥ तुका म्हणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आम्ही ॥4॥
1856 तुम्हां आम्हां तुटी
होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥1॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥ सारिलें संचित
होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥2॥ जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें
॥3॥ तुका म्हणे आम्हां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥4॥
1857 देव मजुर देव मजुर
। नाहीं उजुर सेवेपुढें ॥1॥ देव गांढ्याळ देव
गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥2॥ देव तर काई देव तर काई । तुका म्हणे राई तरी मोटी ॥3॥
1858 देव दयाळ देव दयाळ
। साहे कोल्हाळ बहुतांचा ॥1॥ देव उदार देव उदार ।
थोड्यासाटीं फार देऊं जाणे ॥2॥ देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥3॥
1859 देव बासर देव बासर
। असे निरंतर जेथें तेथें ॥1॥ देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥ देव लागट देव लागट
। लाविलिया चट जीवीं जडे ॥2॥ देव बावळा देव
बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥3॥ देव न व्हावा देव न व्हावा । तुका म्हणे
गोवा करी कामीं ॥4॥
1860 देव निढळ देव निढळ
। मूळ नाहीं डाळ परदेशी ॥1॥ देव अकुळी देव
अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥2॥ देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥3॥
1861 देव बराडी देव
बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥1॥ देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥ देव भाविक भाविक ।
होय दासाचें सेवक ॥2॥ देव होया देव होया
। जैसा म्हणे तैसा तया ॥3॥ देव लाहान लाहान । तुका म्हणे
अनुरेण ॥4॥
1862 देव भला देव भला ।
मिळोनि जाय जैसा त्याला ॥1॥ देव उदार उदार ।
देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥ देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥2॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥3॥ देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥4॥
1863 देव पाहों देव
पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥1॥ देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥ देवा कांहीं मागों
मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥2॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥3॥ देव कातर कातर । तुका म्हणे
अभ्यंतर ॥4॥
1864 देव आमचा आमचा ।
जीव सकळ जीवांचा ॥1॥ देव आहे देव आहे ।
जवळीं आम्हां अंतरबाहे ॥ध्रु.॥ देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही
कोड ॥2॥ देव आम्हां राखे राखे । घाली कळीकाळासी काखे ॥3॥ देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥4॥
1865 जाऊं देवाचिया
गांवां । देव देईल विसांवा ॥1॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर
॥2॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥3॥ तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥4॥
1866 प्रेम तेथें वास
करी । मुखीं उच्चारितां हरी ॥1॥ प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥ प्रेमें पाठी लागे
बळें । भक्त
देखोनियां भोळे ॥2॥ प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥3॥ तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥4॥
1867 संत मानितील मज ।
तेणें वाटतसे लाज ॥1॥ तुम्ही कृपा
केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥ गोविलों थोरिवां ।
दुःख वाटतसे जीवा ॥2॥ तुका म्हणे
माया । अवरा हे पंढरिराया ॥3॥
1868 नाहीं तुम्ही केला
। अंगीकार तो विठ्ठला ॥1॥ सोंगें न पवीजे थडी
। माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥ प्रेम नाही अंगीं । भले म्हणविलें
जगीं ॥2॥ तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा॥3॥
1869 आतां चक्रधरा । झणी
आम्हांस अव्हेरा ॥1॥ तुमचीं म्हणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥ काळ आम्हां खाय ।
तरी तुझें नांव जाय ॥2॥ तुका म्हणे
देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥3॥
1870 मज ऐसें कोण
उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥1॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें
॥ध्रु.॥ धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न
देखिजे ॥2॥ तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥3॥
1871 काय तें सामर्थ्य न
चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण ॥1॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरिष्ठ तें
॥ध्रु.॥ काय गमाविली सुदर्शन गदा । नो बोला गोविंदा लाजतसां ॥2॥ तुका म्हणे काय ब्रिदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥3॥
1872 बळ बुद्धी
वेचुनियां शक्ति । उदक चालवावें युक्ती ॥1॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥ पाट मोट कळा । भरित
पखाळा सागळा ॥2॥ बीज ज्यासी घ्यावें । तुका म्हणे
तैसें व्हावें ॥3॥
1873 न म्हणे
साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥1॥ सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥ न म्हणे
दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥2॥ तुका म्हणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥3॥
1874 इच्छा चाड नाहीं ।
न धरी संकोच ही कांहीं ॥1॥ उदका नेलें तिकडे
जावें । केलें तैसें सहज व्हावें ॥ध्रु.॥ मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस
॥2॥ तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥3॥
1875 तरले ते मागें
आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥1॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुम्ही
त्यांसी ॥ध्रु.॥ मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुम्ही
तारिला पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे
नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥3॥
1876 कवणांशीं भांडों
कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥1॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥ आइकोन माझे नाइकसी
बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥2॥ तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनि
खंती वाटे देवा ॥3॥
1877 आळवितां कंठ शोकला
भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥1॥ अझून कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा
॥ध्रु.॥ धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं विष जालें ॥2॥ चुकलों काय तें मज क्षमा करीं । आलिंगूनि
हरी प्रेम द्यावें ॥3॥ अवस्था राहिली
रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥4॥ तुका म्हणे माजे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥5॥
॥ शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले ते अभंग ॥ 14 ॥
1878 दिवट्या छत्री
घोडे । हें तों बर्यांत न पडे ॥1॥ आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥ मान दंभ चेष्टा । हे तों शूकराची
विष्ठा ॥2॥ तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धांवा ॥3॥
1879 नावडे जें चित्ता ।
तें चि होसी पुरविता ॥1॥ कां रे पुरविली
पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥ न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥2॥ सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥3॥ जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥4॥ तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥5॥
1880 जाणोनि अंतर । टाळिसील
करकर ॥1॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ध्रु.॥ उठविसी दारीं ।
धरणें एखादिया परी ॥2॥ तुका म्हणे
पाये । कैसे सोडीन ते पाहें ॥3॥
1881 नाहीं विचारीत ।
मेघ हागनदारी सेत ॥1॥ नये पाहों त्याचा
अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥2॥ तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥3॥
1882 काय दिला ठेवा । आम्हां
विठ्ठल चि व्हावा ॥1॥ तुम्ही
कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥ जीव दिला तरी । वचना माझ्या नये
सरी ॥2॥ तुका म्हणे धन । आम्हां गोमासासमान ॥3॥
1883 पिकवावें धन ।
ज्याची आस करी जन ॥1॥ पुढें उरे खातां
देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज । तरीं च हातीं लागे निज ॥2॥ तुका म्हणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥3॥
1884 मुंगी आणि राव । आम्हां
सारखाची जीव ॥1॥ गेला मोह आणि आशा ।
कळीकाळाचा
हा फांसा ॥ध्रु.॥ सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥2॥ तुका म्हणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥3॥
1885 तिहीं त्रिभुवनीं ।
आम्ही वैभवाचे धनी ॥1॥ हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥ काय त्रिभुवनीं बळ । अंगीं आमुच्या
सकळ ॥2॥ तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥3॥
1886 आम्ही तेणें
सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥1॥ तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान
॥ध्रु.॥ कंटीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥2॥ म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज
हे आस ॥3॥
1887 नाही काष्ठाचा
गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥1॥ प्रेम प्रीतीचे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ पदरीं घालीं पिळा । बाप निर्बळ साटी
बाळा ॥2॥ तुका म्हणे भावें । भेणें देवा आकारावें ॥3॥
1888 भावापुढें बळ ।
नाहीं कोणाचे सबळ ॥1॥ करी देवावरी सत्ता
। कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥ बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ति ॥2॥ तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥3॥
1889 भावाचिया बळें । आम्ही
निर्भर दुर्बळें ॥1॥ नाहीं आणिकांची
सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥ तर्का
नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥2॥ एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज ॥3॥
1890 सत्तावर्त्ते मन ।
पाळी विठ्ठलाची आन ॥1॥ आज्ञा
वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥ सरलीसे धांव । न
लगे वाढवावी हांव ॥2॥ आहे नाहीं त्याचें
। तुका म्हणे कळे साचें ॥3॥
1891 खावें ल्यावें
द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥1॥ आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा
बोभाट ॥ध्रु.॥ आहे नाहीं त्याचें । आम्हां काम
सांगायाचें ॥2॥ तुका म्हणे
चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥3॥
1892 आतां बरें जालें ।
माझे माथांचें निघालें ॥1॥ चुकली हे मरमर ।
भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥ नसतां कांहीं जोडी । करिती बहुतें तडातोडी ॥2॥ जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली
पीडा ॥3॥
1893 संचितें चि खावें ।
पुढें कोणाचें न घ्यावें ॥1॥ आतां पुरे हे चाकरी
। राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥ नाहीं काम हातीं । आराणूक दिसराती ॥2॥ तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥3॥
1894 ज्याचे गांवीं केला
वास । त्यासी नसावें उदास ॥1॥ तरी च जोडिलें तें
भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥ वाढवावी थोरी । मुखें म्हणे तुझे हरी ॥2॥ तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥3॥
1895 माझा तुम्ही देवा
केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥1॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें
तैसा ॥ध्रु.॥ लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥2॥ तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥3॥
1896 तोंडें बोलावें तें
तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥1॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥ जेवित्याची खूण
वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥2॥ तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥3॥
1897 न पालटे एक । भोळा
भक्त चि भाविक ॥1॥ येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥ नेणे गर्भवास । एक
विष्णूचा चि दास ॥2॥ तुका म्हणे
खरें । नाम विठोबाचे बरें ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.