तुकारामगाथा २६०१ – २७००
तुकारामगाथा
२६०१ – २७००
2601 संकल्पासी अधिष्ठान
। नारायण गोमटें ॥1॥ अवघियांचें पुरे
कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव
चित्तीं राहिलिया ॥2॥ तुका
म्हणे जीव
धाय । नये हाय जवळी ॥3॥
2602 भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥1॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा
लाभ । टांचें नभ सांटवणें ॥2॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥3॥
2603 जरी आलें राज्य
मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥1॥ तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम
कामीं ॥ध्रु.॥ वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥2॥ तुका म्हणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥3॥
2604 कोण होईल आतां
संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥1॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे
॥ध्रु.॥ सहजें चि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥2॥ तुका म्हणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥3॥
2605 आम्हां
शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥1॥ परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥
अभयदानवृंदें । आम्हां कैंचीं द्वंदें ॥2॥ तुका म्हणे आम्ही । हरिजन साधनाचे स्वामी ॥3॥
2606 देवाचिये चाडे
प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥1॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥2॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥3॥ ॥1॥
2607 खळा सदा क्षुद्रीं
दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥1॥ करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥ दया संतां
भांडवल । वेची बोल उपकार ॥2॥ तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥3॥
2608 जग ऐसें बहुनांवें
। बहुनावें भावना ॥1॥ पाहों बोलों बहु
नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥ कारियासी जें कारण । तें जतन करावें ॥2॥ तुका म्हणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥3॥
2609 निघालें तें
अगीहूनि । आतां झणी आतळे ॥1॥ पळवा परपरतें दुरी
। आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥2॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥3॥
2610 आतां दुसरें नाहीं
वनीं । निरांजनी पडिलों ॥1॥ तुमची च पाहें वास
। अवघी आस निरसली ॥ध्रु.॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥2॥ तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥3॥
2611 धरूनियां सोई परतलें मन ।
अनुलक्षीं चरण करूनियां ॥1॥ येई पांडुरंगे नेई सांभाळूनि ।
करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥ बुद्धी जाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥2॥ न चलती पाय गिळत जाली काया । म्हणऊनि
दया येऊं द्यावी ॥3॥
दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥4॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥5॥
2612 कौलें भरियेली पेंठ
। निग्रहाचे खोटे तंट ॥1॥ ऐसें माता जाणे
वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥ कामवितां लोहो कसे । तांतडीनें काम
नासे ॥2॥ तुका म्हणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥3॥
2613 चालिलें न वाटे ।
गाऊनियां जातां वाटे ॥1॥ बरवा वैष्णवांचा
संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥ नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥2॥ तुका म्हणे भक्ती
। सुखरूप आदीं अंतीं ॥3॥
2614 करितां विचार तो हा
दृढ संसार । ब्रह्मांदिकां पार नुलंघवे सामर्थ्या ॥1॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें
वचनांपासीं माझ्या सामर्थ्या ॥ध्रु.॥ पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला
जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥2॥ आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी
पायां सोई मनाची ॥3॥
2615 बहुतां जातीचा केला
अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥1॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे
॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥2॥ तुका म्हणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥3॥
2616 पोट धालें आतां
जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥1॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं
॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां
ठाव काय वांचे ॥2॥
दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित
एकपणें ॥3॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥4॥ तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंद एकसरें ॥5॥
2617 एका हातीं टाळ एका
हातीं चिपळिया । घालिती हुंमरी एक वाताती टाळिया ॥1॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं चाड
मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥ हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न
कळे केव्हां रजनी दिवस ॥2॥ तीर्था नाहीं
चाड न लगे जावें वनांतरा । तुका म्हणे हरिहरात्मक चि पृथुवी॥3॥
2618 देव सखा आतां केलें
नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥1॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं
॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥2॥ अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती
सत्ता संचिताची ॥3॥
पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥4॥ तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां
देवा तुमचींसीं ॥5॥
2619 कोण आतां कळिकाळा ।
येऊं बळा देईल ॥1॥ सत्ता झाली
त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥2॥ तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥3॥
2620 आम्हां आवडे
नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥1॥ उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥ आम्ही शोभों
निकटवासें । अनारिसें न दिसे ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥3॥
2621 देह तंव असे भोगाचे
अधीन । याचें सुख सीण क्षणभंगर ॥1॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥2॥ तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥3॥
2622 आतां आवश्यक करणें
समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥1॥ केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं
॥ध्रु.॥ नाहीं भक्तराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥2॥ तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥3॥
2623 काया वाचा मनें
श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥1॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी
॥ध्रु.॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥12॥ तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥3॥
2624 पुढीलांचे सोयी
माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥1॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥
आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥2॥ तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥3॥
2625 बहुत करूनि
चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥1॥ लागटपणें
मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुम्हांसी
कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥2॥ तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥3॥
2626 तीर्थ जळ देखे
पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥1॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां
जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥2॥ तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धी कष्टी
सदा दुःखी ॥3॥
2627 नव्हे मतोळ्याचा वाण
। नीच नवा नारायण ॥1॥ सुख उपजे श्रवणें ।
खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥2॥ तुका म्हणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥3॥
2628 घातला दुकान । देती
आलियासी दान ॥1॥ संत उदार उदार ।
भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥2॥ तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥3॥
2629 नरस्तुति आणि कथेचा
विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥1॥ ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा
॥ध्रु.॥ पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥2॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं
॥3॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥4॥ तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥5॥
2630 लौकिकापुरती नव्हे
माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥1॥ म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥
एकविध आम्ही स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥2॥ तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां
धर्माधर्म ठावे देवा ॥3॥
2631 ज्यांच्या संगें
होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥1॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा
॥ध्रु.॥ प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥2॥ तुका म्हणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥3॥
2632 आवडीभोजन प्रकार
परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥1॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला
॥ध्रु.॥ पाकसिद्धी स्वहस्तकें विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥2॥ तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥3॥
2633 समर्थाचा ठाव
संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥1॥ पावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं ॥ध्रु.॥ न लगे
पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥2॥ तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥3॥
2634 आपुल्यांचा करीन
मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥1॥ अवघियांचे वंदिन
पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥2॥ तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥3॥
2635 जन्ममरणांची
विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥1॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥
लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥2॥ तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥3॥
2636 उदार तूं हरी ऐसी
कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥1॥ तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव । देवाचा तूं देव
स्वामी सकळा ब्रह्मांडा ॥ध्रु.॥ मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों
तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥2॥ दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका म्हणे
जिणें माझें तुज अधीन ॥3॥
2637 पाहा किती आले शरण
समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥1॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा
कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग
न म्हणे दगड ॥2॥ तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या
दोषांच्या ॥3॥
2638 आतां चुकलें बंधन
गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥1॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों
तळ नल्हाचि ॥ध्रु.॥ होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें
तों चि लाहो साधिला ॥2॥
कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साह्य नेदी
विसंबों ॥3॥
2639 तुझ्या रूपें माझी
काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥1॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी
मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे
प्रति माघारी ॥2॥ जीव
ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका म्हणे
खंडलें ॥3॥
2640 सोसें सोसें मारूं
हाका । होइल चुका म्हणऊनि ॥1॥ मागें पुढें
क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां
पडताळीं ॥2॥ तुका
म्हणे
सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥3॥
2641 धरूनियां चाली
हांवा । येइन गांवां धांवत ॥1॥ पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥ नाचेन त्या
प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाइऩन ॥2॥ तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥3॥
2642 मायबापाचिये भेटी ।
अवघ्या तुटी संकोचा ॥1॥ भोगिलें तें आहे
सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥2॥ तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥3॥
2643 उदासीनाचा देह ब्रह्मरूप
। नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥1॥ अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥ दोष ऐशा
नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें ॥2॥ तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥3॥
2644 बंधनाचा तोडूं
फांसा । देऊं आशा टाकोनि ॥1॥ नाहीं तें च घेतां
शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥2॥ तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥3॥
2645 तें च किती वारंवार
। बोलों फार बोलिलें ॥1॥ आतां माझें दंडवत ।
तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥2॥ तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥3॥
2646 उपासा सेवटीं
अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥1॥ पुरवीं
वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥ बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं
। तैसा दाटो पोटीं प्रीतिभोग ॥2॥ तुका
म्हणे धन
कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥3॥
2647 रणीं निघतां शूर न
पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥1॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा
॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥2॥ तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां
॥3॥
2648 सकळ पूजा स्तुति ।
करावी ते व्होवें याती ॥1॥ म्हणऊनि
वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥2॥ तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥3॥
2649 धीर नव्हे मनें ।
काय तयापाशीं उणें ॥1॥ भार घातलियावरी ।
दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥ याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥2॥ तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥3॥
2650 द्रव्याचिया कोटी ।
नये गांडीची लंगोटी ॥1॥ अंती बोळवणेसाटीं ।
पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥2॥ तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥3॥
2651 कोणापाशीं आतां
सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥1॥ कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं
उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥2॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें
॥3॥ तुका म्हणे देतों देवाचें गार्हाणें । माझें रिण येणें
सोसियेलें ॥4॥
2652 राहिलों निराळा ।
पाहों कवतुक डोळां ॥1॥ करूं जगाचा विनोद ।
डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोळ्यांसी
माजिरें ॥2॥ तुका
म्हणे
माथा । कोणी नुचली सर्वथा ॥3॥
2653 आम्हां
एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥1॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते
प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥ दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें ॥2॥ तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥3॥
2654 राहाणें तें
पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥1॥ ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास ।
आणिकां नास कारण ॥2॥ तुका
म्हणे
शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥3॥
2655 चंदन तो चंदनपणें ।
सहज गुणसंपन्न ॥1॥ वेधलिया धन्य जाती
। भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥2॥ तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥3॥
2656 लय लक्षी मन न राहे
निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥1॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां
॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥2॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धी ॥3॥ भक्ती
तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥4॥ तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥5॥
2657 ऐसें कां हो न करा
कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥1॥ विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥ श्रुतीचें कां
नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥2॥ तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी॥3॥
2658 जाला प्रेतरूप
शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥1॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती
हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां
जीवित्वेसी ॥2॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥3॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥4॥ तुका म्हणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥5॥
2659 आपुलें मरण पाहिलें
म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला
॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों
॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥
2660 बोळविला देह
आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥1॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥
अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥2॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ।3॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला
नामीं ॥4॥ तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥5॥
2661 पिंडदान पिंडें
ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥1॥ सारिले संकल्प एका
चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥ सव्य अपसव्य
बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥2॥ पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन
अभेदेंसी ॥3॥ आहे तैसी पूजा
पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥4॥ तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥5॥
2662 सरलें आतां नाहीं ।
न म्हणे वेळकाळ कांहीं ॥1॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥ सीण न विचारी भाग ।
नव्हे निष्ठ नाहीं राग ॥2॥ भेदाभेद नाहीं ।
तुका म्हणे तिच्याठायीं ॥3॥
2663 तुज पाहावें हे धरितों
वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥1॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें
उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥2॥ तुका म्हणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुम्ही साहे
न व्हा देवा ॥3॥
2664 दुष्ट आचरण ग्वाही
माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥1॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥ व्याह्याजांवायांचे
पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥2॥ तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं
॥3॥
2665 आतां भय नाहीं ऐसें
वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥1॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें
॥ध्रु.॥ येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥2॥ तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥3॥
2666 वैष्णवें चोरटीं ।
आलीं घरासी करंटीं ॥1॥ आजि आपुलें जतन ।
करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ ज्याचे घरीं खावें । त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥2॥ तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥3॥
2667 ऐकतों दाट । आले
एकांचें बोभाट ॥1॥ नका विश्वासों
यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥ हे चि यांची जोडी । सदा बोडकीं उघडीं
॥2॥ तुका म्हणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥3॥
2668 आणिकांची सेवा
करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥1॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥
आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥2॥ आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही
॥3॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं
दोन्ही ॥4॥ तुका म्हणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥5॥
2669 दुर्जनाची जाती ।
त्याचे तोंडीं पडे माती ॥1॥ त्याची बुद्धी
त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥2॥ उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा
कांहीं ॥3॥
2670 न करीं उदास । माझी
पुरवावी आस ॥1॥ ऐका ऐका नारायणा ।
माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥ मायबाप बंधुजन । तूं चि सोयरा
सज्जन ॥2॥ तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥3॥
2671 जीवन उपाय ।
वैदेवाणी तुझे पाय ॥1॥ ते मी नाठवीं
घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग
॥2॥ तुका म्हणे विटे । धरियेले जें गोमटें ॥3॥
2672 ऐका हें वचन माझें
संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥1॥ तर्क करूनियां
आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥ आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो ।
रकुमाईचा नाहो पांडुरंग ॥2॥ चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । म्हणऊनि
कांहीं नावडे त्या ॥3॥ तुका
म्हणे मज
न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥4॥
2673 ऐसा कोणी नाहीं हें
जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥1॥ निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा
॥ध्रु.॥ काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥2॥ जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥3॥ तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥4॥
2674 काय मी अन्यायी तें
घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥1॥ माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा
॥ध्रु.॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥2॥ वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक
सांगतों मी ॥3॥ तुका
म्हणे शूर
दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त
जाला मान पावे ॥4॥
2675 नव्हती माझे बोल
जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥1॥ निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली
॥ध्रु.॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥2॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥3॥ तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥4॥
2676 जरा कर्णमूळीं
सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥1॥ आतां माझ्या मना होई सावधान । वोंपुण्याची जाण
कार्यसिद्धी ॥ध्रु.॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥2॥ तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥3॥
2677 मागील ते आटी येणें
घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥1॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते
उपचार ते ॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥2॥ तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥3॥
2678 साधावा तो देव
सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥1॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती
॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥2॥ तुका म्हणे निज भोगईल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥3॥
2679 जळों अगी पडो खान ।
नारायण भोक्ता ॥1॥ ऐसी ज्याची वदे
वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥ भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा
गोविंदा पावलें ॥2॥ तुका
म्हणे न
लगे मोल । देवा बोल आवडती ॥3॥
2680 संतांसी क्षोभवी
कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥1॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया
॥ध्रु.॥ संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बळिवंत ॥2॥ तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं
॥3॥
2681 उदकीं कालवी शेण
मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥1॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया
॥ध्रु.॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाची च मूर्ती ॥2॥ तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥3॥
2682 शोकवावा म्यां देहे
। ऐसें नेणों पोटीं आहे ॥1॥ तरी च नेदा जी
उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा । येणें उद्देशें
दातारा ॥2॥ तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥3॥
2683 येइल तुझ्या नामा ।
जाल म्हणों पुरुषोत्तमा ॥1॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव । निराशेनें नुपजे
भाव ॥2॥ तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे
पांडुरंगा ॥3॥
2684 नेणें जप तप
अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥1॥ रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी
सांभाळणें ॥ध्रु.॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥2॥ तुका म्हणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥3॥
2685 कळों आलें ऐसें
आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥1॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥ आड ऐसें
येतें पाप । वाढे ताप आगळा ॥2॥ तुका म्हणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशक्ति ॥3॥
2686 लागों दिलें अंगा ।
ऐसें कां गा सन्निध ॥1॥ कोण्या पापें उदो
केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा
॥2॥ तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥3॥
2687 धांवा शीघ्रवत ।
किंवा घ्यावें दंडवत ॥1॥ तुमचा जातो बडिवार
। आम्हीं होतों हीनवर ॥ध्रु.॥ न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥2॥ तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥3॥
2688 सेवकासी आज्ञा
निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥1॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं
॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥4॥ तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥3॥
2689. उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥1॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा
॥ध्रु ॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥2॥ तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विज्ञापना ॥3॥
2690 दुःखाची संगति ।
तिच्याठायीं कोण प्रीति ॥1॥ अवघें असो हें
निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावे चि
वाव ॥2॥ तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥3॥
2691 मेला तरी जावो
सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥1॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें
॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥2॥ तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥3॥
2692 वर्णावे ते किती ।
केले पवाडे श्रीपति ॥1॥ विश्वासिया घडे लाभ
। देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥2॥ तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥3॥
2693 संचितावांचून । पंथ
न चलवे कारण ॥1॥ कोरडी ते अवघी आटी
। वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥2॥ तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥3॥
2694 अतित्याई बुडे गंगे । पाप
लागे त्याचें त्या ॥1॥ हें तों आपुलिया
गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥ अवचटें अग्नि जाळी
। न सांभाळी दुःख पावे ॥2॥
जैसें तैंसें दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥3॥
2695 हेंद्र्याचें
भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥1॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं
॥ध्रु.॥ अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥2॥ तुका म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥3॥
2696 नाहीं सरो येत
जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥1॥ सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों
येतों ॥ध्रु.॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥2॥ तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥3॥
2697 लचाळाच्या कामा
नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥1॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय
न कळे वेडगळ बुद्धी । विजाती ते शुद्धी चांच चाट ॥2॥ तुका म्हणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥3॥
2698 एक धरिला चित्तीं ।
आम्हीं रखुमाईचा पती ॥1॥ तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥ परद्रव्य
परनारी । जालीं विषाचिये परी ॥2॥ तुका म्हणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥3॥
2699 भेणें पळे डोळसा ।
न कळे मृत्यु तो सरिसा ॥1॥ कैसी जाली दिशाभुली
। न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ती ॥2॥ तुका
म्हणे
हीणा । बुद्धी चुकली नारायणा ॥3॥
2700 अभिमानाचें तोंड
काळें । दावी बळें अंधार ॥1॥ लाभ न्यावा
हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥ लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥2॥ तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.