मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा २४०१ – २५००


तुकारामगाथा २४०१ – २५००




2401 साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥1 मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हांसि तरी खेळावरि चित्त ॥2॥ तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥3


2402 सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥1 पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे ॥ध्रु.॥ हरिदासांचा समागम । अंगीं प्रेम विसांवे ॥2॥ तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥3


2403 करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥1 आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥ हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥2॥ तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥3


2404 क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥1 समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥ अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥2॥ तुका म्हणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥3


2405 विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥1 केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥ मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥2॥ तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥3


2406 तीर्थाची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥1 बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥ करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥2॥ तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डो माझी ॥3


2407 भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥1 समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥ करीन तें कवतुकें । अवघें निकें शोभेल ॥2॥ तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥3


2408 पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥1 बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥2॥ तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम 3


2409 कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥1 येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥ देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥2॥ तुका म्हणे मन । कळवळी वाटे सीण ॥3


2410 दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥1 आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥ येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥2॥ तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच 3


2411 बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥1 परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥ आपुलाल्या इच्छा । मागों जया व्हावें जैशा ॥2॥ तुका म्हणे आ । नव्हसी उदास विठा3


2412 विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥1 जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥ जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥2॥ तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥3


2413 दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टी वरी ॥1 तेणें सुखें छंदें घेन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥ध्रु.॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥2॥ तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे 3


2414 पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥1 आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥ बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥2॥ तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥3


2415 म्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥1 यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥ घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥2॥ तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥3


2416 म्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास 1 वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥ आम्ही मरों वेरझारीं । स्वामी घरीं बैसले ॥2॥ तुका म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना 3


2417 पुसावें तें ठा आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥1 येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥ फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥2॥ तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥3


2418 माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥1 एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥2॥ तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥3


2419 फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥1 आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥ घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥2॥ तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा दे देवा ॥3


2420 आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥1 तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥ न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥2॥ तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥3


2421 करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥1 जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मज्ञान । आम्हासी चरण न सोडणें ॥2॥ विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥3॥ सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥4॥ तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥5


2422 तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1 क्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥ कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥2॥ संतांचे सेवटीं उच्छिष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥3॥ करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥4॥ तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥5


2423 सर्वविशीं आम्ही हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥1 पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥2॥ केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥3॥ कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥4॥ तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आतां नाहीं गोवी कशाची ही ॥5


2424 येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तें चि मज प्रेम दे देवा ॥1 डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख दे देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देदेवा ॥2॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें दे हातांस पायां बळ 3॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥4


2425 तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥1 तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार । तूं चि सर्व भार चालविसी ॥2॥ सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥3॥ तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळे तो उपाव करीं आतां ॥4


2426 वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा 1 गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥ गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥2॥ कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥3॥ तुका म्हणे तूं ब्रह्मांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥4


2427 असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥1 आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥ विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥2॥ राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥3॥ तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥4


2428 विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥1 तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥ आम्हां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥2॥ तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥3


2429 भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥1 तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥2॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा 3॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥4॥ तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥5


2430 वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा- ऐसें ॥1 कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी ॥ध्रु.॥ नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥2॥ तुका म्हणे जरी गिळे अहंकार । तरी वसे घर नारायण 3


2431 नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥1 सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥ चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥2॥ विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥3॥ आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥4॥ तुका म्हणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥5


2432 नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥1 शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥ अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥2॥ तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥3


2433 सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥1 उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन 2॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥3


2434 बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥1 झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥2॥ तुका म्हणे तुम्हां होल हे परी । अनुभव वरी येल मग ॥3


2435 जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥1 नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥ अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥2॥ तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥3


2436 सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥1 जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥ जरि होय उघडी दृष्टी । तरि गोष्टी युद्धाच्या ॥2॥ तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥3


2437 आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥1 देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥ भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥2॥ तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा 3


2438 एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥1 तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥ वैष्णवांचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥2॥ अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥3


2439 सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥1 मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥ वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य त2॥ तुका म्हणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥3


2440 सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥1 मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥ घेन जन्मांतरें । हें चि करावया खरें ॥2॥ तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा 3


2441 आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥1 सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥ नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥2॥ हुकुमदाज तुका । येथें कोणी स्फुंदू नका ॥3


2442 ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥1 होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥ बोरामध्यें वसे अळी । अठोळीच भोंवती ॥2॥ पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥3॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥4॥ तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥5


2443 धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा 1 बहु जालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥ पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥2॥ असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥3॥ न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर 4॥ तुका म्हणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥5


2444 पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥1 पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥ अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥2॥ तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना 3


2445 गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥1 त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥ धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥2॥ तुका म्हणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तांसी संकटीं रक्षावया ॥3


2446 चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥1 न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥2॥ गीता जेणें उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥3॥ तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥4


2447 पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥1 नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥2॥ तुका म्हणे धीरें- । विण कैसें होतें बरें 3


2448 नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें 1 न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥2 रामकृष्णहरि विठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ 3 याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥4 तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥5


2449 भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छिष्ट तें ॥1 च्छिष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥ काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥2॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥3॥ तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥4


2450 सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी 1 डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥ आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे 2॥ प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥3॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥4


2451 ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥1 तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥ नका शोधूं मतांतरें । नुमगे खरें बुडाल ॥2॥ कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥3


2452 आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥1 रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥ हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥2॥ मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥3


2453 आलिया अतीता म्हणतसां पुढारें । आपुलें रोकडें सत्व जाय ॥1 काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥ दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥2॥ तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शक्ती उदार काय जाली ॥3


2454 जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥1 तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥ सेवा केली संतजनीं । सुखें राहिले लपोनि ॥2॥ तुका म्हणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥3


2455 रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥1 देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥ कळों नये सुखदुःख । तान हरपली भूक ॥2॥ तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥3


2456 जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥1 तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥ नाहीं मुक्ताफळा । भेटी मागुती त्या जळा ॥2॥ तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि 3


2457 तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥1 ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥2॥ तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥3


2458 ऐसें भाग्य क लाहाता होन । अवघें देखें जन ब्रह्मरूप ॥1 मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥2॥ विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अग्नि जैसा ॥3भक्ति नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥4॥ तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥5


2459 कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी 1 कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥ कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥2॥ कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥3॥ तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येल घरा पाहिजे तो ॥4


2460 वैष्णव मुनि विप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥1 प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥2॥ तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाल तो छळी नरकायासीं ॥3


2461 देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥1 ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥2॥ तुका म्हणे जिणें । भलें संत संघष्टणें ॥3


2462 भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥1 तुझा म्हणवितों दास । केली उच्छिष्टाची आस ॥ध्रु.॥ राहिली तळमळ । त पासोनी सकळ ॥2॥ तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें 3


2463 रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥1 हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥ परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥2॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी 3


2464 सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥1 न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥ चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥2॥ तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥3


2465 नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥1 धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥ नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव 2॥ उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥3


2466 घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥1 तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥ अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥2॥ देव आतां जाला । उगवे संकोच वहिला 3॥ अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥4॥ आडकिला झोंपा । रिता कळिवरचा खोंपा ॥5॥ गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड 6॥ तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥7


2467 उंबरांतील कीटका । हें चि ब्रह्मांड ऐसें लेखा ॥1 ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥ हें चि ब्रह्मांड आम्हांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥2॥ विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥3॥ ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥4॥ तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥5॥ ऐशी अगम्य श्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥6


2468 ब्रह्मज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥1 अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥ जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥2॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥3॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही4


2469 सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥1 हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥ विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥2॥ कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञ मनमुंडण नव्हे चि ॥3॥ अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥4॥ आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥5


2470 म्ही जाणावें तें का तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥1 हो मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं ॥ध्रु.॥ खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥2॥ मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका म्हणे गा विठोबा ॥3


2471 वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1 येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥2॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु 3॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥4॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥5


2472 अनंत ब्रह्मांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥1 तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥ मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥2॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥3


2473 सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥1 अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥2॥ तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥3


2474 लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥1 तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥ अग्नि कर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥2॥ तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥3


2475 सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥1 दुःख बांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥ चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥2॥ तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥3


2476 तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची रा रंक राणा ॥1 अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ सोळा सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥2॥ पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥3॥ दशरथा पातकें ब्रह्महत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥4॥ मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥5॥ तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥6


पाळणा


2477 जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्वी जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥1 निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥ खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें 2॥ संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥3॥ खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥4॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख । आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥5॥ सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥6॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी । घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥7॥ धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ । टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥8॥ ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास ते घात ॥9॥ ॥1


2478 उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा 1 अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥ लावी अनुसंधान । कांहीं देम्हणऊन ॥2॥ काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥3


2479 असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबा1 आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥ वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥2॥ जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥3


2480 वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥1 पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥2॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥3


2481 सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥1 पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥ वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥2॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥3


2482 दहयांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥1 आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥2॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥3


2483 तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥1 पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥ तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥2॥ फार विठाबाधरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥3॥ तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥4


2484 लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥1 विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥ घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥2॥ तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आलिंगीं मज ॥3


2485 इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥1 म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥ नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥2॥ तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥3


2486 हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥1 ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥ देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥2 तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥3


2487 मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥1 तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥2 काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥3


2488 तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥1 नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥2॥ तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥3


॥ लळतें 9


2489 देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥1 मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥2 तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥3


2490 न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥1 कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥ हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥2 द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥3 अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥4 भावभक्तीत्वगुण जाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपण ॥5


2491 उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥1 कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥ अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥2 तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुम्हाम्हांसी तुटी ॥3


2492 जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥1 तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥ अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥2 तुका म्हणे देह पायीं । ठेवूनि झालों उतरा3


2493 आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥1 विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥ सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥2 तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक 3


2494 प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारि ॥1 हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥ उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥2 फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हें सार ॥3


2495 विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती॥1 तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥ बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥2 तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥3


2496 न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥1 न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुमम्ही सकळ म्हणा ॥ध्रु.॥ राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौर्‍यांशी ॥2 मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥3


2497 थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥1 न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥ सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥2 तुका म्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥3


2498 द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥1 किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाट निवडलों ते ॥ध्रु.॥ करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥2 तुका म्हणे धीर कारण आपुला । तुम्हीं तों विठ्ठला मायातीत ॥3


2499 आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥1 काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥ एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥2 तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥3


2500 निर्दयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गार्‍हाणें कोठें द्यावें ॥1 भाकितों करुणा ऐकती कान ।उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें 2॥ तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥3


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.