मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तुकाराम गाथा ८०१ - ९००

 तुकाराम गाथा ८०१ - ९००

 

801 वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥1 तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥2 तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥3

802 देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥1 ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥ यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥2 तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥3

803 तुझे वर्णू गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥1 मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥ रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥2 ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥3 तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं का4

804 मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ति केलें ॥1 क्तिचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥ योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥2 तुका म्हणे म्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥3

805 देवा ऐसा शिष्य दे । ब्रह्मज्ञानी निपुण पाहीं ॥1 जो कां भावाचा आगळा । भक्तिप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥ ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥2 ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥3

806 जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णीसी थोर वैकुंठींची ॥1 मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥2 नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥3 सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म तें केवळ नांदतसे ॥4 तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥5

807 दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥1 येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥2 तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥3

808 शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥1 तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥ श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥2 तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥3

809 रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥1 तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥ सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥2 तुका म्हणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥3

810 जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1 तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥2 तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥3

811 आतां असों मना अभक्तांची कथा । न हो दुश्चिता हरिनामीं ॥1 नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥2 तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥3

812 नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥1 रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥ सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥2 तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पा3

813 जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥1 अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥ शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥2 कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥3 तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥4

814 नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥1 खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥2 तुका म्हणे येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥3

815 नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥1 मेघवृष्टी येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥ध्रु.॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥2 तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥3

816 त्याग तंव मज न वजतां केला । कांहींच विठ्ठला मनांतूनि ॥1 भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥ देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥2 तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥3

817 मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥1 तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥ ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥2 नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥3 तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥4

818 राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥1 कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥ शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥2 तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥3

819 वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥1 शिकविलें काय येल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥ सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता मागें सारी ॥2 तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥3

820 देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥1 आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥2 तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥3

821 अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥1 असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥ कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भक्तिभावें ॥2 तुका म्हणे करूं येल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥3

822 राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥1 कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥ होल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥2 तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥3

823 आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥1 दाशत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥ उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥2 तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥3

824 सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥1 जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥ निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥2 तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥3

825 लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥1 उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥ मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥2 तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥3

826 अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठीले । मागें होत आले शिष्टाचार ॥1 दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥ मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥2 तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टीन्यायें ॥3

827 भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥1 भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥ करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥2 तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥3

828 म्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥1 कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥ अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥2 तुका म्हणे येथें खर्‍याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥3

829 दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥1 ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥ अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥2 तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥3

830 नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥1 नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥ तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥2 तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥3

831 लेकरा आतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥1 त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥ भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥2 आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥3

832 शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥1 सगुणाचे सो सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥ कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥2 तुका म्हणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥3

833 जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥1 चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥ काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥2 तुका म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥3

834 कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥1 रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥ धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥2 तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥3

835 कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥1 निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥ भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होजेतें ॥2 तुका म्हणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥3

836 मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥1 पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥2 वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥3 पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥4 तुका म्हणे चला । तुम्हीम्ही धरूं त्याला ॥5

837 भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥1 माझी माझी म्हणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥ तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥2 तुका म्हणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥3

838 लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥1 बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥ मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥2 सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे  स्मरीला ॥3

839 जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशी 1 भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥ सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥2 तुका म्हणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥3

840 बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥1 लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥ भाग्यें जाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥2 तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥3

841 सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥1 आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥ उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥2 तुका म्हणे नुचलीं डो । ठेविली पायीं संतांचे ॥3

842 आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥1 भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥2 तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥3

843 उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥1 संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥ संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥2 तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥3

844 म्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥1 न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥ कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥2 तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥3

845 बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥1 फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥ ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥2 तुका फजीत करी बुच्या । विसरे कुच्या खोडी तेणें ॥3

846 धांव घालीं आ । आतां पाहातेसी का1 धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥2 तुका म्हणे डो । कधीं ठेवीन हे पायीं ॥3

847 तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥1 होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥ नसतें सांभाळिलें। जरि तुम्ही आश्वासिलें ॥2 तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥3

848 देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥1 पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥ आरुष हे वाणी । गोड वरूनि घेतां कानीं ॥2 आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥3

849 दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥1 जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥ कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥2 जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥3

850 भोगावरि आम्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥1 विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2 केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥3 आवघे चि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीर्द4 तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥5

851 कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥1 कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥ कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥2 पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥3 काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥4 तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥5

852 काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥1 काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥2 काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥3 तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा दे भाव पांडुरंगा ॥4

853 दंभें किर्ति पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥1 अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥ पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥2 कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥3 तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥4

854 धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥1 ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥ देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥2 तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥3

855 आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥1 होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥2 तुका म्हणे म्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥3

856 सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥1 सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥2 तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चित्त समाधान ॥3

857 विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥1 विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥2 सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥3 तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥4

858 होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥1 काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥2 तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥3

859 पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥1 अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥ न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥2 तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥3

860 बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥1 ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥2 प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥3 तुका म्हणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥4

861 म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥1 गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥ पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥2 भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥3 तुका म्हणे वांयां गेलों ऐसा दिसें । होल या हांसें लौकिकाचें ॥4

862 न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥1 येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे क कासयानें ॥ध्रु.॥ साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥2 लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥3 तुका म्हणे मज राखावें पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥4

863 चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥1 रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥ नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥2 तुका म्हणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥3

864 उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥1 पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥ बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥2 तुका म्हणे म्हांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥3

865 काय विरक्ति कळे आमहा । जाणों एका नामा विठोबाच्या ॥1 नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥2 कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥3 कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥4 तुका म्हणे म्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥5

866 जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥1 दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥ गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥2 सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥3 तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥4 तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥5

867 माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥1 पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥2 योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥3 तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥4

868 सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥1 काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥2 तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥3

869 उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥1 उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥2 तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥3

870 आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥1 ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥2 तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥3

871 अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥1 ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥ अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥2 तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥3

872 येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥1 विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥ वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥2 तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥3

873 हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥1 कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥ हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥2 तुका म्हणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥3

874 दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥1 नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥ चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥2 तुका म्हणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥3

875 धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥1 संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥2 तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥3

876 दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥1 संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥2 कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥3

877 खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥1 मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥ कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥2 तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णी प्रकाशाची ॥3

878 गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥1 विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥ कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥2 बाळाचे सोतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥3 गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥4 तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥5

879 स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥1 आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥2 तुका म्हणे आमहा जेथें जेथें गोवा । तेथें तुम्ही देवा सांभाळावें ॥3

880 पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥1 होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥2 तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥3

881 बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†हेरा ओढाळांचा ॥1 बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥2 नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥3 वेगळाल्या खोडी केली तडातडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥4 निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥5

882 न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥1 दृष्टी ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥ येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥2 खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥3 शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥4 तुका म्हणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥5

883 आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥1 धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥ आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥2 तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥3

884 खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥1 संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥2 फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥3 तुका म्हणे आतां जालीसे निश्चिती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥4

885 पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥1 रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥2 । तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥3

886 निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥1 आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥2 तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥3

887 उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥1 आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥ अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥2 तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥3

888 एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला ये कैसें ॥1 म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥ आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥2 तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येल कळों ॥3

889 गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥1 हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥ ऐकावी म्हूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥2 तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥3

890 कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥1 सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥ अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥2 इंद्रियांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥3 तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥4 तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥5

891 जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥1 कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनियां रडे ॥2 बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥3 नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥4 अझुन तरि मुका । कां रे जालासि म्हणे तुका ॥5

892 वांटा घे लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥1 ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥ नाहीं सारिलें तोंवरी । धांव घे वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥2 फट लंडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥3

893 चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥1 ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥ व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥2 तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥3

894 काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥1 जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥2 तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥3

895 देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्‍या ऐसी केवीं गारगोटी ॥1 मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ध्रु.॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥2 तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥3

896 संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥1 क्तिची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥ भिक्षाणी वेवसाव । काला करितो गाढव ॥2 करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥3  प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥4 तुका म्हणे होंइऩ सुर । किंवा निसुर मजुर ॥5

897 तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥1 काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥2 तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥3

898 मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥1 आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥ वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥2 वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥3 तुका म्हणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥4

899 अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥1 अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥ फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें त2 तुका म्हणे देवा । पुढें भाव सारावा ॥3

900 उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥1 न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥2 अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका म्हणे ॥3

--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.