मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा १५०१ - १६००

तुकारामगाथा १५०१ - १६००


1501 तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हा कां हे डोळे कान दिले ॥1 नाइकवे तुझी अपकीकिर्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥2 तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥3


1502 सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥1 सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥2 तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥3


1503 अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥1 विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥ माझी कोणी न धरो शंका । हो कां लोकां निर्द्वंद्व 2 तुका म्हणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥3


1504 सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥1 येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥2 तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥3


1505 काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1 थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥2 भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥3 तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥4


1506 जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥1 तुम्ही सांभाळिलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥ कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥2 तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥3


1507 काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥1 तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥2 तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥3


1508 असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥1 भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥2 तुका म्हणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥3


1509 गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥1 काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥2 तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥3


1510 सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥1 बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥2 तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥3


1511 जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥1 दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥ माळामुद्रांवरी । कैंचा सोंगें जोडे हरि ॥2 तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥3


1512 अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥1 येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥ संग हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥2 तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥3


1513 ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥1 ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥2 तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥3


1514 नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1 वार्‍या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2 तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3


1515 तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥1 तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥2 तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥3


1516 पटे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥1 निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ ळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥2 तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥3


1517 कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥1 कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥2 तुका म्हणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥3


1518 सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥1 म्हणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥2 शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका म्हणे बिंदुलीं ॥3


1519 हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1 फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2 हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥3 येणें चि बळें सरते आम्ही । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4 तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5


1520 नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टी वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥1 आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥2 तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥3


1521 घटीं अलिप्त असे रवि । अग्नि काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥1 भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥ देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥2 तुका म्हणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥3


1522 सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥1 चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥2 तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥3


1523 जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥1 डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥ सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥2 तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥3


1524 तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥1 जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥2 शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥3


1525 पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥1 आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥ भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥2 पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥3


1526 विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥1 माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥2 तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥3


1527 कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥1 ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥ जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥2 तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥3


1528 परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥1 थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥2 तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥3


1529 ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥1 देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥2 तुका म्हणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥3


1530 सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥1 न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥2 तुका म्हणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥3


1531 ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥1 म्हणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥ वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥2 पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥3 आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥4 तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥5


1532 पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥1 जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥2 तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥3


1533 ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1 नासिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2 तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3


1534 पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥1 करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥2 तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥3


1535 तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥1 आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥2 प्रेमरसपान्हा पाजीं माझे आ । धांवें वो विठा वोरसोनि ॥3 तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥4


1536 क्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥1 जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥2 तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥3


1537 पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥1 ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥2 तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥3


1538 उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥1 ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥ मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥2 तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥3


1539 सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥1 पुण्य पर्वकाळ तीर्था ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥2 सेळ्या मेंढ्या गासेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥3 तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥4


1540 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥1 तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥2 काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥3 तुका म्हणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥4


1541 पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1 ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्था जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2 भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3 तुका म्हणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4


1542 येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥1 म्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥2 न चळे हा मंत्र न म्हणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥3 तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥4


1543 बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥1 म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥2 तुका म्हणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥3


1544 तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥1 लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥2 तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥3


1545 आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥1 यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥ पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥2 तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळें आळीं ॥3


1546 सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥1 रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥2 तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥3


1547 पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥1 तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रह्मांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥2 जीवांचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥3


1548 करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1 लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2 तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3


1549 आपुलिया लाजा । धांवे भक्तांचिया काजा ॥1 नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥ आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥2 उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाटीं ॥3


1550 साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥1 ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥2 तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥3


1551 धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥1 तैसें करीं वो माझे आ । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥ न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥2 तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥3


1552 हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥1 रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळीत फिरे ॥2 द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥3 न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बळीभद्र ॥4 तुका म्हणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥5


1553 ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥1 जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥2 तुका म्हणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥3


1554 विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥1 म्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळीया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी । अमृत हे संजिवनी ॥2 रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥3


1555 विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥1 भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥2 तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥3


1556 म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥1 मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥2 तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥3


1557 एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥1 मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥ मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥2 तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥3


1558 संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥1 ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥2 तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥3


1559 संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥1 हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥2 तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥3


1560 जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥1 ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥2 तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नारी नव्हती ॥3


1561 वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥1 नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥ फुगातें काउळें । म्हणे मी राजहंसा आगळें ॥2 गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥3 मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥4


1562 मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥1 पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥2 तुका म्हणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥3


1563 पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥1 राही रखुमा सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भा नारदासी गौरवीन ॥2 गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥3 मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥4 निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥5 नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोइरिया ॥6 परसो भागवता सुरदास सांवता । गान नेणतां सकळांसी ॥7 चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥8 जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबा9 आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥10 आनंदें ओविया गान मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥11 तुका म्हणे माझा बळीया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥12


1564 पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥1 पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥ जप तप अनुष्ठान । पोटासाटीं जाले दीन ॥2 पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥3 पोट काशियानें भरे । तुका म्हणे झुरझुरूं मरे ॥4


आरत्या ॥ 13


1565 जगदेश जगदेश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ति पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥1 जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ति जवळी च दोन्ही । नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रह्मांडीं संपुष्टशयनीं ॥2 असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । क्ता शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥3 एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥4 सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख जाणों म्हणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥5


1566 दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । क्तिप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥1 जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा । आरती ओवाळूं तुज भक्तिकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी । चिंतितां तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी । असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥2 सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥3 संतां महंतां घरीं म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥4 भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पत्ती प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥5


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--


1567 काय तुझा महिमा वर्णू मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥1 जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया । करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥2 धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी । नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥3 न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्था मिळन वास तयांचा वाहाती ॥4 देव भक्त तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भिक्त हे जनीं । जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥5


1568 कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्त 1 जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥2 अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं सा अठरा करितां वेव्हार । तो वळीतसे गौळीयांचें खिल्लार ॥3 तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गिळीलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥4 महिमा वर्णू तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युक्ति । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥5


1569 परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥1 जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥2 विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ती मनोहरा ॥3 गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥4 सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता उत्पत्तीपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥5


1570 पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥1 जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥2 हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥3 आषाढी कार्तिकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥4 हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आम्हांलागिं हें सोपें । म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥5


 


1571 अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥1 जय देवा कृष्णनाथा जय रखुमाकांता । आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥ वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥2 राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥3 कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गावत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥4 तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वर्णू मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव दे चरणीं ॥5


1572 सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥1 जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥2 ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार इऩित । साधनें योग नाना तपें दारुण किती । सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥3 भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक । कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥4 उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्वासि तत्वसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥5


1573 सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1 जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमावरा । आरती करीन काया । ओंवाळीन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2 घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3 सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4 र्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु म्हणे स्तवूं मी काय किती ॥5


1574 महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा । परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुम्हा जी त्रिनयना ॥1 जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा आरती ओंवाळीन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥ रुद्र हें नाम तुम्हां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं । उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव दे कैलासीं ॥2 त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान । करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥3 बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं । हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥4 पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात । करिती विज्ञापना परिसावी हे मात । अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥5


1575 अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद । एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥1 जय जया गणपती ओंवाळीत आरती । साजिर्‍या सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥ हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां । घातले तोडरीं हो भक्तजनपाळका । सहस्र नाम तुज भुक्तिमुक्तिदायका ॥2 सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें । रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥3 र्णिता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें । अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूर्तिमंत होय भक्तिच्या सुखें ॥4 विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव दे तया नाचतां पुढें । धूप दीप पंचारति ओंवाळीन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥5


1576 कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥1 ओंवाळूं गे माये सबाहय साजिरा । राहिरखुमासत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥ मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥2 वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥3 सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥4 ओंवाळीतां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टी समाधि तुकया लागली पायीं ॥5


1577 क्तिचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥1 ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥2 राही रखुमा दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळीति ठायीं ठायीं ॥3 तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥4


1578 धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥1 धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥ धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥2 तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥3


1579 गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥1 आनंद रे विठोबा जाला माझे मनीं । देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥ न करीं तपसाधनें रे मुक्तिचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भक्तिचा रस ॥2 तुका म्हणे आम्हांप्रेमा उणें तें का । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥3


1580 मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥1 या संतांसी निरवीं हें मज दे । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥2 तुका म्हणे आतां उदार हो । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥3


स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24


1581 शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥1 आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥2 विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥3


1582 रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥1 म्हणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी । केलों सर्व सासी धणी ॥2 तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥3


1583 म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥1 हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥2 तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥1


1584 घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मिस्थती सांडवीन ॥1 ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥ तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥2 सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥3 भिक्तभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥4 धन्य म्हणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥5


1585 संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध जालों ॥1 आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥2 तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥3


1586 तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥1 एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥2 तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥3


1587 आपुल्या माहेरा जान मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥1 सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥2 त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥3 तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥4


1588 चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥1 आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥2 तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥3


1589 आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥1 आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥2 तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥3


1590 येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥1 दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥2 तुका म्हणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥3


1591 पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥1 गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥2 मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥3 चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥4 पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥5 तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥6


1592 शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥1 ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥2 तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥3


1593 पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥1 आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाह्य स्फुरती ॥ध्रु.॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥2 तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥3


1594 चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥1 तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥2 आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥3


1595 पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥1 काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर । कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥ घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥2 मुखशुद्धी तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥3


1596 संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥1 कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥ नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥2 देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥3


1597 अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥1 सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥2 मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥3 अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥4 तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥5


1598 सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुम्हीं1 कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निश्चिंती जाली तेथें ॥2 आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥3 वाढवितां लोभ होल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥4 धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥5 तुका म्हणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥6


1599 बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥1 जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥2 तुका म्हणे तुम्ही दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥3


1600 करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥1 अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥ दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥2 आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥3


--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.