तुकारामगाथा 301 - 400
३०१ माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥ कोणी सोडवी ना
काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥ तुका म्हणे किती
सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥
३०२ आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे ।
आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी
नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें
॥३॥
३०३ छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर
। अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥ तुका म्हणे याति ।
भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
३०४ बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥ मिठेंविण काय
करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥ संपादणीविण
विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें
हें फिके द्रव्य तरी ॥३॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥
३०५ अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥१॥ एकाचिये तोंडीं
पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥ चारितां बळें येत
असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥२॥ तुका म्हणे नसे संचित हें बरें ।
तयासि दुसरें काय करी ॥३॥
३०६ धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥ धिग जीणें ज्याचें
लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥ धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित
आहार अघोरिया ॥२॥ धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा
॥३॥ तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥
३०७ अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें ।
द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥ मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा
राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥ विषयसुखाचा लंपट ।
दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥ अणीक एक कोड । नरका
जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥ तुका म्हणे ऐसें ।
मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥
३०८ अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा
नव्हे ॥१॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं
पाषांडिया ॥ध्रु.॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥ तुका म्हणे संतीं
भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥
३०९ एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥ दोन्ही दिसती
सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥ एकां सर्वस्वाचा
त्याग । एकां पोटासाठीं जोग ॥३॥ एकां भक्ति
पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥ वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥
३१० काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥ आहे नाहीं हें न
कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥ तुका म्हणे भावें ।
माझ्या मज समजावें ॥३॥
३११ भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥ धिग त्याचें साधुपण
। विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥ हें ना तें सें
जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥
३१२ एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान ।
अधम जन तो एक ॥१॥ ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकतीं
हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥ अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भक्षिता तांबूल
। सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥ सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग
। जन्मव्याधी बळिवंत ॥३॥ आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या
पापें जाणा । ठेंगणा महामेरु ॥४॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलीया ॥५॥
३१३ करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती
॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे
॥ध्रु.॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥ देऊनियां वेच धाडी
वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये
॥४॥
३१४ इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥ अवघेची येती वाण ।
अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥ तुका म्हणे जोडी
जाली । ते आपुली आपणा ॥३॥
३१५ वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ
सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ ।
येर तो सकळ मूढ लोक ॥२॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥
३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥ मुख्य धर्म देव
चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥ बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥ तुका म्हणे भावें ।
कृपा करीजेते देवें ॥३॥
३१७ येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥ वैकुंठींच्या लावूं
वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥ येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥ तुका म्हणे वैष्णव
जेन । माझे गण समुदाय ॥३॥
३१८ उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥ बोलविले बोल बोलें
। धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥ तुका म्हणे नये
आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥
३१९ बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥ काशासाठीं खावें
शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥ दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥ तुका म्हणे शूर
रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥
३२० बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥ भलें केलें देवराया
। नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥ सेवा चुकतों संताची
। नागवण हे फुकाची ॥३॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥ तुका म्हणे थोरपणें
। नरक होती अभिमानें ॥५॥
३२१ दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥ आतां काय उरलें
वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥ तुका म्हणे नाद ।
जाला अवघा गोविंद ॥३॥
३२२ कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥ तुम्ही दयावंत कैसे
। कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥ तुका म्हणे देवा ।
माझा करावा कुठावा ॥३॥
३२३ ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥१॥ तुमचा जाईल ईमान ।
माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥ ठेविला तो ठेवा । अभिलाषें
बुडवावा ॥२॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥
३२४ तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप कासवाचे परी ।
धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥ तुका म्हणे देवा ।
चिंतन ते तुझी सेवा ॥३॥
३२५ गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥ वर्म जाणावें तें
सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥ कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥ तुका म्हणे मोल ।
गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥
३२६ पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ नेघे माझे वाचे
तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥ तुका म्हणे जपें ।
संतांचिया जाती पापें ॥३॥
३२७ देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥ दोहींकडे दोन्ही
वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥ दाखविले परी नाहीं
वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥२॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश
मूळबीजमात्र ॥३॥
३२८ शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट
। तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥ तुका म्हणे गुण ।
तुझा लागलिया शून्य ॥३॥
३२९ वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥ काय जाणों कैसी परी
। प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥२॥ जाणे हा विचार ।
स्वामी तुकयाचा दातार ॥३॥
३३० मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥ नका जाऊ आडराणें ।
ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥ झळकती पताका । गरुड
टके म्हणे तुका ॥३॥
३३१ कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ
जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली
पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥ चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ
श्रुति मृदंग ॥२॥ मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका
एक आगळे ॥३॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ ।
कळिकाळ कांपती ॥४॥ आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य
मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥ मरण मुक वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि ।
पायापाशीं विठोबाच्या ॥६॥ तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा
दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥
३३२ जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती
अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल
वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा
गजर । असुरकाळ कांपती ॥२॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य
जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥ उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची
उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी ।
रीग न पुरे कळिकाळा ॥५॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा
जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥ तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम
जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥७॥
३३३ एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥ बोलों नेणें मुकें
। वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥ दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥ तुका म्हणे कर्म ।
तुझें कळों नेदी वर्म ॥३॥
३३४ म्हणवितों दास । मज एवढीच आस ॥१॥ परी ते अंगीं नाहीं
वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥ बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥ तुका म्हणे बरा ।
दावूं जाणतों पसारा ॥३॥
३३५ पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥ हें तों जाणां
तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें
॥२॥ तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हां संतां ॥३॥
३३६ स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं
। जालें लटिकें सकळ ॥१॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा ।
कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही
सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥ तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती ।
टाळी बैसोनि राहिली ॥३॥
३३७ आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठ अतिवादी ॥१॥ याति कुळ येथें असे
अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग ।
अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥२॥ तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥३॥
३३८ बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी ।
कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता ।
वोडवलें आजि ॥१॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ
लागे तया बोलें । जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥ मिळोनियां याती ।
येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें ।
तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥२॥ एकी असतील घरीं ।
चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली वोज
। नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥ वेधियेल्या बाळा ।
नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमर कुमारी । ना भाव हा शरीरीं ।
दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥ वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं ।
शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकें
। बाळवेषें खेळे ॥५॥
३३९ अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी
। येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड
लंकापुरी ॥१॥ सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी
रघुनाथ । मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत
॥ध्रु.॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें
कवणाचें भंगीलें । गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले
॥२॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे
तेणें । उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें
सुनें ॥३॥ नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या
माये । उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले
काये ॥४॥ जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा
तैशा परी । संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम
लंकापुरी ॥५॥
३४० वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥ तरी च तें गोड राहे
। निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥ आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥ तुका म्हणे शुद्ध
जाती । ते मागुती परतेना ॥३॥
३४१ नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥ पडिला नामाचा विसर
। वाढविला संवसार ॥ध्रु.॥ लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥ तुका म्हणे नाव ।
आम्हां सांपडला भाव ॥३॥
३४२ अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं
॥१॥ आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम
॥ध्रु.॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥ देखोनियां छाया सुख
न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥ हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥ तुका म्हणे होसी
भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥
३४३ काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक
॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं
॥ध्रु.॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥ तुका म्हणे मोक्ष
विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥
३४४ सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी
॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता
॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं
॥२॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
३४५ ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु
। जे कां सच्चिदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे
॥१॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु । भूतकृपा मोडीं
द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥ मन बुद्धि काया
वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें
अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥ अर्थकामचाड नाहीं
चिंता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे
॥३॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ
त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
३४६ भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं
कर ठेवुनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं
। खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा
घर । चोजवीत येतील ॥२॥ भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे
दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
३४७ जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तोचि साधु ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता
नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥ दया करणें जें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥४॥ तुका म्हणे सांगूं
किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
३४८ याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥ नाहीं तरी कोठें
दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥ गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥ तुका म्हणे अळंकारा
। देवभक्त लोकीं खरा ॥३॥
३४९ अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥ जो हे दूषी हरिची
कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥ तुका म्हणे पाप ।
माय नावडे ज्या बाप ॥३॥
३५० कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥ वाचे नुच्चारी
गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥ तुका म्हणे दंड ।
कैसा न पवे तो लंड ॥३॥
३५१ आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥ करवी आणिकांचे घात
। खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥ श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥ तुका म्हणे ऐसा ।
सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥
३५२ गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥ व्याली कुर्हा डीचा
दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥ तुका म्हणे जाय ।
नरका अभक्ताची माय ॥३॥
३५३ पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥ विधीपुरतें कारण ।
बहु वारावें वचन ॥ध्रु.॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥ तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची
बरी ॥३॥
३५४ देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण
शुभाअशुभाचा ॥१॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें
लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग ।
वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥२॥ अवघी एकाचीच वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष
नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे
निराळा ॥४॥
मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥५॥
३५५ न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥ भलतें जड पडो भारी
। जीवावरी आगोज ॥ध्रु.॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥ तुका म्हणे केली
आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥
३५६ बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी
कांटीवरी मारविलें ॥१॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥ तुका म्हणे क्रोधा
हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥
३५७ पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥ बरवें संचित होतें
तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों
रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥
३५८ कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥ मुळीं वर्म नसतों
चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥ होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥ तुका म्हणे पुरे
आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥
३५९ सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥१॥ तुजविण ऐसा । कोण
दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥ कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥ तुका म्हणे सखया ।
माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
३६० पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥ तैसें राहो माझें
मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥२॥ तुका म्हणे पाहे ।
कासवीचें पिलें माये ॥३॥
३६१ ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥ तान भुक त्यांचें
राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥ कोण सखें तयां आणीक
सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां
॥३॥ तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥४॥
३६२ न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें
देवा ॥१॥ बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि
॥ध्रु.॥ कोठवरि जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥ बुडालीं तयांचा मूळ
ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥३॥ पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥ तुका म्हणे कास
धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥
३६३ वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं
॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥ तुका म्हणे सोपी
केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
३६४ शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥ येथें केले नव्हे
काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥ तुका म्हणे घडी ।
साधिलिया एक थोडी ॥३॥
३६५ म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें
वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥ करूनि ओळखी दिली
एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥ तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा
वांचूनियां ॥३॥
३६६ वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥ नाहीं आणीक प्रमाण
। तन धन तृण जन ॥ध्रु.॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥ तुका म्हणे याती ।
हो का तयाची भलती ॥३॥
३६७ करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ही न वजों तया
वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥ पावोत आत्मिस्थति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥ तुका म्हणे छंद ।
आम्हां हरिच्या दासां निंद्य ॥३॥ ॥
स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४
३६८ सद्गुारायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥ सांपडविलें वाटे
जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥ भोजना मागती तूप
पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥ कांहीं कळहे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥३॥ राघवचैतन्य
कैशवचैतन्य । सांगितली खुण मळिकेची ॥४॥ बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र
दिला राम कृष्ण हरि ॥५॥ माघशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे
॥६॥
३६९ माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥ आवडीचा मंत्र
सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥ जाती पुढें एक
उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं
॥३॥ तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥
३७० घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि
॥१॥ लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी
॥ध्रु.॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥ खुंटले सायास अणिकि
या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी
॥४॥
३७१ माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां
॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली
॥ध्रु.॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥ जीवभाव तुझ्या
ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥ तुका म्हणे संतीं
घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥४॥
३७२ देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अनुभव ।
कासाविस होती जीव ॥ध्रु.॥ देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥ तुका म्हणे हरी ।
प्रल्हादासि यत्न करी ॥३॥
३७३ भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥ ठसावितां बहु लागती
सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां
सोई तें तेव्हां गोड ॥२॥ तुका म्हणे बरे सांगतांचि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों
॥३॥
३७४ संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती
॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥ कामारी बटीक सेवेचे
सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥ तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥
३७५ एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥१॥ मज न म्हणा न म्हणा
शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥ नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि
हा धीट संग केला ॥२॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥३॥ सलगी धरी पयोधर ।
साहाती करमुर सवें ॥४॥ आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥५॥ तुका म्हणे सेवटा
नेलें । संपादिलें उभयतां ॥६॥
३७६ होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते जाली
गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥ स्थिर स्थिर मज चि
साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न साहावे वारा । देऊनि
कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला
आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥२॥ उदयीं उदय साधिला
अवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे
हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
३७७ स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा
कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥ आपआपणाशीं करिती
नवल । परि वादावाद न संडिती बोल । एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥ एक विषय तो सकळांचा
हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं । अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी
वो ॥२॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर
। परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो
॥३॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता
ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥४॥ तुका लाधला हें
उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून । पडिलें कानीं त्या
जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥
३७८ आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणी एका मन लगे तुझ्या
चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि
चित्तीं वो ॥१॥ सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड
। व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड
वो ॥धृ ॥ होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी
। नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी
वो ॥२॥ नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें । नाहीं अचळ सावरावा
ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥३॥ कोठें नेणों हा फावला एकांत । सदा
किलकिल भोंवतीं बहुत । दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥४॥ करी कवतुक खेळ खेळे
कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना । परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणें ऐसें कळों
यावें जना वो ॥५॥
३७९ भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां
उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥१॥ चाळा लावियेले गोप
गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या
बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥ मनीं आवडे तें
करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार । उगा राहे कां
मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥ धरिली खोडी दे
टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें । मिठी घालीन या
जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥३॥ सुख अंतरींचें बाहय
ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या
थोरपणें जासी रे ॥४॥ करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना
। मन मिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा
वो ॥५॥
३८० आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें
। गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो
॥१॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें
नाहीं । अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई
वो ॥ध्रु.॥ बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक
। आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥ चिंता करितां हरिली
नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें । सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें
। तुका म्हणे खुंटलें येणें जाणें वो ॥३॥
३८१ मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥१॥ कान्हा रे मनमोहन
लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥ काहां पग डारूं देख आनेरा । देखें
तों सब वोहिन घेरा ॥२॥ हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
३८२ हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥ क्या मेरे लाल कवन
चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥ कोई सखी हरी जावे
बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥ तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥३॥
३८३ भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥ आगळ आवो देवजी
कान्हा । मैं घरछोडी आहे म्हांना ॥ध्रु.॥ उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार
दादुला ॥२॥ तुका प्रभु परवली हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥
३८४ नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहती बहु होतो
उबारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा
॥१॥ सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या
लोभा । उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या
क्षोभा ॥ध्रु.॥ नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत
। एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल
नेणों भाग्य उदित वो ॥२॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन
। अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आलें जीवन
॥३॥
३८५ पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ
बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥ कोणी सांगा या
गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं । कोठें आड आली हे
देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥ मागें बहुतांचा
अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग । पहिलें पाहातां तें
हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥२॥ शोकें वियोग घडला
सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार रे घडल्या दोषांचा ।
जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥
३८६ काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परपरता तूं पळोनि
जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥ माया करुणा हे करिते बहुत । किती
सोसूं या जनांचे आघात । न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि
स्थिर चित्त ॥ध्रु.॥ बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी
। करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी
वो ॥२॥ तुज म्हणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता
। न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता
वो ॥३॥
३८७ घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली
दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे
पती वो ॥१॥ बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । म्हणे कोमळ परी बहु
गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥ धाडिलें गरुडा
आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता । लाजिनली रूप न ये
पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥ सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला
वो मज हृषीकेशी । तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो
॥३॥ मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी
। दिली वाट यमुने मायें खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी
वो ॥४॥ जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून । राधा संबोखिली
प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भाव चि कारण वो ॥५॥
३८८ मिळोनि गौळणी देती यशोदे गार्हाणीं ।
दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें ।
वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥ हरि सोंकला वो हरि सोंकला वो ।
सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी । आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥ तुज वाटतसे कोड
यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो । आम्ही जाऊं तुजवरी
पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आम्हां ॥२॥ मुख मळिण वदन उभा
हाडतिये घोणे । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावूं । थोर आणिला कांटाळा
घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥३॥ मिळोनि सकळा दावें
लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा । बरा सांपडलासी हरी
आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥४॥ फांकल्या सकळा
उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती
नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥५॥
३८९ गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी
काय करी तेथें । जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला
पंथें ॥१॥ सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता
। खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥ आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा
होसी । आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता
गोवळा काय बोलतोसी ॥२॥ आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां
कळलियावरी मागें केलें त्याचें । बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी
करी मात कांहीं ॥३॥ वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज
नाहीं । जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी
जाऊं पाहे तियेचें ॥४॥ तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमळिणीं
मिळाल्या त्याही न फिरती । तुका म्हणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं
वोडवलें आजि ॥५॥
३९० हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या
दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती
सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥ तुझिये अंगीं घुरट
घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥ मज ते हांसतील जन ।
धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥ तुज लाज भय शंका
नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज
माझी ॥४॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी
गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
३९१ सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्हाणें
देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें । दहिं दुध लोणी
शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनि नाशिली
कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥ आझुनि तरी यासि
सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळै जणी
करूं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥ नेणे आपपर लौकिक
वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी । सोगया चुंबन देतो
आलिंगन लोळे मेजाबाजावरी । शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे
बाइये ॥२॥ आतां याची चाड नाहीं आम्हां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें
। सोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें । चरण खांबीं जीवें
बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा
भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठ वाद झणीं
बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी
देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥
३९२ विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें
चि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे
कुळाहुनिया ती ॥१॥ खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण
नेणें भोंवती । त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां
वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥ बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें
संचार । विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर
॥२॥ तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं
येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें
तर्कवाद निराळा ॥३॥
३९३ ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके
ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी
लक्षलक्षापें मुकें ॥१॥ अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या
वाहाती संकल्प मना । काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती
घेवोनियां राणा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें
तया भीतरी । कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती
परपरत्या दुरी ॥२॥ आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें
पारिखें जन । एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणा
वांचून ॥३॥
३९४ खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी
तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान
पिलंगत चाले ॥१॥ ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी
नेदी साउलां रे ॥ध्रु.॥ साड्या साउलीं पातळें गोंडे कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी
सकळा कळंबावरी पळे । खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी
वरी खदखदां हांसे ॥२॥ आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी
एकीहूनि म्हैस वेल सुर काडी । एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥३॥ एकी आलिया बाहेरी
पाहे लुगडें तंव नारी । म्हणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां । केला सकळी हाकारा
तंव आलिया बाहेरा । आतां म्हणतील घरां जावें कैशा परी ॥४॥ तंव हांसे वनमाळी
वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज राखावी गोपाळा
आम्हांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥५॥ जोडोनियां कर या गे
सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं
चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥६॥ एक एकीकडे पाहे लाज
सांडूनियां राहे । म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनियां हात कैशा
राहिल्या निवांत । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥७॥
३९५ धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया
कान्हें । एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या
राणें रे ॥१॥ सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं । सासू दारुण सासरा
आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥ सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी । होतें अंतर तर
सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥२॥ कैसी भागली हे
करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर । स्वामी तुकयाचा
भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
३९६ गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी । चेंडू चौगुणा खेळती
वाळवंटीं । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या
कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी । मिस पाणियाचें
करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥ चिरें चोळिया त्या
धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे कोण कुळ
याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥२॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें
वाजती नाइके जनमात । करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो
॥३॥
३९७ कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं
॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा
येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी
ते माझी ॥२॥ तुकयाचा स्वामी माझे जीवींच बैसला । बोलींच अबोला करूनियां
॥३॥
३९८ गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें
श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥ परते चि ना दृष्टी
बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥ तुकयाच्या
स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥३॥
३९९ पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥ बैसला तो माझे मनीं
। नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥ जीवा आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥ जालें विश्वंभरा
ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥
४०० कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला
मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥ तुका म्हणे हांसे
जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.