तुकारामगाथा ३२०१ – ३३००
3201 कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या
विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥1॥ तो
या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥ पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी
कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥2॥ तुका
म्हणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा
छंद मनासी ॥3॥
3202 तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥1॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥ कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे
गाबाळ ॥2॥ तुका म्हणे ढाळे ।
बाहेर गुदे तें निराळें ॥3॥
3203 हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥1॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥2॥ तुका म्हणे समाधान
। सदा मन आमुचें ॥3॥
3204 भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥1॥ क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥ दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥2॥ तुका म्हणे जाणे
धने । धरी तें वर्म चिंतन ॥3॥
3205 संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥1॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥ काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी
॥2॥ तुका म्हणे भावें
। हात जोडीं असो ठावें ॥3॥
3206 भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥1॥ आतां
पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥ आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥2॥ तुका म्हणे हेवा ।
माझा हेत पायीं देवा ॥3॥
3207 आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥1॥ पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥ हें चि एक जाणें ।
काया वाचा आणि मनें ॥2॥ नीच
जनालोकां । तिळले पायेरीस तुका ॥3॥
3208 विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥1॥ कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥ पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥2॥ तुका
म्हणे जो देहाडा । तो चि वर्णीन पवाडा ॥3॥
3209 आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥1॥ ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥ न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥2॥ तुका म्हणे एका
जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥3॥
3210 बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥1॥ सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥ भक्षी त्याचा जीवमाग ।
आले भाग तो बरा ॥2॥ तुका
म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां ॥3॥
3211 शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥1॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥ सांभाळावें वर्म ।
उचिताच्या काळें धर्म ॥2॥ तुका
म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥3॥
3212 उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥1॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥ दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥2॥ अळसाची
धाडी ॥ तुका म्हणे बहु नाडी ॥3॥
3213 शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥1॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥ मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥2॥ तुका म्हणे सोसें
। लागे लाविल्याचें पिसें ॥3॥
3214 कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥1॥ काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥2॥ तुका म्हणे पडे
भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥3॥
3215 संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला
धर्म ॥1॥ हरिभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग किळकाळाचा ॥ध्रु.॥ कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी
॥2॥ तुका म्हणे सुख
समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईल तो ॥3॥
3216 विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥1॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे
॥ध्रु.॥ गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी
मिरवावी ॥2॥ तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कई पक्षी पांडुरंग ॥3॥
3217 वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥1॥ नेदी
उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥2॥ तुका म्हणे बरें
धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥3॥
3218 कई ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा
झुरतसे ॥1॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं
॥ध्रु.॥ काय ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥2॥ तुका
म्हणे धन्य मानीन संचित । घेईन तें नित्य प्रेमसुख ॥3॥
3219 नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा
॥1॥ आज्ञा
ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार
निश्चयेसी ॥ध्रु.॥ आळीकरें आम्ही एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥2॥ तुका म्हणे माझी
ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥3॥
3220 काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे
॥1॥ चित्तासी प्रसाद होईल
चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥ सर्व शक्ती जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत
आपुलें तें ॥2॥ तुका म्हणे दोरी खांब सूर्या हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥3॥
3221 देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प
ते ॥1॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥2॥ तुका म्हणे इच्छे
पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥3॥
3222 देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥1॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय
॥ध्रु.॥ शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे
फळभोग ॥2॥ तुका म्हणे
विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥3॥
3223 काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥1॥ मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥ अभुकेचे अंगीं चवी ना स्वाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥2॥ तुका म्हणे आप
राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥3॥
3224 अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥1॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो
॥ध्रु.॥ खर्याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥2॥ तुका म्हणे चाडे
करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥3॥
3225 अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं
॥1॥ वाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥ आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥2॥ तुका म्हणे
ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥3॥
3226 काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥1॥ उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥ चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥2॥ तुका म्हणे सेवट
झाला । देव या बोला भोगिता ॥3॥
3227 न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम
कोणी गे ॥1॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा
ओसा वो ॥ध्रु.॥ नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय
प्रमाण जुगा एकी वो ॥2॥ जरी
तुम्ही नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन
॥3॥
3228 विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥1॥ विठ्ठला
रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥2॥ विठ्ठला
रे तुझी ऐकतां कीर्ती । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥3॥ विठ्ठला रे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥4॥
3229 एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥1॥ घ्यावें द्यावें आम्हीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥ भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें
॥2॥ तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें ।
ठेविलें मोकळें देवें येथें ॥3॥
3230 स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥1॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥ भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥2॥ तुका म्हणे कळे ।
तूं चि धावें ऐसें वेळे ॥3॥
3231 पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥1॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥ पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥2॥ तुका म्हणे जे जे
जाती । तैसी स्थिति येतसे ॥3॥
3232 कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥1॥ बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥ घटापटा ढवळी मन । होय सीण न करूं तें
॥2॥ तुका म्हणे
पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥3॥
3233 एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥1॥ आठवीन
पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥ बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें ॥2॥ तुका
म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥3॥
3234 आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥1॥ तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें
॥ध्रु.॥ काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें
गोजिरीं चिंतीतसें ॥2॥ तुका
म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रह्मरस भोजन हें ॥3॥
3235 हें आम्हां सकळा ।
तुझ्या नामाचें चि बळ ॥1॥ करूं
अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥2॥ तुका म्हणे देवा ।
तुझे पायीं माझा हेवा ॥3॥
3236 आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥1॥ यासी तुम्ही कृपावंता
। माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥ तळमळ करी चित्त ।
अखंडित वियोगें ॥2॥ तुका
म्हणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥3॥
3237 बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥1॥ आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥ वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥2॥ तुका म्हणे दुजा
कोण । ऐसा सीण निवारी ॥3॥
3238 कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला
बोबडिया ॥1॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत
विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥ ज्यालें जेऊं नेदी
मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥2॥ तुका
म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥3॥
3239 डौरलों भक्तीसुखें ।
सेवूं अमृत हें मुखें ॥1॥ संतसंगें
सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ ब्रह्मादिकांसी
सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥2॥ नाहीं
वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥3॥ मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी ॥4॥ तुका
म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥5॥
3240 फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥1॥ केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥ देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥2॥ घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लाहान थोरीं ॥3॥
3241 आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥1॥ काय
सांगों जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे
॥2॥ तुका म्हणे तैसा
ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥3॥
3242 म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥1॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आम्हास ॥ध्रु.॥ वाढली ते तळमळ चिंता ।
शम आतां करावी ॥2॥ तुका
म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥3॥
3243 कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥1॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥ गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥2॥ तुका म्हणे गातां
गीत । आलें हित सामोरें ॥3॥
3244 हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥1॥ तेथें माझ्या मना होई पक्षीराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥ मुळचिया बीजें दाखविली गोडी
। लवकर चि जोडी जालियाची ॥2॥ तुका
म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥3॥
3245 बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥1॥ देव आम्हा प्राणसखा
। जालें दुःखा खंडण ॥ध्रु.॥ जन्मांतरिंच्या
पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥2॥ तुका
म्हणे निजठेवा । होईल
हेवा लाधलों ॥3॥
3246 जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥1॥ कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥ समर्पिला जीव
भाव । धरिला भाव अखंड ॥2॥ तुका
म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥3॥
3247 पात्र शुद्ध चित्त गोही । न लगे कांहीं सांगणें ॥1॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥ अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥2॥ तुका म्हणे जैसी
वाणी । तैसे मनीं परिपाक ॥3॥
3248 प्रगटलें ज्ञान ।
नारायण भूतीं तें ॥1॥ अनुभव
च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥ देखोवेखीं वदे वाणी ।
पडिल्या कानीं प्रमाणें ॥2॥ तुका
म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥3॥
3249 मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥1॥ मन पावे
समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥ उदासीन वृत्ती देहीं । चाड नाहीं पाळणें ॥2॥ तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥3॥
3250 आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥1॥ आवडीनें
आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥ प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥2॥ तुका म्हणे चिंतन
बरें । आहे खरें खर्यापें ॥3॥
3251 केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥1॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥ आम्ही तरी जड जीव । कैंचा भाव पुरता ॥2॥ अनन्यभावें
घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥3॥ तुम्ही आम्ही शरणागतें
। कृपावंतें रक्षीजे ॥4॥ तुका
म्हणे भाकुं कींव । असों जीव जड आम्ही ॥5॥
3252 सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं
। तेथें कोणी भेटलीं ॥1॥ करीं
करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि
॥ध्रु.॥ पाळी तोंडऴचिया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी
परि सोडवीना ॥2॥ तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥3॥
3253 इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपस्थिती चाड ॥1॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली
॥ध्रु.॥ लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी
धरावया ॥2॥ लागली न
सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥3॥ घेसील
वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रह्मज्ञानी ॥4॥ तुका
म्हणे माझा कोठें भक्तीरस । पाडावया ओस चाळविसी ॥5॥
3254 आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती ।
अळंकारयुक्ती । सरों
शके चि ना ॥1॥ जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना ॥ लावीं अवो कृपाळे ॥ध्रु.॥
तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥2॥ करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा । तुका म्हणे जना ।
जल स्थल देखतां ॥3॥
3255 ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥1॥ प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥ होणार ते
कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥2॥ तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥3॥
3256 किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे ।
कासावीस जालेती ॥1॥ माझ्या
स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥
कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें ।
नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥2॥ तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥3॥
3257 बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥1॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं
॥ध्रु.॥ लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥2॥ तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥3॥
3258 या रे हरिदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥1॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी
॥ध्रु.॥ येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन
तें घडे नारायणा अंतरीं ॥2॥ वांकड्या माना बोल बोलावे आर्ष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥3॥ आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या
प्रसंगीं ॥4॥ तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥5॥
3259 अवघाच अन्यायी । तेथें एकल्याचें काई ॥1॥ आतां
अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥ काय माझें खरें । एवढें च राखों
बरें ॥2॥ तुका म्हणे आतां ।
परिहार न लगे चित्ता ॥3॥
3260 काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥1॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥2॥ तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥3॥
3261 स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥1॥ नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥ जीव
ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥2॥ तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥3॥
3262 संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥1॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥2॥ तुका म्हणे धर्म ।
न कळे माजल्याचा भ्रम ॥3॥
3263 अवो कृपावंता । होई
बुद्धीचा ये दाता ॥1॥ जेणें
पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥2॥ तुका म्हणे देवा ।
माझे अंतर वसवा ॥3॥
3264 नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि
तो ॥1॥ विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥2॥ तुका
म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥3॥
3265 चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥1॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम
गाढा ॥ध्रु.॥ रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥2॥ तुका म्हणे भय धरी
रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥3॥
3266 आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥1॥ पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥ डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥2॥ तुका म्हणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥3॥
3267. काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥1॥ आजि
दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥ पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें
॥2॥ तुका म्हणे कानीं
। घालूं आले दुष्टवाणी ॥3॥
3268 किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥1॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥2॥ तुका म्हणे रोकडीं
हे । होती पाहें फजीती ॥3॥
3269 होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥1॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥2॥ तुका म्हणे केली
चिंता । कोण दाता भेटेल ॥3॥
3270 भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे
॥1॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे
॥ध्रु.॥ मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा
धरणें तें ॥2॥ तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥3॥
3271 जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥1॥ गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥ उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥2॥ तुका म्हणे तांतड
मोठी । जाली भेटी उदंड ॥3॥
3272 गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥1॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥ लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥2॥ तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥3॥
3273 अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥1॥ न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥ विसंभेना माता बाळा ।
तैसा लळा पाळावा ॥2॥ त्रिभुवनीं
ज्याची सत्ता । तुक्या रक्षिता तो जाला ॥3॥
3274 आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों
द्यावें ॥ध्रु.॥ काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख
तो ॥2॥ कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥3॥ सावध
तों माझीं इंद्रियें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥4॥ तुका म्हणे तूं या
सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥5॥
3275 चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥1॥ हात
पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥ रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥2॥ तुका म्हणे माप
वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥3॥
3276 बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥1॥ हे
चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥2॥ तुका म्हणे
पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥3॥
3277 निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी ॥1॥ वोंगळानें
घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥ मेळऊनि सवें जन ।
चिंता नेणे देवळीं च ॥2॥ तुका
म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥3॥
3278 मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें तें ॥1॥ म्हणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥ आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥2॥ तुका म्हणे काळें
लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥3॥
3279 मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विकर्या घातलें केण । ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि
लिगाड दान । खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते
चौघे जन । खरें वित्त तेथें आले चोजवीत । गिर्हाईक संतजन ॥1॥ झाडिला
पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक । याल तरि तुम्ही करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥ एक ते उत्तम मध्यम
कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण । अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥2॥ एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें । तुका म्हणे आतां
पाहूं नये वास । साधावें आपुलें पेणें ॥3॥
3280 करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात
पडिला काळाचा ॥1॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि ।
करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥ होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं
। जें मोकळी आहेती ॥2॥ कां
रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें । तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥3॥
3281 यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥1॥ विश्वास
तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत
चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥2॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥3॥
3282 अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करूनि सांटवण । धरीयेले हृदयीं ॥1॥ पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें
प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥ करुणाउत्तरीं । करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥2॥ मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका म्हणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥3॥
3283 सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥1॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें
॥ध्रु.॥ विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा ॥ गोडावली
वाचा येणें रसें ॥2॥ तुका
म्हणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥3॥
3284 आम्हां कांहीं आम्हां कांहीं । आतां नाहीं या बोलें ॥1॥ मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा
पुसावें ॥ध्रु.॥ कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥2॥ मुदलें
साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥3॥ तुका म्हणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥4॥
3285 घ्या रे भाई प्या रे भाई । कोणी कांहीं थोडें बहु ॥1॥ ये च
हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥ वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥2॥ उघडें
दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥3॥ तुका म्हणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥4॥
3286 मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली ॥1॥ हातीं
धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥2॥ तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥ सांडियेला गर्भ उबगोनि
माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥3॥ उष्ण
तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणिजे ॥4॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे। अन्याय हि
मोटे साच केले ॥5॥ हातींचें हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी
परी जाली ॥6॥
3287 जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥1॥
लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥ मागें पुढें रिघे पोटीं ।
साहे खेटी करीतें ॥2॥ तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे
हें ॥3॥
3288 गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥1॥ आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें
॥ध्रु.॥ रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥2॥ तुका म्हणे तनु
जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रह्मानंदें ॥3॥
3289 देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥1॥ आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥ देवें
नेली चिंता । जाला सकळ करिता ॥2॥ तुका
म्हणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥3॥
3290 पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥1॥ तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों
॥ध्रु.॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥2॥ तुका म्हणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥3॥
3291 जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥1॥ प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । स्थिर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥ ये गा ये गा ये गा कृपाळुवा
हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥2॥ आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी
लावियेली ॥3॥ काय तुम्हापाशीं
नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥4॥ काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस
सोनें करी ॥5॥ तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद
साच ॥6॥
3292 येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें
॥1॥ गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग
तेणें ॥ध्रु.॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी
निवडिली ॥2॥ तुका म्हणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥3॥
3293 शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥1॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥ नलगे उचित
। कांहीं पाहावें संचित ॥2॥ तुका
म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥3॥
3294 वाचेचिया आळा कविळलें ब्रह्म । चुकविला श्रम पृथक तो ॥1॥ सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥ नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥2॥ तुका म्हणे वाटे
चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥3॥
3295 सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥1॥ आतां हेवा करावा सोस । भक्तीरस बहु गोड ॥ध्रु.॥ पाउल
वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥2॥ तुका
म्हणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥3॥
3296 तुम्ही संत
मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥1॥ अवतार
तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव ॥ध्रु.॥ वाढविलें सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥2॥ तुका म्हणे गुण
चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥3॥
3297 पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥1॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा
॥ध्रु.॥ पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥2॥ तुका
म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥3॥
3298 सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥1॥ तुमचें
मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥2॥ तुका म्हणे आलें
वारी । दुरितें दुरी नातळतां ॥3॥
3299 सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥1॥ दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥ केली याची फाडाफाडी ।
तडामोडी क्षेत्राची ॥2॥ पातेजत
नाहीं लोकां । तुका देवावांचूनि ॥3॥
3300 सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥1॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥ नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥2॥ तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.