तुकारामगाथा ३३०१ – ३४००
3301 सिळें खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी ॥1॥ कान्होबा
ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुलिये ठायींचे
घ्यावें । लाड भावें पाळावा ॥2॥ तुका
म्हणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥3॥
3302 लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥1॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥2॥ तुका म्हणे वाट ।
बरवी सांपडली नीट ॥3॥
3303 धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥1॥ ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥ अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥2॥ तुका म्हणे अस्त ।
उदय त्याच्या तेजा नास्त ॥3॥
3304 बोलावें तें आतां आम्ही अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥1॥ मेघदृष्टी कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥2॥ तुका म्हणे नाहीं
समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥3॥
3305 अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥1॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥2॥ तुका म्हणे फांसे
वाघुरा कुर्हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥3॥
3306 नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे
भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥1॥ कुपथ्य
करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥2॥ तुका म्हणे लांसू फासे देऊं डाव । सुखाचा
उपाव पुढें आहे ॥3॥
3307 नव्हें परि म्हणवीं दास
। कांहीं निमित्तास मूळ केलें ॥1॥ तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥ नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगा
। ऐसें कां गा नेणां हें ॥3॥
3308 मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥1॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥ मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥2॥ तुका म्हणे कोण
देवा । आतां हेवा वाढवी ॥3॥
3309 आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥1॥
निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥ संकल्पासी वेचे बळ । भारे फळ
निर्माण ॥2॥ तुका म्हणे उभयतां
। भेटी सत्ता लोभाची ॥3॥
3310 असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥1॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ अपराध करा ।
क्षमा घडले दातारा ॥2॥ तुका
म्हणे वेथा । तुम्ह कळे
पंढरिनाथा ॥3॥
3311 वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥1॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥ चिंतावोनि
चिंता केली । हे राहिली अवस्था ॥2॥ तुका
म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥3॥
3312 जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥1॥ वाढवावें हें उत्तर । कांहीं लाज करकर ॥ध्रु.॥ कोठें वांयां
गेले । शब्द उत्तम चांगले ॥2॥ तुका
म्हणे बाळा । असतात प्रिय खेळा ॥3॥
3313 वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥1॥ काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥ पोटा आलें बाळ । त्याचें जाणावें सकळ
॥2॥ तुका म्हणे हरी ।
वाहावें जी कडियेवरी ॥3॥
3314 सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥1॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥ भाग्याविण
कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥2॥ तुका
म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥3॥
3315 करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥1॥ तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥ तेथे सरे
शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥2॥ तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥3॥
3316 जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥1॥ काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥ पडें तेथें तुझ्या पायां । करीं वायां न वजतें ॥2॥ तुका
म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥3॥
3317 जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥1॥ माझ्या अवघ्या भांडवला । तूं एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां
दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥2॥ तुका
म्हणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥3॥
3318 स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥1॥ ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥ धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥2॥ तुका म्हणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥3॥
3319 आधी नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥1॥ घालितो पायांसी मिठी एकसरें । नेदीं तो दुसरें आड येऊं
॥ध्रु.॥ कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता का शिरीं
भार घेतों ॥2॥ तुका म्हणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥3॥
3320 आतां बरें जालें । माझें मज कळो आलें ॥1॥ खोटा ऐसा संवसार । मज पायीं द्यावी थार ॥ध्रु.॥ उघडले डोळे । भोग देता काळीं कळे ॥ तुका म्हणे जीवा । होतां तडातोडी देवा ॥3॥
3321 बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥1॥ सर्व सिद्धि पायीं
वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥ संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥2॥ तुका म्हणे
रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥3॥
3322 परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे
॥1॥ अंतरीं
पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥ पिकली सेंद पूर्वकर्मा नये ।
अव्हेरु तो काय घडे मग ॥2॥ तुका
म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें ॥3॥
3323 ज्याचे माथां जो जो भार । ते चि फार तयासी ॥1॥ मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ध्रु.॥
परिसा अंगीं अमुपसोनें । पोटीं हीन धातु चि ॥2॥ आपुला तो करि धर्म । जाणे वर्म तुका तें ॥3॥
3324 पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥1॥ मन चि साच होइल कई ।
प्रेम देई भेटोनि ॥ध्रु.॥ सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुम्हा ॥2॥ तुका
म्हणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥3॥
3325 चालवणें काय । ऐसें अंगे माझे माय ॥1॥ धांव धांव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥ पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥2॥ देसील विसांवा । तुका म्हणे ऐशा हांवा ॥3॥
3326 आवडीच्या ऐसें जालें । मुखा आलें हरिनाम ॥1॥ आतां घेऊं धणीवरि । मागें उरी नुरेतों ॥ध्रु.॥ सांटवण मनाऐसी । पुढें रासी अमुप ॥2॥ तुका म्हणे कारण जालें । विठ्ठल तीं अक्षरीं ॥3॥
3327 त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥1॥ येथें माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥ चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोई जाती ॥2॥ आणिक
तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥3॥ वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं
सत्यभावें ॥3॥ तुका म्हणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥5॥
3328 उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥1॥ नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥2॥ तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें ॥3॥
3329 सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला
जगदाकार ॥1॥ सांभाळीं आपुली हाक देतो माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥ रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम । लटका चि श्रम वाढविला ॥2॥ तुका
म्हणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निर्विकार ॥3॥
3330 आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धी योगा नये ॥1॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥ कोठें मूर्तीमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥2॥ तुका
म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥3॥
3331 नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥1॥ कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥ संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा
येती पुढें ॥2॥ तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥3॥
3332 आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं
॥1॥ मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येइल ठाया
॥ध्रु.॥ वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां
चांडाळा बुद्धि मज ॥2॥ तुका
म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥3॥
3333 मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥1॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥ आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥2॥ तुका म्हणे अंगीं
काय नाहीं सत्ता । परि निष्ठता उपेजना ॥3॥
3334 कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ
। लागों वेळ नेदावा ॥1॥ ऐसी
काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥ दावी वैकुंठींच्या
वाटा । पाहातां मोठा संपन्न । अभिमान तो नाहीं
अंगी । भक्तालागी न बैसे ॥2॥ तुका
म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । आलें द्यावें
भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ॥3॥
3335 सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे ।
त्यांसी कैचा संसार ॥1॥ दोष
पळाले दोष पळाले । पैल आले हरिदास ॥ध्रु.॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती ।
गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥2॥ तुका
म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शक्तीहीना । त्या ही जना पुरता ॥3॥
3336 ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥1॥ सुखें
नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥
ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥2॥ सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी
॥3॥ ऐसें
केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥4॥
तुका म्हणे मन । आतां जालें समाधान ॥5॥
3337 चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥1॥ न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥ हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥2॥
तुकयाबंधु म्हणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥3॥
3338 व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥1॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥
संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥2॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥3॥
3339 तुम्हांआम्हांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥1॥ म्हणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥ भविष्याचें
माथां देह । कोण जाणें होइल काय ॥2॥ म्हणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥3॥
3340 अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवे म्हणे देह ॥1॥ ऐसें
जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥ध्रु.॥ उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीर्थे होती ॥2॥ तुका
म्हणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥3॥
3341 आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥1॥ सर्वजाण
माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥2॥ तुका म्हणे कर्मधर्में नये हातां । तयावरि सत्ता भाविकांची ॥3॥
3342 प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥1॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥ पदरीं
घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥2॥ बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥3॥
3343 आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥1॥ बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥ तळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥2॥ तुका म्हणे बरवें
जालें । फावलें हें कळे त्या ॥3॥
3344 केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥1॥ माझी बुद्धि स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥ भावा अंतराय । येती
अंतरती पाय ॥2॥ तुका म्हणे जोडी ।
आदीं अंतीं राहो गोडी ॥3॥
3345 माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम
द्यावें ॥1॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥ध्रु.॥ बाळक धांवोनि आड निघे
स्तनीं ॥ घालावा जननी कृपे पान्हां ॥2॥ तुका
म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥3॥
3346 वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥1॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥ध्रु.॥ विचारोनि पाहे त्यास ।
न वजे जीवें नव्हे नास ॥2॥ तुका
म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥3॥
3347 अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥1॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । हित तें चि वेगें करूनि
घेई ॥ध्रु.॥ बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥2॥ पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥3॥ कनक झाड
वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥4॥ तुका
म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नास तो चि पावे ॥5॥
3348 मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ
आदराचा ॥1॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥ मजहून
नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥2॥ न
दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥3॥ तुका
म्हणे देखोनियां काई ।
पांडुरंगा पायीं राखियेलें ॥4॥
3349 मतिविण काय वर्णू तुझें ध्यान
। जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥1॥ करूनि
गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी
॥2॥ रसना
गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥3॥ तुका म्हणे माझी दृष्ट चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥4॥
3350 ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥1॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा ॥ध्रु.॥ अंधकारापुढे न चलवे
वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥2॥ एकला
निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥3॥ तुका
म्हणे वाट दावूनि सद् गुरु । राहि हा दुरू पांडुरंग ॥4॥
3351 उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेलें । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥1॥ काय
बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरिराया आहेसि आम्हां । एकला चि जरी देऊं
परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ध्रु.॥ कर्णाऐसा वीर उदार
जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं । पडिला भूमी परी नयेची
करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥2॥ श्रीयाळ बापुडे सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर । ऐसा कठिण कोण होईल
दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥3॥ सिभ्री चक्रवर्ती करितां यज्ञयाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं । जाचऊनि प्राण
घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥4॥ बळीचा
अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देऊनि माथां । कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्त कथा ॥5॥ हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं । पाडिला विघड नळा दमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥6॥ आणिकही
गुण सांगावे किती । केलिया विपत्ती
माउसीच्या । वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥7॥
3352 जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम
माझा ॥1॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥ आभास ही नाहीं
स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥2॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥3॥ तुका म्हणे आतां
नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥4॥
3353 समश्रुळित असतां वाचा । घोष न
करिसी कां नामाचा ॥1॥ कां
रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी ॥ध्रु.॥
हरि हरि म्हणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥2॥
तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥3॥ जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी
दिंडीपुढें ॥4॥ अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें ॥5॥ कैसा
सकुमार जालासी । म्हणसी न टकें एकादशी ॥6॥ स्नान
न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥7॥ वरिवरि
न्याहाळिसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा ॥8॥ पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥9॥
3354 वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा
साच अंगीं ॥1॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥ सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ती कांहीं ॥2॥ तुका
म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥3॥
3355 सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥1॥ फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी
॥ध्रु.॥ सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष
अमृताचें ॥2॥ तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥3॥
3356 तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥1॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां
॥ध्रु.॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची
समूळ गेली ॥2॥ तुका म्हणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥3॥
3357 विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया
॥1॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे
॥ध्रु.॥ माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा
सकिळकांसी ॥2॥ संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि
सांगेन त्या ॥3॥ माझिये माहेरीं सुखा काय उणें । न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥4॥
3358 ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम
जिव्हामुखें ॥1॥ पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें
काय न करीं मनीं ॥ध्रु.॥ तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी
पुरे आतां ॥2॥ करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें
ठायीं तुजविण ॥3॥ तुका म्हणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काई देऊं कोणा ॥4॥
3359 देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥1॥ देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं
॥ध्रु.॥ देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा ।
पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥2॥ कां
रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥3॥ कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार
पितृपूजना ॥4॥ कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक
नारायण ॥5॥ तुका म्हणे कां रे
घातलें वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तीविण ॥6॥
3360 माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं ।
धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥1॥ चतुरा
तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥
करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥2॥ पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥3॥
3361 आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥1॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये
॥ध्रु.॥ जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों
घडी आवडे तें ॥2॥ दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा
भोंवताला ॥3॥ तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आम्हां गोड जन्म घेतां ॥4॥
3362 मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहीविरहित जो ॥1॥ राहिलासे
उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काई तरी पाचारितां पावे ।
न स्मरिता धांवे भक्तीकाजें ॥2॥ सर्व
भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥3॥ तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें
चित्तीं न धरीं कांहीं ॥4॥
3363 यासी कोणी म्हणे
निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥1॥ आड
वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥ नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥2॥ जन्म
व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥3॥ तुका म्हणे निंब
दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥4॥
3364 निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय
त्याच्या ऐसें सकळ ही ॥1॥ न
पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥ संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥2॥ तुका म्हणे वर्म
नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥3॥
3365 न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥1॥ माझ्या उपकारासाटीं । वागविला ह्मुण कंठीं ॥ध्रु.॥ घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥2॥ तुका म्हणे एके
ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥3॥
3366. नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥1॥ आतां
बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥ निवारिलें भय । नाहीं दुसर्याची सोय ॥2॥ तुका
म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं ॥3॥
3367 दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटाळिल्या गुणें धांव घेती ॥1॥ काम
क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥2॥ माझा
येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥3॥ तुका म्हणे आतां
करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥4॥
3368 तुझा दास मज म्हणती अंकित
। अवघे सकिळक लहान थोर ॥1॥ हें
चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥ होउनी निर्भर राहिलों निश्चितें । पावनपतित नाम तुझें ॥2॥ करितां
तुज होय डोंगराची राई । न लगतां कांहीं पात्या पातें ॥3॥ तुका म्हणे तुज
काय ते आशंका । तारितां मशका मज दीना ॥4॥
3369 काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥1॥ जरी
मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें ॥ध्रु.॥ जरी मागों ध्रुवपद ।
तरी त्यासी येथील छंद ॥2॥ स्वर्गभोग
मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥3॥ आयुष्य
मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥4॥ तुका
म्हणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥5॥
3370 आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥1॥ तो हा देवांचा ही देव । काय किळकाळाचा भेव
॥ध्रु.॥ वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥2॥ तुका म्हणे निज । रूपडें हें तत्वबीज ॥3॥
3371 भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात ॥1॥ तो
हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥ गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥2॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥3॥ तुका म्हणे
ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥4॥
3372 फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥1॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥2॥ तुका म्हणे अवघें
फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥3॥
3373 लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे
महिमा थुलिया ॥1॥ पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड ।
लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥ आधीं
काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥2॥ तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें
तुम्हां नार्पिती ॥3॥
3374 नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥1॥ करीं
याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥ भेटावें पंढरिराया । हें चि इच्छिताती बाह्या ॥2॥ म्हणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥3॥ चित्त म्हणे पायीं । तुझे राहीन निश्चयीं ॥4॥ म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥5॥
3375 मन उताविळ । जालें न राहे निश्चळ ॥1॥ दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाह्या ॥ध्रु.॥ सर्वांग तळमळी । हात
पाय रोमावळी ॥2॥ तुकयाबंधु म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥3॥
3376 म्हणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥1॥ होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥ मृगजळाचिया परी । तैसें न करावें हरी
॥2॥ तुकयाबंधु म्हणे हरी ।
कामा नये बाह्यात्कारी ॥3॥
3377 आकारवंत मूर्ती ।
जेव्हां देखेन मी दृष्टी ॥1॥ मग
मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥2॥ म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥3॥
3378 जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥1॥ नाहीं
तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥ अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥2॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥3॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥4॥ तुका म्हणे आम्ही असोनिया जना । तुज देव पणा आणियेलें ॥5॥
3379 सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥1॥ म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥ न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥2॥ तुका म्हणे निवे
तनु । रजकणु लागती ॥3॥
3380 देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥1॥ काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥ करूं कळे ऐसी मात ।
किंवा राखावा एकांत ॥2॥ तुका
म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥3॥
3381 मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥1॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां
॥ध्रु.॥ आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥2॥ तुका म्हणे आलों
दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥3॥
3382 माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥1॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥2॥ तुका
म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥3॥
3383 मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥1॥ कोण
त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥ पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥2॥ तुका म्हणे कुटिती
हाडें । आपुल्या नाडें रडती ॥3॥
3384 तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥1॥ तुज
ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥ अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥2॥ तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां अंगीं ॥3॥
3385 आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं
शस्त्रें यत्न करूं ॥1॥ शब्द
चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥2॥ तुका म्हणे पाहा
शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥3॥
3386 ब्रह्मज्ञान दारीं
येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥1॥ रिघों
पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥2॥ तुका
म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥3॥
3387 कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥1॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या
॥ध्रु.॥ तुम्हां वेगळा लागें आपल्या च ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥2॥ भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं
नये ॥3॥ ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज
देवा ॥4॥ तुका म्हणे
वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥5॥
3388 देहबुद्धि वसे
जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥1॥ थोर
असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥ गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥2॥ पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥3॥ तुका म्हणे ऐसे
बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥4॥
3389 निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥1॥ तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥ परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥2॥ तुका म्हणे वेळू
चंदना संगतीं । काय ते नसती जविळकें ॥3॥
3390 दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥1॥ आपणासारिखें
त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥ मूढ
सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥2॥ गांढें
देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥3॥ आणिकांचा
हेवा । न करीं शरण जाई देवा ॥4॥ तुका
म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥5॥
3391 माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥1॥ कारण
होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥2॥ तुका
म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥3॥
3392 ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥1॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥ डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी
॥2॥ विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी
परी ॥3॥ भावें तुका म्हणे सत्संग
हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥4॥
3393 भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥1॥ सुख दुःख तुज देईन
भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥ तुझा
दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥2॥ कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥3॥ तुका
म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥4॥
3394 गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥1॥ तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥ध्रु.॥ नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥2॥ लाज नाहीं शंका । प्रेम घाला म्हणे तुका ॥3॥
3395 रुसलों आम्हीं आपुलिया
संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥1॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥2॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥3॥ तुका
म्हणे करा होईल ते दया । सुख दुःख
वांयां न धरावें ॥4॥
3396 सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ती मागे तो करंटा ॥1॥ कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥ येथें मिळतो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥2॥ तुका म्हणे आतां ।
मज न लगे सायुज्यता ॥3॥
3397 पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥1॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥ जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥2॥ तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥3॥
3398 आतां हें सेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्प ॥1॥ नुपेक्षावें आम्हां दीना
पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुम्हीं ॥ध्रु.॥ वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥2॥ तुका म्हणे मन
तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ॥3॥
3399 तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥1॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥ मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥2॥ न
पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥3॥ तुका
म्हणे हें लक्षण । संत अळंकार लेणें ॥4॥
3400 आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥1॥ सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥ तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥2॥ तुका म्हणे धरीं
सोय । वासनेची फोडा डोय ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.