तुकारामगाथा २५०१ – २६००
2501 नसतों किविलवाणें ।
कांहीं तुमच्या कृपादानें ॥1॥ हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥ वांयां जात
नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥2॥ तुका म्हणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥3॥
2502 जालों तंव साचें ।
दास राहवणें काचें ॥1॥ हें कां मिळतें
उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥ सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां
कोल्हें ॥2॥ तुका
म्हणे नास
। आम्हां म्हणविलियां दास ॥3॥
2503 देवाच्या उद्देशें
जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥1॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या
॥ध्रु.॥ शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥2॥ तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥3॥
2504 कडसणी धरितां
अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥1॥ लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा
॥ध्रु.॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥2॥ तुका म्हणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥3॥
2505 हें चि जतन करा दान
। धरुनी चरण राहिलों तो॥1॥ आणीक कांहीं न घलीं
भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥2॥ तुका तुमचा म्हणवी दास । तेणें आस पुरवावी ॥3॥
2506 आपल्या च स्फुंदे ।
जेथें तेथें घेती छंदें ॥1॥ पडिला सत्याचा
दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥ विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥2॥ तुका म्हणे घाणा । मूढा तीर्था प्रदक्षिणा ॥3॥
2507 उद्वेगाची धांव
बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥1॥ सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥
आपुलिया नांवें नाहीं आम्हां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥2॥ तुका म्हणे चेळें एकाचिया सत्ता । आपुलें मिरवितां पणें ऐसें ॥3॥
2508 बहुतां पुरे ऐसा
वाण । आलें धन घरासी ॥1॥ घ्या रे फुका
मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें । बरवें कानें सादर
॥2॥ तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥3॥
2509 माझी मज जाती आवरली
देवा । नव्हतां या गोवा इंद्रियांचा ॥1॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें
धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥2॥ तुका म्हणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥3॥
2510 विनवितों तरी
आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥1॥ आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही
॥ध्रु.॥ नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥2॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥3॥
2511 एका ऐसें एक होतें
कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥1॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं
॥ध्रु.॥ केला तो न संडीं आतां कैवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥2॥ तुका म्हणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥3॥
2512 जाले समाधान ।
तुमचे धरिले चरण ॥1॥ आतां उठावेंसें मना
। येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥ सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥2॥ तुका म्हणे भाग । गेला निवारला लाग ॥3॥
2513 मुखाकडे वास ।
पाहें करूनियां आस ॥1॥ आतां होईल ते शिरीं । मनोगत
आज्ञा धरीं ॥ध्रु.॥ तुम्हीं अंगीकार । केला पाहिजे
हें सार ॥2॥ तुका
म्हणे
दारीं । उभें याचक मीं हरी ॥3॥
2514 नाहीं माथां भार ।
तुम्ही घेत हा विचार ॥1॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥ आतां
बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥2॥ तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥3॥
2515 माझें जड भारी ।
आतां अवघें तुम्हांवरी ॥1॥ जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों
जें काम । माझी सेवा तुझें नाम ॥2॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥3॥
2516 तुम्ही आम्ही भले
आतां । जालों चिंता काशाची ॥1॥ आपुलाले आलों
स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥2॥ तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥3॥
2517 चित्ता ऐसी नको
देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥1॥ आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥
मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥2॥ तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥3॥
2518 कोण पुण्य कोणा
गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी ॥1॥ जिहीं हरी धरिला
मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥ कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥2॥ तुका म्हणे त्यांचे भेटी । होय संसारासी तुटी ॥3॥
2519 तरि च हा जीव
संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥1॥ एके जातीविण नाहीं
कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों
परस्परें सारिखें चि ॥2॥ तुका
म्हणे
चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥3॥
2520 किती विवंचना
करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥1॥ कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार
या च साटीं ॥ध्रु.॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥2॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥3॥
2521 दिक चि या नाहीं
संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥1॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या
बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥2॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥3॥
2522 आतां होइन धरणेकरी
। भीतरीच कोंडीन ॥1॥ नाही केली
जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥ आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥2॥ तुका म्हणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥3॥
2523 होइल तरि पुसापुसी
। उत्तर त्यासी योजावें ॥1॥ तोंवरि मी पुढें
कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥2॥ तुका म्हणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥3॥
2524 हा तों नव्हे
कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥1॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों
॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥2॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥3॥
2525 निष्ठ तो दिसे
निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी ॥1॥ केला च करावा केला कैवाड । होईल तें गोड न परेते
॥ध्रु.॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥2॥ तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥3॥
2526 बहु देवा बरें
जालें । नसतें गेलें सोंवळें ॥1॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा
जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥2॥ तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥3॥
2527 स्वामित्वाचीं
वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥1॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं
॥ध्रु.॥ धनवंत्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥2॥ तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥3॥
2528 ॠणाच्या परिहारा
जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥1॥ जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥ आजिवरि
होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥2॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥3॥
2529 येणें पांगें
पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥1॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची
तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥2॥ तुका
म्हणे
नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥3॥
2530 आपुल्या आपण उगवा
लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥1॥ उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा
॥ध्रु.॥ करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥2॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥3॥
2531 सर्व संगीं विट आला
। तूं एकला आवडसी ॥1॥ दिली आतां पायीं
मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥2॥ तुका म्हणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥3॥
2532 शीतळ तें शीतळाहुनी
। पायवणी चरणींचें ॥1॥ सेवन हे शिरसा धरीं
। अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥2॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥3॥
2533 गोदे कांठीं होता
आड । करूनि कोड कवतुकें ॥1॥ देखण्यांनीं एक
केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥ राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥2॥ तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥3॥
2534 न पाहें माघारें
आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥1॥ सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे
॥ध्रु.॥ सावधान चित्त होईल आधारें । खेळतां ही बरें वाटईल ॥2॥ तुका म्हणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥3॥
2535 मथनीचें नवनीत ।
सर्व हितकारक ॥1॥ दंडवत दंडा परी ।
मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काई । तांतडी डोईपाशींच ॥2॥ तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥3॥
2536 अवचिता चि हातीं
ठेवा । दिला सेवा न करितां ॥1॥ भाग्य फळलें जाली
भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥2॥ तुका म्हणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥3॥
2537 समर्थाची धरिली कास
। आतां नाश काशाचा ॥1॥ धांव पावें करीन
लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥2॥ तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर
दयेनें ॥3॥
2538 करूं तैसें पाठांतर
। करुणाकर भाषण ॥1॥ जिहीं केला मूर्तिमंत ।
ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥ सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥2॥ तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥3॥
2539 अचळ न चळे ऐसें
जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥1॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥
एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मिळवे ॥2॥ तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥3॥
2540 काय तुझी थोरी वर्णू मी
पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥1॥ तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥
कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥2॥ अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें
॥3॥ कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥4॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती म्हणोनियां
॥5॥ हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥6॥ ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें
॥7॥ टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा
लवलाहीं ॥8॥ आली
तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥9॥ एका गजाचिया कंठीं घंटा होती । पाडिली अवचिती
तयांवरी ॥10॥ अठरा
दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥11॥ जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुम्ही
नारायणा पक्षियांसी ॥12॥ पाहें आपुलिया दासां म्यां रक्षिलें ।
रणीं वांचविलें कैशा परी ॥13॥ ऐसी तुज माया आपुल्या भक्तांची । माउली आमुची तुका म्हणे ॥14॥
2541 वैष्णवां संगती सुख
वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥1॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें
॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥2॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां
जगदेशें सांभाळावें ॥3॥
2542 शरण शरण वाणी । शरण
त्रिवाचा विनवणी ॥1॥ स्तुती न पुरे हे
वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून । पायांवरी लोटांगण
॥2॥ विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥3॥
2543 लेंकरा लेववी माता
अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी ॥1॥ कृपेचें पोसणें
तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि
घाली हृदयात ॥2॥ पोटा
आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥3॥ मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघें गंगा काई परतों जाणे ॥4॥ तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥5॥
2544 युक्ती तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥1॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें
॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥2॥ तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥3॥
2545 हा गे आलों कोणी म्हणे
बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥1॥ तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥
भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥2॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥3॥
2546 कैसा तीं देखिला
होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥1॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी
जोडी कई लाभों ॥ध्रु.॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें
श्रीमुख अनुभवितां ॥2॥ तुका
म्हणे
वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥3॥
2547 कासया या लोभें
केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥1॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे
॥ध्रु.॥ सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥2॥ तुका म्हणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥3॥
2548 काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी
लोकां दाविली ते ॥1॥ खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि
कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥ आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये
काकुलती दुजियासी ॥2॥ तुका
म्हणे मज
येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनीं च ॥3॥
2549 तुम्हां आम्हां जंव
जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥1॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं
॥ध्रु.॥ नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥2॥ तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥3॥
2550 नको माझे मानूं
आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥1॥ कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आम्हीं
॥ध्रु.॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥2॥ लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकळ्यानें
घोळी जवळी मन ॥3॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥4॥ तुका म्हणे माझी येथें चि आवडी । श्रीमुखाची जोडी
इच्छीतसें ॥5॥
2551 म्हणऊनी
लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥1॥ पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥ बहु उसंतीत
आलों । तया भ्यालों स्थळासी ॥2॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥3॥
2552 जेणें वाढे अपकीर्ति ।
सर्वार्था तें वर्जावें ॥1॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥ होइजेतें शूर
त्यागें । वाउगें तें सारावें ॥2॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥3॥
2553 याची सवे लागली
जीवा । गोडी हेवा संगाचा ॥1॥ परतें न सरवे दुरी
। क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥2॥ तुका म्हणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें॥3॥
2554 याचा तंव हा चि
मोळा । देखिला डोळा उदंड ॥1॥ नेदी मग फिरों
मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥2॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥3॥ अंगीं वसे चि ना लाज । न म्हणे भाज
कोणाची॥4॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित
कोणें नसावें ॥5॥ तुका
म्हणे
धरिला हातीं । मग निश्चिंति हरीनें ॥6॥
2555 प्रसिद्ध हा असे
जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥1॥ तरी वाटा न वजे
कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥2॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥3॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥4॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥5॥ तुका म्हणे दुसर्या भावें । छायें नावें न देखवे ॥6॥
2556 न संडावा आतां ऐसें
वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥1॥ म्हणऊनि मनें विळयेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥ नाना
वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥2॥ तुका म्हणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥3॥
2557 सत्तेचें भोजन
समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥1॥ वर्में श्रम नेला
जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा
वित्त नेम जाला ॥2॥ तुका
म्हणे धणी
ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥3॥
2558 देईल तें उणें नाहीं ।
याचे कांहीं पदरीं ॥1॥ पाहिजे तें संचित
आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी । जो जें चारी तें
लाभे ॥2॥ तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥3॥
2559 तेव्हां होतों
भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥1॥ आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख
जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥2॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥3॥ सहज स्थित आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥4॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥5॥ तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥6॥ ॥5॥
2560 केला कैवाड
संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥1॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र
भेणें ॥ध्रु.॥ अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥2॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥3॥
2561 संगतीनें होतो
पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥1॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं
पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥2॥ तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ति । पुरवावी आर्ति
निर्बळांची ॥3॥
2562 करितां विचार
सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥1॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा
॥ध्रु.॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥2॥ तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्ही
साक्षी जाणें अंतरींचें ॥3॥
2563 कुळींची हे कुळदेवी
। केली ठावी संतांनीं ॥1॥ बरवें जालें शरण
गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥ आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥2॥ तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥3॥
2564 आतां देह अवसान ।
हें जतन तोंवरी ॥1॥ गाऊं नाचों
गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥ या चि जीऊं अभिमानें । सेवाधनें बळकट ॥2॥ तुका म्हणे न सरें मागें । होईन लागें आगळा ॥3॥
2565 ज्याने आड यावें
कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥1॥ मन येथें साह्य जालें
। हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥2॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥3॥
2566 देवासी तो पुरे
एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥1॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥
कांहीं नेघें शिरीं निमित्याचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥2॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥3॥
2567 लौकिकासाटीं या पसार्याचा
गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥1॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों
नये ॥ध्रु.॥ डव्हळिल्या मनें वितिळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥2॥ तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥3॥
2568 नाहीं होत भार
घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥1॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥
उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥2॥ तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥3॥
2569 उपजों मरों हे तों
आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥1॥ उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों
निंद लंडीपणें ॥ध्रु.॥ उभयतां आहे करणें समान । तुम्हां ऐसा म्हणे मी
ही देवा ॥2॥ तुका
म्हणे
हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥3॥
2570 मेलियांच्या रांडा
इच्छिती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥1॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे
॥ध्रु.॥ आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥2॥ तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥3॥
2571 निष्ठ मी जालों
अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥1॥ सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥ सांपडूनि
संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥2॥ तुका म्हणे तुज काय म्हणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥3॥
2572 माझें माझ्या हाता
आलें । आतां भलें सकळ ॥1॥ काशासाटीं विषम
थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥2॥ तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥3॥
2573 समर्थपणें हे करा
संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥1॥ दुसर्याचें
येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें
खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥2॥ तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईजेतें निंद जनीं
देवा ॥3॥
2574 तुम्हां आम्हांसवें न
पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥1॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची
आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥2॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥3॥
2575 सकळ सत्ताधारी ।
व्हावें ऐसें काय हरी ॥1॥ परि या कृपेच्या
वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सर्वोत्तम ।
अवघा चि पूर्णकाम ॥2॥ तुका
म्हणे
दाता । तरि हा जीव दान देता ॥3॥
2576 कोणापाशीं द्यावें
माप । आपीं आप राहिलें ॥1॥ कासयाची भरोवरी ।
काय दुरी जवळी ॥ध्रु.॥ एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥2॥ तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥3॥
2577 नभोमय जालें जळ ।
एकीं सकळ हरपलें ॥1॥ आतां काय सारासारी
। त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥ कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥2॥ तुका ह्मणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥3॥
2578 राजा करी तैसे दाम
। ते ही चाम चालती ॥1॥ कारण ते सत्ता
शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥2॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षिलें ॥3॥
2579 आम्ही देव
तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥1॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥2॥ तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥3॥
2580 हीनसुरबुद्धीपासासी ।
आकृतीसी भेद नाहीं ॥1॥ एक दांडी एक खांदी
। पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥2॥ तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥3॥
2581 काय बोलों सांगा ।
याउपरी पांडुरंगा ॥1॥ कांहीं आधारावांचून
। पुढें न चले वचन ॥ध्रु.॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥2॥ भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥3॥ कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥4॥ करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥5॥
2582 आहाच तो मोड
वाळलियामधीं । अधीराची बुद्धी तेणें न्यायें ॥1॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे
॥ध्रु.॥ विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥2॥ तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥3॥
2583 क्षणक्षणां जीवा
वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥1॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगूनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा
ते चुकी काय जाली ॥2॥ तुका
म्हणे
माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥3॥
2584 आळी करावी ते कळतें
बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥1॥ निवाड तो तेथें असे
पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥ आणीक तों आम्ही न
देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥2॥ तुका म्हणे तुम्हां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥3॥
2585 तांतडीनें आम्हां धीर
चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥1॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा
॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥2॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥3॥
2586 नाहीं लोपों येत
गुण । वेधी आणीकें चंदन ॥1॥ न संगतां पडे ताळा
। रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥ सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥2॥ तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥3॥
2587 वचनें चि व्हावें
आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥1॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत
॥ध्रु.॥ वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥2॥ तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥3॥
2588 उखतें आयुष्य
जायांचें कळिवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥1॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां
॥ध्रु.॥ उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥2॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥3॥
2589 बोलावे म्हूण हे
बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥1॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी
॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥2॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥3॥
2590 लटिक्याचे वाणी चवी
ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥1॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली
॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥2॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥3॥
2591 नये स्तवूं काचें
होतें क्रियानष्ट । काुंफ्दाचे
ते कष्ट भंगा मूळ ॥1॥ नाहीं परमार्थ साधत
लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड ।
तुटी लाभा खंड होतो माना ॥2॥ तुका
म्हणे तरी
मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥3॥
2592 कोण्या काळें येईल मना । नारायणा
तुमचिया ॥1॥ माझा करणें अंगीकार
। सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥ लागली हे तळमळ चित्ता । तरी दुश्चिता
संसारी ॥2॥ सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥3॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥4॥ लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥5॥ कांटाळा तो न धरावा । तुम्ही देवा
दासांचा ॥6॥ तुका
म्हणे
माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥7॥
2593 घ्यावी तरी घ्यावी
उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥1॥ ऐसीं कैंचीं आह्मी पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें
समाधान ॥ध्रु.॥ व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥2॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥3॥
2594 काय करूं जीव होतो
कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥1॥ पडिलें हें दिसे ब्रह्मांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास
राहातसे ॥2॥ तुका
म्हणे आगा
सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥3॥
2595 सुकलियां कोमां
अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥1॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥2॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥3॥
2596 शृंगारिक माझीं
नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥1॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों
स्वयंभ करुणामूर्ति ॥2॥ तुका
म्हणे
केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥3॥
2597 तूं माझी माउली तूं
माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥1॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥2॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥3॥
2598 कराल तें करा ।
हातें आपुल्या दातारा ॥1॥ बळियाचीं
आम्ही बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥ आतां कोठें काळ । करील
देवापाशीं बळ ॥2॥ तुका
म्हणे
पंढरीराया । थापटितों ठोक बाह्य ॥3॥
2599 डोळां भरिलें रूप ।
चित्ता पायांपें संकल्प ॥1॥ अवघी घातली वांटणी
। प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥2॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥3॥
2600 आतां आहे नाहीं । न
कळे आळी करा कांहीं ॥1॥ देसी पुरवुनी इच्छा
। आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥ नेणे भाग सीण । दुजें कोणी तुम्हांविण ॥2॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.