तुकारामगाथा २८०१ - २९००
2801 संतसेवेसि अंग चोरी
। दृष्टी न पडो तयावरी ॥1॥ ऐसियासी व्याली
रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥2॥ तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥3॥
2802 गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि
माझें माझें ॥1॥ सळे धरोनि बैसला
काळ । फाकों नेदी घटिका पळ ॥ध्रु.॥ कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥2॥ हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥3॥ तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥4॥ तुका म्हणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥5॥
2803 आतां माझ्या
मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त ॥1॥ फजित हे केले खळ ।
तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥ प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥2॥ तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥3॥
2804 कां रे न पवसी
धांवण्या । अंगराख्या नारायणा ॥1॥ अंगीं असोनियां बळ
। होसी खट्याळ नाठ्याळ ॥ध्रु.॥ आम्हां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥2॥ तुका म्हणे कान्हा । क्रियानष्टा नारायणा ॥3॥
2805 माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा
भाक देई ॥1॥ पाहतां तंव उफराटें
। घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥ बहु साधन मोलाचे । यासी
जोडा दुजें कैचें ॥2॥ नका
अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥3॥
2806 पवित्र तें अन्न ।
हरिचिंतनीं भोजन ॥1॥ येर वेठ्य पोट भरी
। चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥ जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥2॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित
विठ्ठलें ॥3॥
2807 चरणाचा महिमा । हा
तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥1॥ अंध पारखी माणिकें
। बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥ काय नाहीं सत्ता । हातीं तुझ्या
पंढरीनाथा ॥2॥ तुका
म्हणे
मूढा । मज चेष्टविलें जडा ॥3॥
2808 बळिवंत
कर्म । करी आपुला तो धर्म ॥1॥ पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥ आचरणें
खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥2॥ तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥3॥
2809 कैं वाहावें जीवन ।
कैं पलंगीं शयन ॥1॥ जैसी जैसी वेळ पडे
। तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥ कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी
॥2॥ कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥3॥ कैं उत्तम प्रावर्णा । कैं वसनें तीं जीर्णा ॥4॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥5॥ कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥6॥ तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥7॥
2810 उंचनिंच नेणे
कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्त
देखोनियां ॥1॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी
प्रल्हादासी ॥ध्रु.॥ चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥2॥ सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥3॥ नरहरिसोनारा घडों कंचनलागे । चोख्यामेळ्या संगें
ढोरें ओढी ॥4॥
नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥5॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची
भिंत अंगीं ओढी ॥6॥
अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥7॥ गौळियांचे घरीं गाई अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥8॥ यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥9॥ मिराबाई साटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥10॥ घडी माती वाहे गोर्या कुंभाराची । हुंडी महत्याची
अंगें भरी ॥11॥
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य याची ॥12॥
2811 भेटीलागीं जीवा
लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥1॥ पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे
॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥2॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥3॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥4॥
2812 आले संत पाय ठेविती
मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥1॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥ अवघीं
पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥2॥ तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥3॥
2813 करीं धंदा परि
आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥1॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा
॥ध्रु.॥ नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥2॥ मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य
॥3॥ उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥4॥ तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न
नाहीं माझा ॥5॥
2814 कां रे माझीं पोरें
म्हणसील
ढोरें । मायबाप खरें काय एक ॥1॥ कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥ कां
रे माझें माझें म्हणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥2॥ कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥3॥ तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥4 ॥
2815 अगा करुणाकरा
करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥1॥ ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ
॥ध्रु.॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट
पाहें ॥2॥ उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥3॥ उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें
॥4॥ तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥5॥
2816 न मनीं ते ज्ञानी न
मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥1॥ धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं
॥ध्रु.॥ न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां
परीचीं ॥2॥ तुका म्हणे तयां नमन बाह्यात्कारी । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥3॥
2817 कासिया पाषाण
पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥1॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें
॥ध्रु.॥ काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥2॥ काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥3॥ काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धी ते ॥4॥ तुका म्हणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥5॥
2818 अंतरींचें गोड ।
राहें आवडीचें कोड ॥1॥ संघष्टणें येती
अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥ उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥2॥ तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना ॥3॥
2819 शिळा जया देव ।
तैसा फळे त्याचा भाव ॥1॥ होय जतन तें गोड ।
अंतरा येती नाड ॥ध्रु.॥ देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥2॥ तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥3॥
2820 कासया जी ऐसा माझे
माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥1॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥ काय वानरांची
अंगींची ते शक्ती
। उदका तरती वरी शिळा ॥2॥ तुका म्हणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥3॥
2821 पायां पडावें हें
माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥1॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हां
संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥2॥ तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥3॥
2822 वदवावी वाणी माझी
कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥1॥ सर्व संकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंता
ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥2॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥3॥
2823 नमावे पाय हें
माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया ॥1॥ कृपेचा वोरस न
समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥ तुमची उष्टावळी हें
माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥2॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी
पायांसवें ॥3॥ तुका म्हणे राहे
आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुम्हीं ॥4॥
1824 काय नाहीं माता
गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥1॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें
॥ध्रु.॥ अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥2॥ लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥3॥ तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज
थोरी अंकिताची ॥4॥
2825 माझिया मीपणावर
पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर ।
जालों ये भूमीसी ओझें ॥1॥ काय विटंबना सांगों
किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥ काया वाचा मनें
अघटित करणें चर्मचक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय
॥2॥ लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद । पितृवचन घडली अवज्ञा
अविचार । कुटिल कचर वादी निंद्य ॥3॥ आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भुतदया उपकार नाहीं
शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥4॥ संत महानुभाव ऐका हें उत्तरें । अवगुण अविचारें
वृद्धी पापा । तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥5॥
2826 फिराविलीं दोनी ।
कन्या आणि चक्रपाणी ॥1॥ जाला आनंदें आनंद ।
अवतरले गोविंद ॥ध्रु.॥ तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥2॥ गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें
॥3॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥4॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥5॥ आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥6॥ तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥7॥
2827 सोडियेल्या गांठी ।
दरुषणें कृष्णभेटी ॥1॥ करिती नारी
अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥ उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें
॥2॥ तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥3॥
2828 मुख डोळां पाहे ।
तैशी च ते उभी राहे ॥1॥ केल्याविण नव्हे
हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥ न धरिती मनीं । कांहीं संकोच
दाटणी ॥2॥ तुका म्हणे देवें । ओस केल्या देहभावें ॥3॥
2829 गोकुळीच्या सुखा ।
अंतपार नाहीं लेखा ॥1॥ बाळकृष्ण नंदा घरीं
। आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥ गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥2॥ तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥3॥
2830 विटंबिलें भट ।
दिला पाठीवरी पाट ॥1॥ खोटें जाणोनि अंतर
। न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥ तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥2॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥3॥
2831 प्रेम देवाचें
देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥1॥ मुक्त
लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त । जाले
वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥ध्रु.॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास ।
त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥2॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप ।
गांवीं नाहीं हरिजना ॥3॥
2832 तो चि लटिक्यामाजी
भला । म्हणे देव म्यां देखिला॥1॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे । बुडवी आपणासरिसे ।
अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥ आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां
या मूढा ॥2॥
आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥3॥
2833 होईल जाला अंगें देव
जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥1॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया
॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥2॥ तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥3॥
2834 कां न वजावें
बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥1॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या
तरणें ॥ध्रु.॥ कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावें हा वृत्तांत । देवभक्तां चित्त
। समरसीं खंडणा ॥2॥ कां
वैष्णवा पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥3॥ ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त
अतीत । परमित त्यासाठीं ॥4॥
घालोनि लोळणा । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥5॥
2835 अनुभवें आलें अंगा
। तें या जगा देतसें ॥1॥ नव्हती हाततुके बोल
। मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥ उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥2॥ तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥3॥
2836 साधकाची दशा उदास
असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥1॥ लोलुपता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥
एकांतीीं लोकांतीं स्त्रियांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥2॥ संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशीं ॥3॥ तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि ज्ञान लाहे
गुरुकृपा ॥4॥
2837 अंतरींची ज्योती
प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥1॥ तेथींचा आनंद ब्रह्मांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा
॥ध्रु.॥ भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥2॥ तुका म्हणे आम्हां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥3॥
2838 कासया गा मज घातलें
संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥1॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा
॥ध्रु.॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मियेलें
॥2॥ तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥3॥
2839 प्रारब्धें चि जोडे
धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥1॥ सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥ प्रारब्धें चि
होय सुख । प्रारब्धें चि पावे दुःख ॥2॥ प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥3॥
2840 हीन माझी याति ।
वरी स्तुती केली संतीं ॥1॥ अंगीं वसूं पाहे
गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥2॥ राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया
॥3॥
2841 तपाचे सायास । न
लगे घेणें वनवास ॥1॥ ऐसें कळलें आम्हा एक ।
जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥ जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥2॥ तुका म्हणे येणें । कळिकाळ तें ठेंगणें ॥3॥
2842 माता कापी गळा ।
तेथें कोण राखी बाळा ॥1॥ हें कां नेणां
नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥ नागवी धावणें । तेथें साह्य
व्हावें कोणें ॥2॥ राजा
सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥3॥ तुझ्या केल्याविण । नव्हे स्थिर वश
जन ॥4॥ तुका म्हणे हरी । सूत्र तुम्हां हातीं दोरी ॥5॥
2843 गाऊं नेणें परी मी
कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥1॥ ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ
॥ध्रु.॥ वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥2॥ चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली
कुबजा क्षणें ॥3॥
पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥4॥
2844 गाजराची पुंगी ।
तैसे नवे जाले जोगी ॥1॥ काय करोनि पठन ।
केली अहंता जतन ॥ध्रु.॥ अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥2॥ तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥3॥
2845 परद्रव्य परनारी ।
अभिळासूनि नाक धरी ॥1॥ जळो तयाचा आचार ।
व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥ सोहोळ्याची स्थिती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥2॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥3॥
2846 टिळा टोपी उंच दावी
। जगीं मी एक गोसावी ॥1॥ अवघा वरपंग सारा ।
पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥ मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥2॥ तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥3॥
2847 ऐसे संत जाले कळीं
। तोंडीं तमाखूची नळी ॥1॥ स्नानसंध्या
बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥ भांगभुकाऩ हें साधन । पची पडे मद्यपान
॥2॥ तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥3॥
2848 जातीची शिंदळी ।
तिला कोण वंशावळी ॥1॥ आपघर ना बापघर ।
चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥ सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥2॥ तुका म्हणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥3॥
2849 अंधळ्याची
काठी । हिरोनियां कडा लोटी ॥1॥ हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥ साकर म्हणोनि
माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥2॥ तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥3॥
2850 प्रीतिचिया बोला
नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥1॥ तैसें विठ्ठलराया
तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥ वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती
नवल मायबाप ॥2॥ तुका
म्हणे तुज
येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥3॥
2851 माझे मज कळों येती
अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥2॥ तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥
2852 वर्णावी ते थोरी
एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥1॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक
॥ध्रु.॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥2॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥3॥ तुका म्हणे तुझी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥4॥
2853 नको देऊं देवा
पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥1॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥2॥ तुका म्हणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥3॥
2854 जोडोनियां धन उत्तम
वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥2॥ भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥3॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व
वडिलांचें ॥4॥ तुका
म्हणे हें
चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥
2855 हरि म्हणतां
गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरि म्हणतां ॥1॥ हरि म्हणतां भुक्ति
हरि म्हणतां मुक्ति
। चुके यातायाती हरि म्हणतां
॥ध्रु.॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि म्हणतां ॥2॥ तुका म्हणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुम्हा ॥3॥
2856 नये वांटूं मन ।
कांहीं न देखावें भिन्न ॥1॥ पाय विठोबाचे
चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥ नये काकुळती । कोणा यावें हरिभक्ति ॥2॥ तुका
म्हणे साई । करील कृपेची
विठाई ॥3॥
2857 सकळ देवांचें दैवत
। उभें असे रंगा आंत ॥1॥ रंगा लुटा माझे बाप
। शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥2॥ तुका लुटितां हे रंग । साह्य जाला
पांडुरंग ॥3॥
2858 उशीर कां केला ।
कृपाळुवा विठ्ठला ॥1॥ मज दिलें कोणा
हातीं । काय मानिली निश्चिंती ॥ध्रु.॥ कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥2॥ तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥3॥
2859 तुका वेडा अविचार ।
करी बडबड फार ॥1॥ नित्य वाचे हा चि
छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥ धरी पांडुरंगीं भाव । आणीक नेणें दुजा
देव ॥2॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥3॥ बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥4॥ संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥5॥ कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥6॥ केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥7॥ अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥8॥
2860 आली सिंहस्थपर्वणी ।
न्हाव्या भटा जाली धणी ॥1॥ अंतरीं पापाच्या
कोडी । वरिवरि बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥ बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग
वहिलें ॥2॥ पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥3॥ भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥4॥
2861 तुज घालोनियां
पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥1॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥2॥ तुजलागीं आम्हीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तृत्वासी
॥3॥ तुका म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥4॥
2862 पापाची मी राशी ।
सेवाचोर पायांपाशीं ॥1॥ करा दंड नारायणा ।
माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥ जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥2॥ तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥3॥
2863 दुडीवरी दुडी ।
चाले मोकळी गुजरी ॥1॥ ध्यान लागो ऐसें
हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥ आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥2॥ लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥3॥ तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥4॥
2864 लागोनियां पायां
विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥1॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गा नाहीं
॥ध्रु.॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥2॥ सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥3॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥4॥
2865 लटिकें हासें
लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें ॥1॥ लटिकें माझें
लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥ लटिकें गायें लटिकें ध्यायें ।
लटिकें जायें लटिक्यापें ॥3॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥3॥ लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥4॥
2866. जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन
माझें ॥1॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे
कैसें ॥ध्रु.॥ तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥2॥ पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥3॥ तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥4॥
2867 हे चि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥1॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें
समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥2॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥3॥
2868 जन्मा येणें घडे
पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥1॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी
॥ध्रु.॥ ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥2॥ तुका ह्मणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख
॥3॥
2869 आतां माझे नका
वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥1॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥2॥ तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥3॥
2870 काय माझें नेती वाईट म्हणोन ।
करूं समाधान कशासाटीं ॥1॥ काय मज लोक नेती
परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥ न म्हणें
कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥2॥ सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥3॥ तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥4॥
देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ 13 ॥
2871 वांजा गाई दुभती । देवा ऐसी
तुझी ख्याति ॥1॥ ऐसें मागत नाहीं
तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥ चातक पाखरूं । त्यासी वर्षे मेघधारु ॥ ॥ पक्षी
राजहंस । अमोलिक मोतीं त्यास ॥3॥ तुका
म्हणे
देवा । कां गा खोचलासी जीवा ॥4॥
2872. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥1॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा
॥ध्रु.॥ पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥2॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥3॥
2873 चिंतामणिदेवा
गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥1॥ देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥2॥ तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥3॥
2874 भोक्ता
नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥1॥ भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥ विश्वंभर
कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥2॥ कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें
तुका म्हणे ॥3॥
2875 माझा स्वामी तुझी
वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥1॥ तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं
॥2॥ तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥3॥
2876 वंदिलें वंदावें
जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥1॥ स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं
॥ध्रु.॥ सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥2॥ तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥3॥
2877 आम्हां
विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥1॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें
समाधान ॥2॥ तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥3॥
2878 सुखाचे व्यवहारीं
सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥1॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा
॥ध्रु.॥ समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥2॥ तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥3॥
2879 काय देवें खातां
घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥1॥ म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें ॥ध्रु.॥ काय खोळंबले
हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥2॥ कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । म्हणतां
हरि हरि तुका म्हणे ॥3॥
2880 उत्तम त्या याति ।
देवा शरण अनन्यगति ॥1॥ नाहीं दुजा ठाव ।
कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥ उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ती अंगीं
दिसे ॥2॥ भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥3॥
2881 ज्यासी नावडे
एकादशी । तो जिता चि नरकवासी ॥1॥ ज्यासी नावडे हें
व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥ ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुक्तवासी ॥2॥ ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥3॥ तुका म्हणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥4॥
2882 मुंगी होउनि साकर
खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी ॥1॥ वाळवंटी साकर पडे ।
गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥ जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥2॥ पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥3॥ प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥4॥ ब्रह्मज्ञान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥5॥ मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥6॥ तुका म्हणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥7॥
2883 भय हरिजनीं ।
कांहीं न धरावें मनीं ॥1॥ नारायण ऐसा सखा ।
काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥ चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥2॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥3॥
2884 आयुष्य मोजावया
बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥1॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता
हरिविण ॥ध्रु.॥ कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥2॥ राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥3॥ तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥4॥
2885 होऊं नको कांहीं या
मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥1॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची
॥ध्रु.॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥2॥ तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥3॥
2886 नामाविण काय वाउगी
चावट । वांयां वटवट हरीविण ॥1॥ फुकट चि सांगे
लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥ मेळवूनि चाट करी सुरापान ।
विषयांच्या गुणें माततसे ॥2॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥3॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥4॥ तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥5॥
2887 संत गाती
हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥1॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥ काया
कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥2॥ संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥3॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥4॥
2888 जालें भांडवल ।
अवघा पिकला विठ्ठल ॥1॥ आतां वाणी
काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥ आपुल्या संकोचें । म्हणऊनि
तेथें टांचे ॥2॥
घेतों खर्या मापें । तुका देखोनियां सोपें ॥3॥
2889 शुद्ध ऐसें ब्रह्मज्ञान ।
करा मन सादर ॥1॥ रवि रसां सकळां
शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥ कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥2॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥3॥
2890 अग्नि हा
पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥1॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥2॥ तुक्यास्वामी म्हणे काय मज स्मरा ।
आपुल्या उद्धारा लागूनियां ॥3॥
2891 भक्त देवाघरचा
सुना । देव भक्ताचा पोसणा ॥1॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा
जनिता ॥2॥ तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥3॥
2892 बरवयांबरवंट । विटे
चरण सम नीट ॥1॥ ते म्या हृदयीं
धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥ सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥2॥ तुका म्हणे अंतीं । ठाव मागितला संतीं॥3॥
2893 मासं चर्म हाडें ।
देवा अवघीं च गोडें ॥1॥ जे जे हरिरंगीं
रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥ वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी
कलिवर ॥2॥ तुका म्हणे ऐसा । बराडी हा भक्तिरसा ॥3॥
2894 कोणा चिंता आड ।
कोणा लोकलाज नाड ॥1॥ कैंचा राम अभागिया
। करी कटकट वांयां ॥ध्रु.॥ स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥2॥ तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥3॥
2895 आपुलिया काजा । आम्हीं
सांडियेलें लाजा ॥1॥ तुम्हां असों
जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥ तुम्ही देहशून्य । आम्हां कळे पाप पुण्य ॥2॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥3॥
2896 मायबापें केवळ काशी
। तेणें न वजावें तीर्थासी ॥1॥ पुंडलीकें काय
केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥ध्रु.॥ तैसा होई सावधान । हृदयीं धरीं
नारायण ॥2॥ तुका म्हणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥3॥
2897 सत्य आम्हां मनीं
। नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥ ऐसें जाणा रे सकळ ।
भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण
उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥
2898 शिकवूनि हित । सोयी
लावावे हे नीत ॥1॥ त्याग करूं नये
खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥2॥ मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥3॥ जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥4॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥5॥
2899 सुख सुखा भेटे । मग
तोडिल्या न तुटे ॥1॥ रविरश्मिकळा ।
नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥ दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥2॥ तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित ॥3॥
2900 तुम्हां न पडे
वेच । माझा सरेल संकोच ॥1॥ फुकासाटीं जोडे यश
। येथें कां करा आळस ॥ध्रु.॥ कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें
॥2॥ तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥3॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.