तुकारामगाथा १८९८ - २०००
तुकारामगाथा १८९८ - २०००
॥ स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ 66 ॥
संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग 36
1898 कोणा मुखें ऐसी
ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥1॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची
॥ध्रु.॥ निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे
॥2॥ तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥3॥
1899 कां माझा विसर
पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥1॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाची
पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥2॥ तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥3॥
1900 कांहीं माझे कळों
आले गुणदोष । म्हणऊनि उदास धरिलें ऐसें ॥1॥ नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं
॥ध्रु.॥ कळावें तें मना आपुलिया सवें । ठायींचे हें घ्यावें
विचारूनि ॥2॥ मज अव्हेरिलें
देवें । माझिया कर्तव्यें बुद्धीचिया ॥3॥
1901 नव्हे धीर कांहीं
पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥1॥ कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि
॥ध्रु.॥ नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥2॥ तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥3॥
1902 आतां पाहों पंथ
माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥1॥ काय करूं आतां न गमेसें जालें । बहुत सोसिलें बहु दिस
॥ध्रु.॥ घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुलें तें झुरे पाहावया ॥2॥ तुका म्हणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥3॥
1903 विनवीजे ऐसें भाग्य
नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥1॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी
॥ध्रु.॥ जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥2॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबड्या उत्तरीं
गौरवितों ॥3॥ तुका म्हणे
विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥4॥
1904 देवांच्या ही देवा
गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥1॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष
॥ध्रु.॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धी सिद्धी ठायीं
मुक्ती चारी ॥2॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी
॥3॥ तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥4॥
1905 काय जालें नेणों
माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥1॥ बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाचें
पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठ न पाहिजे ॥2॥ पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥3॥ तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥4॥
1906 एवढा संकोच तरि कां
व्यालासी । आम्ही कोणांपाशीं तोंड वासूं ॥1॥ कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुम्ही देवा
॥ध्रु.॥ कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥2॥ कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें ॥3॥ तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥4॥
1907 देई डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥1॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्निशीं
नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥ फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥2॥ आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥3॥ तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥4॥
1908 सीण भाग हरे
तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥1॥ इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान ॥ध्रु.॥ माहेर आहेसें
लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥2॥ आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥3॥ तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥4॥
1909 धरितों वासना परी
नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥1॥ तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥ प्रकार ते कांहीं
नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥2॥ जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥3॥ तुका म्हणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥4॥
1910 कां माझे पंढरी न
देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥1॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी
॥ध्रु.॥ कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥2॥ कां या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥3॥ तुका म्हणे कई जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥4॥
1911 काय पोरें जालीं
फार । किंवा न साहे करकर ॥1॥ म्हणऊनि
केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥ करूं कलागती । तुज भांडणें
भोंवतीं ॥2॥ तुका म्हणे
टांचें । घरीं जालेंसे वरोचें ॥3॥
1912 कांहीं चिंतेविण ।
नाहीं उपजत सीण ॥1॥ तरी हा पडिला विसर
। माझा तुम्हां जाला भार ॥ध्रु.॥ आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां
गांठी ॥2॥ तुका म्हणे घरीं । बहु बैसले रिणकरी ॥3॥
1913 निरोपासी वेचे ।
काय बोलतां फुकाचें ॥1॥ परी हें नेघेवे चि
यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥ सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥2॥ न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे
वेचे बोल ॥3॥
1914 जोडीच्या हव्यासें
। लागे धनांचें चि पिसें ॥1॥ मग आणीक दुसरें ।
लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥ पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥2॥ तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥3॥
1915 मविलें मविती ।
नेणों रासी पडिल्या किती ॥1॥ परि तूं धाला चि न
धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥ अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥2॥ तुका म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥3॥
1916 न बैससी खालीं । सम
उभा च पाउलीं ॥1॥ ऐसे जाले बहुत दिस
। जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥ नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥2॥ तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥3॥
1917 जोडी कोणांसाटीं ।
एवढी करितोसी आटी ॥1॥ जरी हें आम्हां नाहीं
सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥ करूनि जतन । कोणा देसील हें धन ॥2॥ आमचे तळमळे । तुझें होईल वाटोळें ॥3॥ घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥4॥ तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥5॥
1918 करूनि चाहाडी ।
अवघी बुडवीन जोडी ॥1॥ जरि तूं होऊनि उदास
। माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥ येथें न करी काम । मुखें नेघें तुझें नाम ॥2॥ तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥3॥
1919 समर्थाचे पोटीं । आम्ही
जन्मलों करंटीं ॥1॥ ऐसी जाली जगीं कीर्ती ।
तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥ येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥2॥ तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥3॥
1920 पुढें तरी चित्ता ।
काय येईल तें आतां ॥1॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥ कंठीं धरिला प्राण
। पायांपाशीं आलें मन ॥2॥ तुका म्हणे
चिंता । बहु वाटतसे आतां॥3॥
1921 कैंचा मज धीर ।
कोठें बुद्धी माझी स्थिर ॥1॥ जें या मनासी आवरूं
। आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥ कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥2॥ तुका म्हणे कोण दशा आली सांगा ॥3॥
1922 समर्पक वाणी ।
नाहीं ऐकिजेसी कानीं ॥1॥ आतां भावें करूनि
साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥ न कळे उचित । करूं समाधान
चित्त ॥2॥ तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥3॥
1923 येती वारकरी । वाट
पाहातों तोंवरी ॥1॥ घालूनियां दंडवत ।
पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥ पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥2॥ तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥3॥
1924 रुळें महाद्वारीं ।
पायांखालील पायरी ॥1॥ तैसें माझें दंडवत
। सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥2॥ तुका म्हणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ॥3॥
1925 तुम्ही
संतजनीं । माझी करावी विनवणी ॥1॥ काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥ भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती
॥2॥ न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥3॥
1926 होइल कृपादान । तरी
मी येईन धांवोन ॥1॥ होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥ रिघेन मातेपुढें ।
स्तनपान करीन कोडें ॥2॥ तुका म्हणे ताप
। हरती देखोनियां बाप ॥3॥
1927 परिसोनि उत्तर ।
जाब देईजे सत्वर ॥1॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥ नाणीं कांहीं मना ।
करूनि पापाचा उगाणा ॥2॥ तुका म्हणे
नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥3॥
1928 ऐकोनियां कीर्ती ।
ऐसी वाटती विश्रांती ॥1॥ माते सुख डोळां पडे
। तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥ बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥2॥ तुका म्हणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥3॥
1929 किती करूं शोक ।
पुढें वाढे दुःखें दुःख ॥1॥ आतां जाणसी तें
करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥ पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥2॥ तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥3॥
1930 करील आबाळी ।
माझ्या दांताची कसाळी ॥1॥ जासी एखादा मरोन ।
पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥ घरीं लागे कळहे । नाहीं जात तो शीतळ ॥2॥ तुका म्हणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥3॥
1931 आतां आशीर्वाद ।
माझा असो सुखें नांद ॥1॥ म्हणसी
कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥ दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार
॥2॥ नेसी कधीं तरी । तुका म्हणे लाज
हरी ॥3॥
1932 आतां हे सेवटीं ।
माझी आइकावी गोष्टी ॥1॥ आतां द्यावा वचनाचा
। जाब कळे तैसा याचा ॥ध्रु.॥ आतां करकर । पुढें न करीं उत्तर ॥2॥ तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥3॥
1933 बोलिलों ते आतां ।
कांहीं जाणतां नेणतां ॥1॥ क्षमा करावे अन्याय
। पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥ स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥2॥ तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥
या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग 19
1934 माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि
झोंप नाहीं डोळां ॥1॥ वाट पाहें आस
धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥ बोटवरी माप लेखितों
दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥2॥ काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥3॥ तुका म्हणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥4॥
1935 परि तो आहे कृपेचा
सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥1॥ बहुकानदृष्टी आइके
देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥ सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें
कोड ॥2॥ बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥3॥ तुका म्हणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन
बोलिलों तें ॥4॥
1936 यावरि न कळे संचित
आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥1॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे
॥ध्रु.॥ जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥2॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥3॥ तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें
सकळ निरोपानें ॥4॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
1937 होईल निरोप घेतला
यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥1॥ करूनियां
दधिमंगळभोजन । प्रयाण शकुन सुमुहूर्तें ॥ध्रु.॥ होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥2॥ येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥3॥ तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥4॥
1938 ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येते
वारकरी होत वाटे ॥1॥ देखिले सोहळे होती । चालती ते मात
करूनियां ॥ध्रु.॥ केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होइल प्रेम ॥2॥ गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥3॥ तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देई क्षेम ॥4॥
1939 क्षेम मायबाप पुसेन
हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥1॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥ अंतरींचें संत
जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥2॥ पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आलिंगून ॥3॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥4॥
1940 होइल माझी संतीं
भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥1॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें
सांगितलीं ॥ध्रु.॥ क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ
॥2॥ अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥3॥ तुका म्हणे सवें येईल मुर्हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥4॥
1941 दोहींमध्यें एक
घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥1॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये
॥ध्रु.॥ लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥2॥ अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥3॥ व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका म्हणे मना
मन साक्ष ॥4॥
1942 बैसतां कोणापें
नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोई ॥1॥ घडी घडी मज आठवे
माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥ नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥2॥ इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥3॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका म्हणे
जीवें घेतलासे ॥4॥
1943 नाहीं हानि परी न
राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥1॥ पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज
॥ध्रु.॥ आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥2॥ बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥3॥ तुका म्हणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥4॥
1944 तोंवरी म्यां त्यास
कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥1॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये
॥ध्रु.॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव ॥2॥ आपुलिया भोगें होईल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं
॥3॥ तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥4॥
1945 माहेरींचें आलें
तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥1॥ पायांवरी माथा आलिंगीन बाहीं । घेईन लवलाहीं पायवणी
॥ध्रु.॥ सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥2॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥3॥ तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥4॥
1946 वियोग न घडे सन्निध
वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥1॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें
॥ध्रु.॥ कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें ॥2॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥3॥ तुका म्हणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥4॥
1947 आतां माझे सखे येती
वारकरी । जीवा आस थोरी लागली ते ॥1॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा
॥ध्रु.॥ काय लाभ जाला काय होतें केणें । काय काय कोणे सांटविलें ॥2॥ मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं
॥3॥ तुका म्हणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनि राहें ॥4॥
1948 काय करावें म्यां
केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥1॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी
॥ध्रु.॥ काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं
विवंचना ॥2॥ आणीक ही त्यासी
बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥3॥ तुका म्हणे आम्हां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥4॥
1949 आम्हां
अराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजिवरी ॥1॥ पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामें
॥ध्रु.॥ वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनि ॥2॥ मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली
॥3॥ तुका म्हणे वाट पाह्याचें कारण । येथीचिया हिंणें जालें भाग्य ॥4॥
1950 बहु दिस नाहीं
माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥1॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें
आठवलें ॥ध्रु.॥ तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥2॥ बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥3॥ काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥4॥
1951 होतीं नेणों जालीं
कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥1॥ आम्ही होतों सोई सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥ निश्चिंतीनें
होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥2॥ आम्हां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥3॥ तुका म्हणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनि ॥4॥
1952 आतां करावा कां
सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥1॥ असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी
॥ध्रु.॥ बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥2॥ चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥3॥ तुका म्हणे आसे लागलासे जीव । म्हणऊनि
कींव भाकीतसें ॥4॥
संत परत आले
त्यांची भेट झाली ते अभंग 11
1953 भागलेती देवा । माझा
नमस्कार घ्यावा ॥1॥ तुम्ही क्षेम
कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥2॥ तुका म्हणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥3॥
1954 घालूनियां ज्योती ।
वाट पाहें दिवसराती ॥1॥ बहु उताविळ मन ।
तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥ आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥2॥ तुका म्हणे पेणी । येतां जातां दिवस गणीं ॥3॥
1955 आजि दिवस धन्य ।
तुमचें जालें दरुषण ॥1॥ सांगा माहेरींची
मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥ आइकतों मन । करूनि सादर श्रवण
॥2॥ तुका म्हणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥3॥
1956 बोलिलीं तीं काय ।
माझा बाप आणि माय ॥1॥ ऐसें सांगा जी
झडकरी । तुम्ही सखे वारकरी ॥ध्रु.॥ पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥2॥ तुका म्हणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥3॥
1957 काय पाठविलें ।
सांगा भातुकें विठ्ठलें ॥1॥ आसे लागलासे जीव ।
काय केली माझी कींव ॥ध्रु.॥ फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥2॥ तुका म्हणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा॥3॥
1958 आजिचिया लाभें
ब्रह्मांड ठेंगणें । सुखी जालें मन कल्पवेना ॥1॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या जाल्या भेटी
पायांसवें ॥ध्रु.॥ वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥2॥ माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होइल समाचार सांगती तो ॥3॥ तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥4॥
1959 आजि बरवें जालें ।
माझें माहेर भेटलें ॥1॥ डोळां देखिले सज्जन
। निवारला भाग सीण ॥ध्रु.॥ धन्य जालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥2॥ इच्छेचें पावलों । तुका म्हणे
धन्य जालों ॥3॥
1960 वोरसोनि येती ।
वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥1॥ माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥ स्नेहें भूक तान ।
विसरती जाले सीण ॥2॥ तुका म्हणे
कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें॥3॥
1961 आलें तें आधीं खाईन भातुकें । मग
कवतुकें गाईन ओव्या ॥1॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसें तों तें ॥2॥ तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥3॥
1962 आमुप जोडल्या
सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥1॥ काय सांगों सुख जालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥2॥ तुका म्हणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥3॥
1963 पवित्र व्हावया
घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥1॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥2॥ तुका म्हणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥3॥
पत्राचे अभंग समाप्त । 36 । 19 । 11 ॥ 66॥
1964 मना एक करीं । म्हणे जाईन पंढरी । उभा
विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥1॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम ।
हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥ लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया ।
शरण देई उचित ॥2॥ नाचें रंगीं वाहें
टाळी । होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरी ॥3॥
1965 न राहे क्षण एक
वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥1॥ भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम
घेतां तयासी ॥ध्रु.॥ जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां
वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥2॥ चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये
कंठीं । करूनियां साटी । चित्त प्रेम दोहींची ॥3॥ जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार ।
नांवें ठेवूनि आपणां ॥4॥ ऐसा भक्तांचा ॠणी
। पाहातां आगमीं पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥5॥
1966 स्वल्प वाट चला
जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥1॥ तुम्ही आम्ही
खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥2॥ तुका म्हणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥3॥
1967 आनंदाच्या कोटी ।
सांटवल्या आम्हां पोटीं ॥1॥ प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥ अखंड खंडेना जीवन ।
राम कृष्ण नारायण ॥2॥ थडी आहिक्य परत्र ।
तुका म्हणे सम तीर ॥3॥
1968 चाहाडाची माता ।
व्यभिचारीण तत्वता ॥1॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥ जेणों त्याच्या
वाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥2॥ तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥3॥
1969 सापें ज्यासी खावें
। तेणें प्राणासी मुकावें ॥1॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥ विंचु हाणें नांगी । अग्न लावी आणिकां
अंगीं ॥2॥ तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥3॥ ॥6॥
स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ 11 ॥
1970 पिकल्या सेताचा आम्हां देतो
वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥1॥ सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी
॥ध्रु.॥ हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥2॥ मज यासी भांडतां जाब नेदी बळें । म्हणे एका
वेळे घ्याल वांटा ॥3॥ तुका म्हणे स्त्रीये काय
वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥4॥
1971 करितां विचार अवघें
एक राज्य । दुजा कोण मज पाठी घाली ॥1॥ कोण्या रीती जावें आम्ही वो पळोनि । मोकळ अंगणीं
मागें पुढें ॥ध्रु.॥ काय तें गव्हाणें हिंडावीं वो किती । दूत ते लागती याच पाठी
॥2॥ कोठें याची करूं केलों कुळवाडी । आतां हा न सोडी जीवें आम्हां ॥3॥ होऊनि बेबाख येथें चि राहावें । देईल तें खावें तुका म्हणे ॥4॥
1972 नागवूनि एकें
नागवींच केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥1॥ भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान
॥ध्रु.॥ एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥2॥ सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥3॥ तुका म्हणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आम्ही ॥4॥
1973 आतां तूं तयास होई वो उदास । आरंभला
नास माझ्या जीवा ॥1॥ जरूर हें जालें मज
कां नावडे । उपास रोकडे येती आतां ॥ध्रु.॥ बरें म्या तुझिया जीवाचें तें काय ।
व्हावें हें तें पाहें विचारूनि ॥2॥ तुज मज तुटी नव्हे या विचारें । सहित लेकुरें राहों सुखें ॥3॥ तुका म्हणे तरी तुझा माझा संग । घडेल वियोग कधीं नव्हे ॥4॥
1974 काय करूं आतां
माझिया संचिता । तेणें जीववित्ता साटी केली ॥1॥ न म्हणावें कोणी माझें हें करणें । हुकुम तो येणें देवें केला
॥ध्रु.॥ करूनि मोकळा सोडिलों भिकारी । पुरविली तरी पाठी माझी ॥2॥ पाणिया भोंपळा जेवावया पानें । लाविलीं वो येणें देवें आम्हां ॥3॥ तुका म्हणे यासी नाहीं वो करुणा । आहे नागवणा ठावा मज ॥4॥
1975 नको धरूं आस
व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥1॥ आपुला तूं गळा घेई उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास
॥ध्रु.॥ अवेज देखोनि बांधितील गळा । म्हणोनि
निराळा पळतुसें ॥2॥ देखोनियां त्यांचा
अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥3॥ तुका म्हणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्त आतां ॥4॥
1976 भले लोक तुज बहु
मानवती । वाढेल या कीर्ती जगामाजी ॥1॥ म्हणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं
मज ॥ध्रु.॥ आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥2॥ किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥3॥ तुका म्हणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥4॥
1977 ऐक हें सुख होईल दोघांसी । सोहळा
हे ॠषि करिती देव ॥1॥ जडितविमानें
बैसविती मानें । गंधर्वांचें गाणें नामघोष ॥ध्रु.॥ संत महंत सिद्ध
येतील सामोरे । सर्वसुखा पुरे कोड तेथें ॥2॥ आलिंगूनि लोळों त्यांच्या पायांवरी । जाऊं तेथवरी मायबापें
॥3॥ तुका म्हणे तया सुखा वर्णू काय । जेव्हां बापमाय देखें डोळां ॥4॥
1978 देव पाहावया करीं
वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥1॥ दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारूनि
शुद्ध करीं मन । देई वो हें दान यथाविध ॥2॥ नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥3॥ तुका म्हणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आम्हां ॥4॥
1979 सुख हें नावडे आम्हां कोणा
बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥1॥ भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥ द्रव्य जीवाहूनि
आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनि हीन ॥2॥ सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥3॥ तुका म्हणे आम्हां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥4॥
1980 गुरुकृपे मज
बोलविलें देवें । होईल हें घ्यावें हित कांहीं ॥1॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां
॥ध्रु.॥ होई बळकट घालूनियां कास । हा चि उपदेश तुज आतां ॥2॥ सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राह्मणाचें ॥3॥ वैष्णवांची दासी होई सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें
विठोबाचें ॥4॥ पूर्णबोध
स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला ॥5॥ तुका म्हणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥6॥
1981 खडा रवाळी साकर ।
जाला नामाचा चि फेर । न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडितां ॥1॥ तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा । जाळविलें जगा । मी
हें माझें यासाटीं ॥ध्रु॥ पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी । काय निवडे वेगळें
॥2॥ निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं । तुका म्हणे
दोन्ही । निवारलीं जागतां ॥3॥
1982 आम्ही जाणों
तुझा भाव । कैंचा भक्त
कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैंचें फळ शेवटीं ॥1॥ संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों आम्ही आप ।
आपणासी देखिलें ॥ध्रु.॥ एके ठायीं घरिच्याघरीं । न कळतां जाली चोरी । तेथें तें चि
दुरी । जाणें येणें खुंटलें ॥2॥ तुका म्हणे धरूनि हातीं । उर ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं ।
देवभक्ती सोहळा ॥3॥
1983 कांहीं बोलिलों
बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥1॥ काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा
। सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥ घडे अवज्ञा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें
। आहे ठावें तुम्हांसी ॥2॥ तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला
पाळावा । लळा पुढती आगळा ॥3॥
1984 बहु भितों जाणपणा ।
आड न यो नारायणा । घेइन प्रेमपान्हा । भक्तीसुख
निवाडें ॥1॥ यासी तुळे ऐसे
कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ निमिशा अर्ध
संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥2॥ तुका म्हणे हें चि देई । मीतूंपणा खंड नाहीं । बोलिलों त्या नाहीं
। अभेदाची आवडी ॥3॥
1985 देवा आतां ऐसा करीं
उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥1॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें
॥ध्रु.॥ ठाव देई चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥2॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥3॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥4॥ तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा
भावशुद्ध ॥5॥
1986 तुज न करितां काय
नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥1॥ घेई माझा भार करीं कैवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥ उचित अनुचित
पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥2॥ कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥3॥ पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा
॥4॥ तुका म्हणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥5॥
1987 मज त्याची भीड
नुलंघवे देवा । जो ह्मणे केशवा दास तुझा ॥1॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥ सांडूनियां लाज
नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥2॥ न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥3॥ तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥4॥
1988 तुझे पाय माझे
राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥1॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥ मन स्थिर
ठेलें इंद्रियें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥2॥ पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥3॥ तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥4॥
1989 जेथें जातों तेथें
तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥1॥ चालों वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥ बोलों जातां बरळ
करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥2॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥3॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥4॥
1990 जालें पीक आम्हां अवघा
सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥1॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥ अवघा जाला आम्हां एक
पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥2॥ अवघे चि आम्ही ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥3॥ तुका म्हणे आम्ही सदेवांचे दास । करणें न लगे आस आणिकांची ॥4॥
1991 साधनें आमुचीं आज्ञेचीं
धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥1॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या
॥ध्रु.॥ सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलही वचन बाध जालें ॥2॥ तुका म्हणे आम्हां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥3॥
1992 शुभ जाल्या दिशा
अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥1॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही
॥ध्रु.॥ सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥2॥ तुका म्हणे आतां आम्हांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥3॥
1993 पाप पुण्य दोन्ही
वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥1॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक
॥ध्रु.॥ राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं
॥2॥ तुका म्हणे आम्ही खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी स्थिर
पाहों ॥3॥
1994 हित तें हें एक राम
कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥1॥ हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा
॥ध्रु.॥ चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥2॥ अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे
गंगे मिळणी सिंधु ॥3॥
1995 माझिये जातीचें मज
भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥1॥ आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें
॥ध्रु.॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥2॥ सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥3॥ तुका म्हणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥4॥
1996 आमुचें जीवन हें
कथाअमृत । आणिक ही संतसमागम ॥1॥ सारूं एके ठायीं
भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥ धालिया ढेंकर येती
आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥2॥ पिकलें स्वरूप आलिया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥3॥ मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका म्हणे ॥4॥
1997 जोडिलें तें आतां न
सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥1॥ संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षय हें
॥ध्रु.॥ शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥2॥ बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे
॥3॥ तुका म्हणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥4॥
1998 भक्तीभाव आम्ही
बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥1॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥ सुखाचें फुकाचें
सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥2॥ मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा
॥3॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे
चित्त शुद्ध करीं ॥4॥
1999 पर्जन्यें
पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥1॥ बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया
॥ध्रु.॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥2॥ काउळें ढोंपरा ककर तित्तरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥3॥ तुका म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥4॥
2000 धीर तो कारण
एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥1॥ चातक हे जळ न
पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥ सूर्यविकाशनी नेघे
चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥2॥ धेनु येऊं नेदी
जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥3॥ तुका म्हणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥4॥
--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.